लँड, एडविन हर्बर्ट : (७ मे १९०९-१ मार्च १९९१). अमेरिकन भौतिकीविज्ञ आणि संशोधक. ध्रुवित (एकाच प्रतलात कंप पावणाऱ्या किरणांनी बनलेल्या) प्रकाशाचे व्यावहारिक उपयोग व त्यासंबंधीचे सिद्धांत, ध्रुवित प्रकाश निर्माण करण्यासाठी आधुनिक संश्लेषित (कृत्रिम रीत्या तयार केलेल्या) ध्रुवकांचा विकास, तत्काळ कृष्णधवल व रंगीत छायाचित्र मिळविण्यासाठी योग्य फिल्म व कॅमेरे यांचा विकास आणि वर्णदृष्टीसंबंधीच्या नवीन सिद्धांताची मांडणी असे विविधांगी महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले.

लँड यांचा जन्म ब्रिजपोर्ट, कनेक्टिकट येथे झाला. हार्व्हर्ड विद्यापीठात विद्यार्थी असतानाच त्यांना ध्रुवित प्रकाशासंबंधी गोडी निर्माण झाली. त्यांनी विद्यापीठातून अनुपस्थितीची परवानगी मिळविली आणि ध्रुवित प्रकाशाची निर्मिती व उपयोग यांविषयी सु. दीड वर्ष एकचित्ततेने अभ्यास व प्रयोग कार्य केले. १९३२ मध्ये त्यांनी ध्रुवीकरणाचे गुणधर्म असलेल्या आयडोक्विनीन सल्फेटाचे (क्विनीन आयडोसल्फेटाचे) अतिसूक्ष्म स्फटिक एकसमान दिक्‌ स्थितीत आणून ते प्लॅस्टिकच्या पातळ तक्‌त्यात अंतर्भूत करण्यात यश मिळविले [⟶प्रकाशकी]. याद्वारे तयार झालेल्या ध्रुवकाला त्यांनी ‘पोल-रॉइड-जे तक्ता’ असे नाव दिले व त्याचे अनेक व्यावहारिक उपयोग (उदा., मोटारीकरिता डोळे न दिपविणारे अग्रदीप, त्रिमितीय चित्रपट वगैरे) होण्याची शक्यता त्यांना दिसून आली. या शोधामुळे जवळजवळ कोणत्याही आकारमानाचा ध्रुवक वापरणे शक्य झाले व त्याच्या किंमतीतही लक्षणीय घट झाली. हार्व्हर्ड येथील त्यांच्या विद्यार्थीदशेच्या अखेरच्या काळात ध्रुवित प्रकाशासंबंधी शुद्ध व अनुप्रयुक्त विज्ञान क्षेत्र इतके आशादायक व वाढत्या मागणीचे बनले की, लँड यांनी या संशोधनाला पूर्णपणे वाहून घेण्यासाठी विद्यापीठाकडून दुसऱ्यांदा अनुपस्थितीची परवानगी मिळविली. हार्व्हर्ड विद्यापीठातील भौतिकीचे निदेशक जॉर्ज व्हीलराइट यांच्या समवेत १९३२ मध्ये लँड यांनी बॉस्टन येथे लँड-व्हीलराइट लॅबोरेटरीजची स्थापना केली. त्यानंतरच्या काही वर्षात त्यांनी विविध प्रकारच्या ध्रुवक पोलरॉइड द्रव्यांची श्रेणीच विकसित केली आणि १९३६ मध्ये त्यांचा उपयोग उन्हाचे चष्मे व इतर प्रकाशीय प्रयुक्तींमध्ये करण्यास प्रारंभ केला. या उपयोगांच्या संदर्भातील सैद्धांतिक कार्यही लँड यांनी केले. पुढे पोलरॉइडांचा उपयोग कॅमेऱ्याच्या प्रकाश गाळण्या [⟶ कॅमेरा] व इतर प्रकाशीय उपकरणांत करण्यात आला.

लँड यांनी १९३७ मध्ये केंब्रिज, मॅसॅचूसेट्स येथे पोलरॉइड कॉर्पोरेशनची स्थापना केली. त्यानंतर चार वर्षांनी त्यांनी ध्रुवित प्रकाशावर आधारलेली त्रिमितीय चित्रपट प्रक्रिया विकसित केली व तिचा विस्तृत प्रमाणात उपयोग करण्यात आला [⟶चलत्‌चित्रपट तंत्र]. दुसऱ्या महायुद्धकाळात त्यांनी ध्रुवणाचे तत्त्व अवरक्त (दृश्य वर्णपटातील तांबड्या भागाच्या अलीकडील) किरणांच्या गाळण्या, हलक्या वजनाचेपरासमापक, विमानवेधी तोफा व इतर शस्त्रांना जोडावयाची लक्ष्यवेधी साधने आणि रात्रीही उपयोगी पडतील असे संरक्षक चष्मे या व इतर युद्ध साहित्याच्या विकासाकरिता उपयोगात आणले.

युद्धानंतर लँड यांनी तत्काळ विकाशन होणारी [⟶छायाचित्रण] विकसित करण्याच्या कामास प्रारंभ केला. १९४७ मध्ये त्यांनी ६० सेकंदांत पूर्ण संस्कारित छायाचित्राची प्रत तयार करणाऱ्या कॅमेऱ्याचे प्रात्यक्षिक दाखविले. या कॅमेऱ्याला पोलरॉइड लँड कॅमेरा असे म्हणतात. लँड यांच्या छायाचित्रणाच्या प्रकियेचे लवकरच व्यावसायिक, लष्करी व वैज्ञानिक क्षेत्रांत अनेक उपयोग होऊ लागले. त्यानंतरच्या काळात रंगीत छायाचित्रणाची तत्काळ प्रक्रिया व इतर अनेक नवनवीन क्लृप्त्यांचा  विकास करण्यात आला [⟶कॅमेरा छायाचित्रण]. रंगीत चित्रपट फिल्मची तत्काळ पद्धती (पोलॅव्हिजन) लँड यांनी १९७७ मध्ये प्रथम प्रचारात आणली तथापि याच सुमारास घरी सुलभपणे वापरता येणारी व्हिडिओ सामग्री उपलब्ध होऊ लागल्यामुळे ही पद्धती मोठ्या प्रमाणावर अयशस्वी ठरली आणि कंपनीला मोठा तोटा झाला.

लँड यांच्या प्रकाशकी व रंग (वर्ण) यांसंबंधीच्या कार्याची परिणती त्यांच्या रंगसंवेदनेसंबंधीच्या नवीन सिद्धांतात झाली. याबाबत केलेल्या प्रयोगाद्वारे त्यांनी रंगसंवेदनेच्या अभिजात सिद्धांतात काही विसंगती असल्याचे दाखवून दिले. डोळ्याकडे येणाऱ्या प्रकाशातील तांबड्या, हिरव्या व निळ्या रंगांच्या सापेक्ष प्रमाणावर प्रत्यक्ष संवेदना होणारा रंग अवलंबून नाही, असे त्यांनी दाखविले. या प्रयोगांच्या फलिताचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी  निरनिराळ्या रंगांना संवेदनशील असलेल्या किमान तीन स्वतंत्र प्रतिमाकारक यंत्रणा आहेत आणि प्रत्यक्ष दिसणारा रंग दर्शविण्यासाठी या यंत्रणा संयुक्तपणे कार्य करतात, असे प्रतिपादन केले. या यंत्रणांना ‘रेटिनेक्स’ असे नाव त्यांनी सुचविले. पुढे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या संशोधकांनी डोळ्याच्या दृक्‌ पटलातील वर्णपटीय प्रणालीद्वारे प्रकाश व रंग यांची संवेदना नियंत्रित केली जाते हा पूर्वीचा समज चुकीचा असून ती मूलतः  मेंदूद्वारेच नियंत्रित केली जाते, असे दाखविले.

पोलरॉइड कॉर्पोरेशनच्या स्थापनेपासून लँड हे तिचे अध्यक्ष, मंडळाचे अध्यक्ष व संशोधन संचालक होते. त्यांनी १९७५ मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला पण मंडळाचे अध्यक्ष, संशोधन संचालक व प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून काम पुढे चालू ठेवले. १९८५ पावेतो त्यांनी या पदांचेही क्रमाक्रमाने राजिनामे दिले. मात्र प्रकाश व रंग यांसंबंधीच्या संशोधन क्षेत्रात ते रोलंड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत कार्य करीत राहिले. ही संस्था संशोधन केंद्र म्हणून लँड यांनीन १९६० मध्ये स्थापन केलेल्या रोलंड प्रतिष्ठानाच्या मदतीने चालविली जाते. या संस्थेचे ते अध्यक्ष व संशोधन संचालकही होते.

लँड यांना प्रकाश व प्लॅस्टिक यांसंबंधीच्या शोधाबद्दल पाचशेहून अधिक एकस्वे (पेटंटे) मिळाली. हार्व्हर्ड विद्यापीठातून ते पदवीधर झाले नाहीत, पण त्यांना दहाहून अधिक विद्यापीठांनी सन्माननीय पदव्या दिल्या. त्यांनी मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (१९५६), सायंटिफिक रिसर्च सोसायटी ऑफ अमेरिका (१९६३-६४), हार्व्हर्ड विद्यापीठ (१९६६-६७, १९७४) या संस्थांत अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले. ते अमेरिकेच्या अध्यक्षांच्या विज्ञान सल्लागार समितीचे अनेक वर्षे सदस्य होते. त्यांना मिळालेल्या अनेक बहुमानांत अध्यक्षांचे मेडल ऑफ फ्रीडम (१९६३), नॅशनल मेडल ऑफ सायन्स (१९६७), नॅशनल इन्व्हेंटर्स हॉल ऑफ फेमचे सदस्यत्व तसेच ब्रिटिश फिजिकल सोसायटी, रॉयल फोटोग्राफिक सोसायटी, अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस वगैरे कित्येक संस्थांची पदके यांचा अतंर्भाव होता. नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस व नॅशनल ॲकॅडेमी ऑफ एंजिनिअरिंग या संस्थांचे ते सदस्य होते. ऑप्टिकल सोसायटी ऑफ अमेरिका, जर्मन फोटोग्राफिक सोसायटी, सोसायटी ऑफ फोटोग्राफिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ जपान वगैरे अनेक वैज्ञानिक व तांत्रिक संस्थांनी त्यांना सन्माननीय सदस्यत्व बहाल केले. ते रॉयल इन्स्टिट्यू शन ऑफ ग्रेट ब्रिटनचे सन्माननीय सदस्य (१९७४) व रॉयल सोसायटीचे परदेशी सदस्य (१९८६) होते.

ते केंब्रिज, मॅसॅचूसेट्स येथे मृत्यू पावले.

मिठारी, भू. चिं.