लपंडाव : लहान मुलांचा सुलभ, मनोरंजनात्मक खेळ. या खेळात विशेष नियम, नियंत्रक, स्पर्धा वगैरे तांत्रिक बाबी फारशा नसतात. एखाद्या घरातील वा शेजारपाजारच्या घरांमधील परस्पर परिचित मुलेमुली वाड्यात, अंगणात वा मोकळ्याशा जागेत हा खेळ खेळतात.
खेळाचा प्रारंभ राज्य कुणावर यानुसार ठरतो. कुणी राज्य घ्यायचे, हे ठरविण्यासाठी चकणे हा प्रकार केला जातो. तीन मुले एकत्र होतात हात घालून उभी असतात. ‘एक,दोन, तीन’ किंवा ‘रामराई साई सुट्ट्यो’ म्हणतात व त्याचबरोबर प्रत्येकजण आपले हात एकमेकांवर पालथेटाकतात. ज्याचे तळवे एकमेकांवर आहेत हा एक प्रकार व ज्याचे तळवे एकमेकाकडे तोंड करून टाळी वाजविल्यासारखे आहेत हा दुसरा प्रकार, तिघापैकी ज्या एकट्या गड्याचा प्रकार वेगळा असेल तो सुटला. या सुटलेल्या गड्याने ‘मी सुटलो’, म्हणून सहज जरी छातीला हात लावले तरी ‘जळला’ मानतात. त्याने परत ‘उतरावे’ महणजेच चकण्यात भाग घ्यावा लागतो. जळण्याचा प्रकार टाळण्यासाठी दोन्ही हात पायांखालून काढण्याचा प्रघात आहे. जो सुटला आहे तो इतरांसाठी परत चकू शकतो.
ज्याच्यावर राज्य आले, त्याला एका विशेष जागी उभे करतात किंवा बसवतात. त्याच्या मागे उभे राहून एकजण त्याचे डोळे घट्ट झाकतो. एखादा खांब किंवा झाड वा राज्य आलेल्या खेळाडूचे डोळे झाकणारी व्यक्ती याला ‘भोज्या’ म्हणून ठरवितात. एव्हाना बाकीची मुले वा खेळगडी लपण्यास जातात. जो डोळे झकतो, त्यास गुजराती मध्ये ‘डाई’ म्हणतात. मुले लपल्यावर डाई सर्वाना ऐकू जाईल अशा रीतीने ‘डाई मिठीचा घोडा पाणी पि…तो, साई सुट्यो’ असे म्हणतो व राज्य आलेल्या खेळाडूस डोळे उघडून लपलेल्या मुलांना शोधण्यास सोडतो. तो कोण कुठे लपलेय हे शोधून काढत असताना, लपलेल्या प्रत्येकाने त्याला शक्यतो न दिसता, त्याने आपणाला शिवण्यापूर्वीच भोज्याला शिवायचे असते. म्हणजे मग तो वाद होत नाही. पूर्वीची मोठी कुटुंबे, मोठे वाडे, एक तर अंधेरे असत. त्यात आजघर-माजघर, पडवी-ओसरी, ओसरीवर कुठे कणग्या, पोती, माळा, माळवदे अशा अनेक जागा लपण्यास असत. या खेळात राज्य आलेल्या खेळाडूने दोनतीन जणांना बाद केले म्हणजे शोधून काढले तर जे बाद झालेत त्यांची गुप्त नावे ठेवून ‘कुणी घ्या चंद्र, कुणी घ्या सूर्य, कुणी ध्रुव’ अशी त्यांची मागणी करतात.ज्या नावाबद्दल मागणी करण्यात येत नाही, त्याच्यावर राज्य येते व परत खेळ सुरू होतो.
गुजरातमध्ये ‘टिल्लो’ नावाचा लपंडावाचा एक प्रकार रूढ आहे. त्यात लपणारा आणी शोधणारा असे दोन संघ असतात. लपणाऱ्या संघाचा नायक दुसऱ्या संघास एखाद्या पाला आणावयास पाठवतो व दरम्यान सर्व गडी लपून बसतात. आणलेला पाला शोधणाऱ्या सर्व गड्यांच्या हाती दिला जातो. शोधणारा गडी सापडलेल्यास तो पाला हुंगावला लावतो. पकडणारा आपल्या पुढून गेला की लपणारी मुले ‘आटी लागे पाटी लागे बोल बेटा टिल्लो’ असे ओरडतात. त्यामुळे गडी कुठे लपले आहेत हे समजून पकडणारे तिकडे पळतात. लपणारे तेथून दुसरीकडे पळतात. त्यात काही सापडतात. अशा रीतीने लपणाऱ्या संघाचे सर्व गडी शोधून काढून त्यांना पाला हुंगायला लावला की शोधणाऱ्या संघाचे काम संपते. मग डाव बदलतो. पकडणारा संघ लपायला जातो व लपणारा शोधायला जातो. अशा प्रकारे हा खेळ चालतो.
लपंडावाचे आधुनिक रूप : (डबा ऐसपैस). आजच्या औद्योगिक काळात मोठ्या वाड्यांची शहरातील संख्या बरीच कमी होत आहे. त्याऐवजी सामूहिक गृहवसाहती निर्माण होत आहेत. अशा ठिकाणची लहान मुलेमुली एकत्र योतात. एक कुणीतरी मुलगा इतरांच्या पाठीवर बोटांच्या स्पर्शाने संख्या काढतो. ही संख्या ज्याने ओळखली, तो सुटला. पण जाला ही संख्या ओळखता येतनाही तो राजा होतो. त्याच्यावर राज्य येते. लपण्याच्या जागांचा साधारण मध्यभागी एक पत्र्याचा डबा ठेवण्यात येतो. जाच्यावर राज्य आहे त्याने डब्याजवळ उभे राहायचे. लपलेला प्रत्येकजण जाच्यावर राज्य आहे त्याला चुकवून डब्याला पायाने उडवून देण्याचा प्रयत्न करतो. अशा एखाद्याने धावत येऊन डब्याला उडवून देऊन ओरडायचे ‘डबाऐसपैस ?’ मग मात्र प्रत्यकाने राजाला न दिसता डब्यापर्यंत येण्यास हरकत नसते. राजाने डब्याच्या जवळ उभे राहून एकेकाचे नाव घेऊन तो कुठे लपला आहे हे सांगावे. असे एखाद्याचे नाव सर्वप्रथम सांगितले गेले, तर पुढील डावात त्याच्यावर राज्य येते आणी खेळ पुन्हा सुरू होतो.
आलेगावकर, प. म.
“