लघुलेखन : ही एक लेखनपद्धती असून तिला लघुलिपी, आशुलेखन, शीघ्रलेखन, शीघ्रलिपी इंग्रजीत ‘शॉर्टहँड’ किंवा ‘स्टेनॉग्रफी’ अशीही निरनिराळी नावे आहेत. बोलण्याला कायम स्वरूप आणण्यासाठी लेखकला निर्माण झाली आणि बऱ्याच भाषांसाठी वेगवेगळ्या लिपी बसवल्या गेल्या परंतु लेखन जलद व्हावे यासाठी विशेष कामापुरत्या वापरावयाच्या वेगळ्या लेखनपद्धती व लिपी बसवलेल्या गेल्या :
(१) एऱ्हवी वापरायच्या लिपीत बदल करून बसवलेल्या लिपी : उदा., मोडी, महाजनी, कायथी या भारतामधील कारकुनी लिपी, ‘शिकस्ता’ ही इराणमधील व भारतामधील कारकुनी लिपी.
(२) अक्षराच्या वळणात संक्षेप आणि स्पेलिंगमध्ये संक्षेप आणून बसवलेल्या लिपी : उदा., एमा डीअरबॉर्न हिने अमेरिकेत १९२४ साली काढलेली ‘स्पीड्रायटिंग लिपी, जिच्यात ‘each हा शब्द eC असा लिहिला जातो.
(३) स्वतंत्रपणे याच कामासाठी पण त्या त्या भाषेसाठी बसवलेली लिपी : उदा., आज ब्रिटनमध्ये व भारतात प्रचलित असलेली व आय्झाक पिट्मनने इंग्लंडमध्ये १८३७ साली काढलेली पिट्मन-शॉर्डहँड लिपी किवा आज अमेरिकेत प्रचलित असलेली व जॉन रॉबर्ट ग्रेगने इंग्लंडमध्ये १८८५ साली पिट्मन पद्धतीतील दोष दूर करण्यासाठी काढलेली ग्रेग-शॉर्टहँड.
श्रुतलेखन (डिक्टेशन) करण्यासाठी बोलणारा थांबत थांबत, जरूर तर पुनरुक्ती करत बोलतो. हे टाळून बोलणाराचा ओघ न अडवता, मजकूर बिनचूक व जलद लिहून घेण्याची गरज अनेक ठिकाणी उत्पन्न होते. उदा., अधिकारी-कारकून, वक्ता-वार्ताहर, शिक्षक-विद्यार्थी, रंगभूमीवरील नट-श्रोता (शेक्सपियरची काही नाटके तरी या पद्धतीने वाचकांना उपलब्ध झाली). नंतर या मजकुराचे नेहमीच्या लिपीत (लाँग्हँडमध्ये) पुनर्लेखन किंवा टंकलेखन करता येईल. तर अशी ही गरज भागवण्यासाठी निर्माण झालेल्या लघुलिपीचा आणखी एक उपयोग म्हणजे स्वतःचा मजकूर स्वतःच जलद आणि विचारांचा ओघ खंडित न करता लिहिण्यासाठी होऊ शकेल, उदा., जुलिअस सीझरची लढाईवरची टिपणे, सॅम्युएल पेपिसची दैनंदिनी, जॉर्ज बर्नार्ड शॉची नाटके ही लघुलेखनाने लिहिली गेली.
एखादी लघुलिपी बसवताना किंवा शिकताना/शिकविताना तिच्या दोन अंगाचा विचार करावा लागतो :
(१) तिचा भाषेशी जोडलेला सांधा (स्पेलिंगशी? उच्चारलेले वर्ण वा वर्णसमूह यांच्याशी? शब्द वा शब्दसमूह यांच्याशी? किंवा या तत्त्वांचा कमीअधिक संकर करून?)
(२) तिचा आपल्या हातांच्या आणि डोळ्यांच्या चपळाईची संबंध (रेषा ही टिंबे? रेषा सरळ की वक्र ? लेखणी कुठे उचलायची? रेषांचे जोड सलग की टोकदार? रेषा उभी, आडवी, की तिरपी? ती कुठून सुरू करून कुठे संपवायची? आखूड-लांब फरक पाळायचा की सोडायचा? जाड-बारीक फरक (शेडिंग) पाळायचा की सोडायचा ओळीच्या वर-खाली हा फरक (पोझिशनिंग) पाळायचा की सोडायचा?).
लघुलिपीची उपयुक्तता अजमावताना दोन अंगांनी विचार करावा लागेल :
(१) शिकण्यासाठी सुलभता (स्वतःची स्वतः शिकता येते? किती वेळात? वेग वाढण्यासाठी किती वेळ सराव?).
(२) वापरण्यासाठी सुलभता (बिनचुकपणा टिकवून किती वेगाने? स्वतःची स्वतःच फक्त वाचता येते? वाचायला भाषाज्ञान किती लागते?).
लघुलिपीची उपयुक्तता वाढविण्यासाठी निरनिराळ्या तरतूदी करता येतात. उदा., चिन्हांची आणि नियमांची संख्या कमी करणे,परिचित साध्या लिपीशी किंवा लघपलीपीशी साम्य ठेवणे, स्पेलिंगपेक्षा उच्चाराला महत्व देणे आणि वारंवार वापरायचे (हाय-फ्रीक्वेन्सी) शब्दघटक, शब्द, शब्दसमूह (मराठीत ‘चा’, ‘आणि’, ‘या रीतीने’) यांना संक्षिप्त चिन्हे देणे, लेखणी कमी वेळा उचलण्याची गरज ठेवणे, वाचकाच्या भषाज्ञानावर भिस्त ठेवून बारकावे दुर्लक्षित ठेवणे (मोडी लिपीत इ/ई, उ/ऊ भेद दुर्लक्षित), जाड-बारीक फरक किंवा वर-खाली फरक असे बारकावे वापरणे (पिट्मन पद्धतीत) किंवा मुद्दाम टाळणे (ग्रेस पद्धतीत) इत्यादी. आज पिट्सन इंग्रजित सामन्यतः वेग मिनिटाला १००-२०० शब्द राहतो, मराठीत ६०-१०० शब्द राहतो. (भारतीय भाषांत चाचण्या घेताना ६०, ८०, १०० आणि १२० शब्द अशा श्रेणी मानतात.)
कृ. सा. न. वि. वि.
आपले मागणीपत्र मिळाले, मजकूर समजला. कच्चा मालाच्या किंमती वाढवल्यामुळे व सर्व खरेदी रोखीने करावी लागत असल्यामुळे नाईलाजाने आम्ही उधारीचे बहुतेक सर्व व्यवहार बंद केले आहेत. केवळ आपल्याच बाबतीत आम्ही अपवाद करीत आहोत असा गैरसमज आपण कृपया करून घेऊ नये. सर्व महाराष्ट्रात आमच्या मालाची बाजारातील मागणी विचारात घेता आपण आमच्या मालासाठी गुंतवलेली रक्कम फार काळ गूंतून पडणार नाही. तरी वरील परीस्थितीच्या विचार करता आमची अशी विंनती आहे की आपण रू. २५०/- आगाऊ पाठवावेत म्हणजे आमच्या पद्धतीस बाध येणार नाही व माल धाडणे सोईचे होईल. कळावे. लोभ असावा ही विनंती.
आपला नम्र,
प्राचीन ग्रिसमध्ये झेनोफन याने सॉक्रेटीसच्या आठवणी लघुलिखीत केल्याची नोंद आहे. प्राचीन रोममध्ये टायरोने इ. स. पू. ६३ मध्ये टायरोनियन लघुलिपी काढली, ती सु. हजार वर्षे चालून लुप्त झाली. अर्वाचीन काळात इंग्लिश लोक व्यापारी राष्ट्र बनल्यावर लघुलेखनात लक्ष घालू लागले. टिमथी ब्राइटची ‘कॅरक्टरी’ (१५८८), जॉन विलिस (सतरावे शतक), सॅम्युएल टेलर (१७८६), पिट्मन, ग्रेग, डीअरबॉर्न ही या क्षेत्रातील काही ठळक नावे होत. ज्यांचा आंतरराष्ट्रीय प्रसार झाला, अशा पद्धती म्हणजे पिट्मन,ग्रेग, डिअरबॉर्न तसेच जर्मनीचा फ्रांट्स गाबेल्स बेर्गर (१८३४) यांच्या पद्धती. कोणत्याही यशस्वी पद्धतीत सुधारणा होत राहतात. उदा., पिट्मन संस्थेने ‘पिट्मन २०००’ ही शिकायला आणि लक्षात ठेवायला अधिक सोपी पद्धती काढली आहे (१९७५ ). लघुलेखनाची उपयुक्तता पटल्यामुळे अमेरिकेत (१८९३ नंतर) आणि नंतर इतर देशांत तो विषय शाळेत शिकवला जाऊ लागला.
भारतामध्ये आर्वाचीन काळात सु. १८७० पासून पिट्मन शॉर्टहँड लिपीवर कमी किंवा अधिक संस्कार करून ती भारतीय भाषांसाठी वापरण्याचे प्रयत्न चालू झाले. मराठीत पहिला प्रयन्त भुजंगराव मानकर ( मुबई, १८९५) यांचा. स्वातंत्रप्राप्ती आणि भाषावार प्रांतरचना यांमुळे या प्रयत्नना गती मिळाली आणि प्रत्यक्ष वापर वाढला. शासनाने कोणती लघुलिपी याचेबंधन न घातल्यामुळे संशोधनाला वाव मिळाला. मराठी लघुलेखनाच्या विशेष प्रचारात आलेल्या पद्धती म्हणजे म. ना. दामले (१९६२ ), महाराष्ट्र शासनाचे भाषा संचनालय (१९६३ ) व ग. वि. लिमये (१९७५) यांच्या पद्धती. शिवाय उदयन आमडेकर (१९५५), श्री. वा. भागवत (१९८७) यांच्या पद्धतींचा उल्लेख करता येईल. हिंदी लघुलेखनाच्या विशेष प्रचारात असलेल्या पद्धती म्हणजे ऋषिप्रणाली (ऋषिलाल अग्रवाल, १९३८), सिंहप्रणाली (सरजू प्रसाद जैन, १९३९), न. गं. देशपांडे यांची पद्धती (१९६५) आणि महाराष्ट्रात लिमये लिपी शिकवणे १९३७ नंतर बंद पडले.
लघुलेखनाचे यांत्रिकीकरण करण्याचा सुरूवातीचा प्रयत्न म्हणजे स्टेनोटाइप यंत्र (१९२२). पुढची पायरी म्हणजे श्रुतलेखनाचे यांत्रिकीकरण-डिक्टाफोन यंत्र (१९३९) हा सुरूवातीचा प्रयत्न. यात ध्वनिमुद्रणामुळे लघुलिपीची आणि लघुलेखकाची गरज रहात नाही. वोलणे आणि साध्या लिपीत लिहिणे/टंकलेखन या क्रिया भिन्न ठिकाणी, भिन्न वेळी होऊ शकतात. याच्याही पुढची पायरी म्हणजे ध्वनिमुद्रण आणि टंकलेखन यांमधला टंकलेखर हा दुवा काढून टाकणे. स्टेनोटाइप यंत्राचा हा सर्वस्वी नवा अवतार. त्याला ‘स्पीचरायटर’ ही म्हणतात. अर्थात या नव्या व्यवस्थेत बोलणाऱ्याच्या भाषाकौशल्याची कसोटी लागते. उदा., तो श्रुतलेखन देत असला, तर शब्दयोजना रेखीव लागते. उलट जुन्या म्हणजे लघुलेखनाच्या व्यवस्थेत लघुलेखकाचे भाषाकौशल्य प्रत्ययाला येऊ शकते. अमेरिकन काँग्रेसच्या एका लघुलेखकाने म्हटल्याप्रमाणे, ही लघुलेखक मंडळई इतक्या चोखपणे ऐकलेल्या मजकुराचे ‘संपादन’ करतात, की वक्ता समजतो की आपणच किती रेखीव बोलतो!तेव्हा या नव्या शोधामुळे लघुलेखक वर्गाला खरोखर रजा द्यायची का याचा विचार पडेल.
संदर्भ : 1. Bhagvat, S. V. Phonemic Frequencies in Marathi and Their Relation to Developing a Speed-Script, Pune, 1961.
2. Butler E. H. The Story of British Shorthand, New York, 1951.
3. Giatte, H. Shorthand Systems of the World, New York, 1959.
४. दामले, म. ना. मराठी लघुलिपी आणि मार्गदर्शक, दोन भाग, मुंबई, १९६२, १९६५ एकत्रित १९७५.
५. भाषा संचालनालय, संपा., मराठी लघुलेखन, मुंबई, १९६३.
६. लिमये, ग. वि. लिमये लघुलेखन लिपी, पुणे, १९७५.
केळकर, अशोक रा. लिमये, ग. वि.
“