लंडन, जॅक : (१२ जानेवारी १८७६-२२ नोव्हेंबर १९१६). अमेरिकन कथा-कादंबरीकर. जन्म सॅन फ्रॅन्सिस्को येथे. एका फिरस्त्या ज्योतिषाचा हा अनौरस पुत्र. पुढे त्याच्या आईने जॉन लंडन ह्या विधुराशी विवाह केला. त्याचेच ‘लंडन’ हे नाव जॅकला मिळाले. जगण्यासाठी लढण्याचे आणि धडपडण्याचे शिक्षण त्याला त्याच्या गरिबीमुळे मिळाले. तरुण वयात त्याने विविध प्रकारची कामे केली चोऱ्या केल्या तुरुंगवासाचा अनुभवही घेतला. शालेय शिक्षण त्याला वयाच्या चौदाव्या वर्षीच सोडावे लागले होते. पुढे सार्वजनिक ग्रंथालयांतून पुस्तके मिळवून त्याने स्वतःचे शिक्षण केले. चार्ल्स डार्विन, कार्ल मार्क्स, हर्बर्ट स्पेन्सर आणि नीत्शे ह्यांचे विचार समजून घेण्याचा प्रत्यत्न त्याने केला. कॅलिफोर्निया विद्यापीठातही त्याने प्रवेश मिळविला. परंतु तेथे तो टिकला नाही. सोन्याच्या खाणींच्या मागे लागून आपला भाग्योदय करून घेण्याचा त्याने प्रयत्न केला पण त्यात यश मिळाले नाही. त्यानंतर तो लेखनाकडे वळला. द सन ऑफ द बुल्फ (१९००-कथासंग्रह) हे त्याचे प्रसिद्ध झालेले पहिले पुस्तक. त्यानंतर द गॉड ऑफ हिज फादर्स (१९०१) व चिल्ड्रन ऑफ द फ्रॉस्ट (१९०२) हे त्याचे आणखी दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले आणि लेखक म्हणून त्याला लौकिक लाभला. ए डॉटर ऑफ द स्नोज ही त्याची पहिली कादंबरी १९०२ साली प्रकाशित झाली. पुढच्या चौदा वर्षांत आर्थिक अडचणी, कौटुंबिक कटकटी, अपयशी साहसे, अतिरिक्त मद्यपान आणि ढासळती प्रकृती ह्यांचा त्रास असूनही त्याने जवळपास ५० पुस्तेक लिहिली. परंतु जास्त प्रमाणात घेतलेल्या मॉर्फिनमुळे कॅलिफोर्नियातील ग्लेन एलेन येथे तो मरण पावला. त्याने आत्महत्या केली, असे मानले जाते.

द कॉल ऑफ द वाइल्ड (१९०३) ही त्याची कादंबरी अतिशय गाजली. बक नावाच्या एका कुत्र्याची ही कहाणी. कॅलिफोर्नियातून ह्या कुत्र्याला पळवून नेण्यात येते आणि हिमशकट (स्लेज) ओढणारा कुत्रा म्हणून त्याला योग्य ते प्रशिक्षण दिले जाते. आपल्या मालकाशी तो पूर्ण इमान ठेवतो आणि मालकाचा खून झाल्यनंतर वन्य जीवनाकडे वळतो. ह्या नाट्यमय कथेतून लंडन त्याला प्रिय असलेल्या गुणांचा -उदा., शौर्य आणि सामर्थ्य शत्रूंशी झगडून जगणे-गौरव करतो. व्हाइट फँग (१९०६) ह्या त्याच्या अन्य एका कादंबरीत एका माणसाळवलेल्या रानटी कुत्र्याची कथा आहे. आपल्या मालकाला वाचविण्यासाठी तो आपल्या प्राणांचे बलिदान करतो. सी वुल्फ (१९०४) ह्या त्याच्या अन्य एका कादंबरीत वुल्फ लार्सन हा ताकदवान, बेदरकार आणि कमालीचा व्यक्तिवादी कॅप्टन आणि त्याचा अंत त्याने रंगवला. मार्टिन ईडन (१९०९) ही त्याची कादंबरी आत्मचरित्रात्मक आहे. द रोड (१९०७) व जॉन बार्लिकॉर्न (१९१३) ह्या त्याच्या अन्य आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या. द आयर्न हिल (१९०७) ह्या त्याच्या कादंबरीतून भविष्यकाळात उभ्या राहिलेल्या फॅसिझमची चाहूल लागते.

वयाच्या सतराव्या-अठराव्या वर्षांपासूनच लंडनला समाजवादाचे आकर्षण होते परंतु त्याची जीवनशैली उधळ्या माणसाची होती. वंशश्रेष्ठत्वाचा तो पुरस्कर्ता होता. मेक्सिकन क्रांतीमध्ये अमेरिकेने केलेल्या हस्तक्षेपाला पाठिंबा दिल्यामुळे समाजवाद्यांबरोबर त्याचे जमेना. तो व्यक्तिवादीही होता. १९२० नंतर अमेरिकेत त्याची लोकप्रियता ओसरली. पहिला महायुद्धानंतर नवे लेखक तेथे पुढे आले. तथापि जागतिक पातळीवरील वाचकवर्गात तो लोकप्रिय राहिलेला आहे. सोव्हिएत युनियनमध्ये १९५६ साली त्याच्या लेखनाचे एक संकलन प्रसिद्ध करण्यात आले होते आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

कळमकर, य. शं.