लंगडी : एक क्रीडाप्रकार, विशिष्ट मैदानात काही खेळाडूंनी धावत फिरणे व एकाने आपल्या एका पायावर तोल सावरत, दुसरा पाय मागे उचलून, पळणाऱ्याचा पाठलाग करून त्याला स्पर्श करणे तर पळणाऱ्याने हुलकावण्या देत आपण बाद होणार नाही असा सतत प्रयत्न करणे, हे या खेळाचे स्थूल स्वरूप होय. थोडक्यात, लंगडी घालत शिवाशिवी खेळणे असा हा साधा खेळ असून तो मूलभूत मानवी हालचालींवर व बालकाच्या विकासाच्या टप्प्यांवर आधारित असल्याने, जगात बहुतेक सर्वत्र खेळला जातो. खेळ म्हणजे मानवी संस्कृतीचा उत्तम आविष्कार, हे तत्त्व या खेळातून प्रत्ययास येते. एऱ्हवी एका पायाने लंगडत जाणारा माणूस दोन पायांनी धावणाऱ्या माणसाला पकडणे शक्य नाही. पण या खेळात लंगडी घालणाऱ्याने पाच-सहा खेळाडूंना पकडल्याचे दृश्य दिसते.
साधारणपणे सहा-सात ते तेरा-चौदा या वयोगटातील मुलामुलींना हा खेळ योग्य आहे. या खेळाचे छोटेसे मैदान, कमीत कमी व साधे-सोपे नियम यांमुळे हा खेळ छोट्या मुलामुलींमध्ये विशेष आवडीचा ठरला आहे. आजकाल हा खेळ लहान मुलांसाठी प्राथमिक शाळांच्या आंतरशालेय स्पर्धेत घेतलेला आहे. त्याचे क्रीडांगण म्हणजे चारही बाजू समान असलेला एक चौरस असतो. त्याची सर्वसाधारण मापे अशी : ९ वर्षांखालील मुलांसाठी ९.१५ मी. चौरस ११ वर्षांखालील मुलांसाठी १०.६७ मी. चौरस व १३ वर्षांखालील मुलांसाठी १२.१९ मी. चौरस. क्रीडांगणाच्या एका बाजूजवळील कोपऱ्यावर प्रवेशाची खूण असते. या खेळाच्या सामन्यात एक लंगडी घालणारा व एक पळणारा असे दोन संघ असतात. प्रत्येक संघात ९ खेळाडू असतात. एकदा लंगडी व एकदा पळती असे प्रत्येक संघास दोन डाव मिळतात. एकूण २० मिनिटांचा खेळ होतो आणि पहिली १० मिनिटे झाली, की ४ मिनिटे विश्रांती असते. या खेळाचे साधारण नियम असे : लंगडी घालणाऱ्याने आपल्या शरीराचा कोणताही भाग जमिनीस लागू देऊ नये. एकाच पायावर लंगडीसाठी तोल सांभाळून रहावे. लंगडी घालणाऱ्याने धावणाऱ्यास स्पर्श केला, की तो बाद होतो. धावणारा धावताधावता क्रीडांगणाबाहेर गेला, की बाद होतो. लंगडी घालणारा मात्र क्रीडांगणाबाहेर जाऊ शकतो. लंगडी घालणाऱ्या खेळाडूने धावणाऱ्याला पायाने बाद करू नये.
धावण्याच्या क्रमामध्ये क्रीडांगणामध्ये एकेका वेळी तीन खेळाडू प्रवेश करतात. लंगडी घालणाऱ्या संघाचा लंगडी घालणारा पहिला खेळाडू बाहेर गेल्यावर दुसरा लंगडी घालणारा मैदानात प्रवेश करतो. कोणत्या क्रमाने लंगडी घालणार तसेच कोणत्या क्रमाने पळतीला जाणार, हे प्रत्येक संघाने गुणलेखकास प्रथमच सांगावे लागते. गुणदानाची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे, लंगडी घालणाऱ्याने बाद केलेल्या प्रत्येक खेळाडूबद्दल त्या संघास एक गुण मिळतो. पळतीच्या संघाचे सर्व नऊ खेळाडू बाद झाले, तरी लोण होत नाही. त्याचे कबड्डी वा इतर खेळांसारखे दोन गुण होत नाहीत. ज्या संघाने धावणाऱ्या संघाचे २० मिनिटांच्या सामन्यात जास्तीत जास्त खेळाडू बाद केले, तो संघ विजयी होतो. दोन्ही संघांच्या गुणांची बरोबरी झाली, तर ५/५ मिनिटांचा जादा वेळ देण्यात येतो. त्यानंतरही बरोबरी झाल्यास संपूर्ण सामना परत खेळावा लागतो. लहान मुलांच्या प्राथमिक हालचाली, तोल, वेळ, चपळपणा, दमदारपणा वाढविण्यासाठी हा खेळ अत्यंत उपयुक्त आहे. ‘अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळा’ने लंगडी, लगोऱ्या, विटीदांडू या खेळांचे नियम ही पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. (१९५८).
आलेगावकर, प. म.
“