रोलंड, हेन्री ऑगस्टस : (२७ नोव्हेंबर १८४८-१६ एप्रिल १९०१). अमेरिकन भौतिकीविज्ञ. अंतर्गोल ⇨ विवर्तन जालकाचा त्यांनी लावलेला शोध वर्णपट विश्लेषणात महत्त्वपूर्ण ठरला. रोलंड यांचा जन्म होन्झडेल, पेनसिल्व्हेनिया येथे झाला. ट्रॉय (न्यूयॉर्क) येथील रेन्सेलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून १८७० मध्ये स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी संपादन केल्यानंतर १८७२ मध्ये त्याच संस्थेत ते भौतिकीचे निदेशक व नंतर साहाय्यक प्राध्यापक झाले. १८७५ मध्ये त्यांची बॉल्टिमोर येथे नवीन स्थापन झालेल्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात भौतिकीच्या अध्यासनावर निवड झाली आणि तेथेच त्यांनी अखेरपावेतो संशोधन व अध्यापन केले.

यूरोपला भेट देण्यासाठी ते गेले असताना एच्. एल्. एफ्. फोन हेल्महोल्ट्स यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून रोलंड यांनी १८७६ मध्ये उच्च वेग असलेल्या विद्युत् भाराची चुंबकीय क्रिया विद्युत् प्रवाहाप्रमाणेच असते, असे दाखविले. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात त्यांनी सुधारित तापमापीय व कॅलरीमापीय पद्धती वापरून ⇨उष्णतेच्या यांत्रिकी तुल्यांकाचे अधिक अचूक निर्धारण केले. त्याचप्रमाणे ओहम या विद्युत् रोधाच्या एककाचे मूल्यही त्यांनी पुनर्निर्धारित केले. १८८५ मध्ये रोलंड यांनी विवर्तन जालकाकरिता दर इंचाला २०,००० पर्यंत (दर सेंटिमीटरला सु. ७,८७५) रेषांचे उत्कीर्णन करता येईल असे यंत्र बनविले. त्यानंतर त्यांनी अंतर्गोल पृष्ठांवर विवर्तन जालके तयार केली. लोलक व सपाट जालकांऐवजी या अंतर्गोल जालकांचा अनेक अनुप्रयोगांत वापर करण्यात येऊ लागला तसेच त्यांमुळे वर्णपटमापकांत जादा भिंगे व आरसे वापरण्याची गरज राहिली नाही. या जालकांचा वापर करून रोलंड यांनी यथार्थ वर्णपटमापन विकसित केले. त्यांनी सौर वर्णपटाचा छायाचित्रणाने बनविलेला आलेख सु. ११ मी. लांबीचा होता. त्यांनी तयार केलेल्या सौर वर्णपटातील तरंगलांबींच्या कोष्टकात हजारो सौर रेषांचा समावेश होता व हे कोष्टक कित्येक वर्षे  प्रमाणभूत संदर्भ म्हणून वापरले जात होते. वर्णपटाच्या छायाचित्रणासाठी विवर्तन जालक व कॅमेरा ठेवण्यासाठी उपयुक्त असे त्यांनी तयार केलेले आसन त्यांच्या नावाने ओळखले जाते. अनेक मूलद्रव्यांच्या प्रज्योत वर्णपटांचा त्यांनी पद्धतशीर अभ्यास केला. [⟶ वर्णपटविज्ञान].

रोलंड यांना मिळालेल्या अनेक बहुमानांत लंडनच्या रॉयल सोसायटीची रम्फर्ड व डेपर पदके उल्लेखनीय आहेत. ते अमेरिकन फिजिकल सोसायटीचे एक संस्थापक व पहिले अध्यक्ष होते. ते रॉयल सोसायटी व फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस यांचे परदेशी सदस्य आणि अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य होते. त्यांचे संकलित संशोधनकार्य १९०२ मध्ये फिजिकल पेपर्स या नावाने प्रसिद्ध झाले. ते बॉल्टिमोर येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.