रोमान्स भाषासमूह : इंडो-यूरोपियन भाषाकुटुबांच्या हिटाइट, संस्कृत-इराणी, ग्रीक, लॅटिन, जर्मानिक इ. शाखांपैकी काही (उदा., हिटाइट) नष्ट झाल्या, काहींचा विशेष प्रसार झाला नाही, तरी त्या टिकून राहिल्या (उदा., ग्रीक, आर्मेनियन इ.), तर काहींना उज्ज्वल भवितव्य लाभले (उदा., जर्मानिक, रोमान्स, भारतीय). या तिसऱ्या वर्गातल्या शाखा भौगोलिक दृष्टीने दूरदूरच्या प्रदेशांत पसरल्या, त्यांनी विपुल साहित्य निर्माण केले व इतिहासाच्या ओघात त्यांना फार मोठे सांस्कृतिक व राजकीय महत्त्व प्राप्त झाले. अर्थात स्थलकालपरत्वे या भाषांना भिन्नभिन्न रूपे प्राप्त झाली. या भिन्न रूपांचा एकत्रित विचार करताना त्यांना ‘समूह’ ही संज्ञा देण्यात येते. उदा., जर्मानिक भाषासमूह (जर्मन, इंग्लिश, डच इ.), इंडो-आर्यन (आर्य-भारतीय) भाषासमूह (मराठी, गुजराती, बंगाली, हिंदी इ.). याच न्यायाने ⇨लॅटिन भाषा मूळ प्रदेशाच्या बाहेर पसरून तिची जी परस्परभिन्न रूपे झाली, त्यांच्या समूहाला ‘रोमान्स भाषासमूह’ हे नाव देण्यात आले. [⟶ इंडो-यूरोपियन भाषाकुटुंब].

‘रोमान्स’ हा शब्द प्राचीन फ्रेंच ‘romanz’ (उच्चार ‘रोमान्स’) यावरून आलेला आहे.

इ. स. पू. अर्धशतकापासून चौथ्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत अस्तित्वात असलेले रोमन साम्राज्य लॅटिनच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. विशेषतः दक्षिण यूरोपातील विस्तीर्ण प्रदेशात तिचा प्रभाव पडला. रोमनांची शासनपद्धती, लष्करी संघटना यांचा यात फार मोठा वाटा आहे. आपण साहित्यग्रंथांतून जी अभिजात लॅटिन पाहतो, त्यापेक्षा लोकांच्या तोंडी असलेल्या, बाजारात, लष्करी छावण्यांत, परकीय प्रजाजनांशी होणाऱ्या व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या या भाषेचे रूप वेगळे, शिथिल (म्हणजे बाह्य संस्कारक्षम) व चैतन्यपूर्ण होते. या भाषेला लोक-लॅटिन अशी संज्ञा होती. साहित्यिक लॅटिन जरी उपलब्ध नसती, तरी या लोक-लॅटिनपासून आलेल्या भाषांची तुलना करून त्यांचे हे लौकिक आद्य रूप पुनर्घटित करणे आणि या भाषांचे एकमूलत्व सिद्ध करणे सहज शक्य होते.

लॅटिनची दोन महत्त्वाची रूपे होती : लेशियम या रोमच्या व त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशाची बोली आणि दक्षिणेकडील भागात बोलल्या जाणाऱ्या ऑस्को-अंब्रियन बोली. पण इतिहासकाळात लॅटिन (किंवा रोमन) बोलींनी एवढी प्रतिष्ठा प्राप्त करून घेतली, की त्यामुळे इतर बोलींचा संपूर्ण लोप झाला.

रोमन विजयामुळे यूरोपचा जो भाग रोमच्या वर्चस्वाखाली आला तिथे, म्हणजे ऱ्हाईन नदीच्या तीरापर्यंत लॅटिनचा प्रसार झाला. तिथल्या मूळ लोकांच्या बोली अर्थातच अतिशय भिन्न होत्या पण त्यातल्या बहुतेक बोली लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक प्रतिष्ठा आणि शासनसंघटनेचे कौशल्य पाठीशी असलेल्या रोमन जेत्यांच्या भाषेपुढे टिकाव धरू शकल्या नाहीत. मात्र या मूळ रहिवाशांच्या लॅटिनपूर्व बोलींच्या सवयीचा ठसा नंतर आत्मसात केलेल्या जेत्यांच्या या भाषेवर काही प्रमाणात उमटलेला आढळतो. त्यामुळे प्रादेशिक भेदांनुसार आपल्याला या भाषांत उच्चारवैशिष्ट्ये, व्याकरणवैशिष्ट्ये, मूळ भाषेतील काही शब्दांचे अवशेष आढळतात.


प्रमुख रोमान्स भाषांची जवळीक लक्षात येण्यासाठी पुढील तुलनात्मक कोष्टक पहा  :

लॅटिन 

इटालि. 

पोर्तु. 

स्पॅ. 

फ्रेंच 

रूमा. 

मराठी 

totus

tutto

todo

todo

tout

tot

सर्व 

niger

nero

negro

negro

noir

negrn

काळा 

viridis

verde

verde

verde

vert

verde

हिरवा 

homo

uomo

homen

hombre

homme

om

माणूस 

aurum

oro

ouro

oro

or

aur

सोने 

bos

bue

boi

buey

boeuf

bou

बैल 

septem

sette

sete

siete

sept

sapte

सात 

vita

vita

vida

vida

vie

viata

जीवन 

rez

re

rei

rey

roi

rege

राजा 

वर्गीकरण : रोमान्स समूहातील पाच भाषा आज राष्ट्रीय व साहित्यिक भाषा आहेत. त्या म्हणजे ⇨इटालियन भाषा, ⇨ फ्रेंच भाषा, ⇨ पोर्तुगीज भाषा, ⇨ स्पॅनिश भाषा व ⇨ रूमानियन भाषा, यांपैकी पहिल्या चार एकमेकींना लागून आहेत, तर रूमानियन ही या चौघींच्या क्षेत्रापासून बरीच दूर आहे. एकमेकींना लागून असणाऱ्या एकमूलक भाषांच्या सरहद्दी अनिश्चित असतात. अनेकदा त्यांच्यात संक्रमक भाषिक पट्टे असतात, जसे ते संस्कृतोद्‌भव भाषांच्या सरहद्दीवर आहेत. या न्यायाने पोर्तुगीज व स्पॅनिश, स्पॅनिश व फ्रेंच, फ्रेंच व इटालियन यांच्या दरम्यानही असे पट्टे आहेत, हे दिसून येते. 


 या भाषा आणि हे पट्टे पुढीप्रमाणे आहेत :

इटालियन : इटालियन ही भाषा इटलीच्या द्वीपकल्पात व तिच्या स्वामित्वाखालच्या शेजारच्या सिसिली इ. बेटांत बोलली जाते. भाषेच्या प्रवृत्तीला अनुसरून होणारे क्षेत्रभेद सोडले, तरी पुढील महत्त्वाचे उपभेद इटालियनमध्ये सापडतात :

सिसिलियन : सिसिलीत बोलली जाणारी बोली. खरे तर ही एक स्वतंत्र भाषाच आहे. पण साहित्यिक परंपरा नसल्यामुळे ती इटालियनवर अवलंबून आहे.

ऱ्हेटो-रोमन, त्याचप्रमाणे रुमांश व लॅडिन या बोली स्वित्झर्लंड व इटलीतील आल्प्सच्या खोऱ्यात बोलल्या जातात.

कॉर्सिकन : फ्रान्सच्या ताब्यातील कॉर्सिका बेटातले लोक ज्या बोली बोलतात त्या सर्व इटालियनच आहेत.

फ्रेंच : फ्रेंच भाषेचे दोन महत्त्वाचे भेद उत्तर फ्रेंच व दक्षिण फ्रेंच हे आहेत. उत्तर फ्रेंचच्या पॅरिस व त्या भोवतालच्या बोलीवर प्रमाण फ्रेंच आधारलेली आहे. याशिवाय पिकार्डी, नॉर्मंडी, लॉरेन इ. भागांतील बोली वैशिष्ट्ययुक्त आहेत. वॅलून हे रूप बेल्जियममध्ये, तर दुसरे एक स्वित्झर्लंडच्या फ्रेंच भाषिक प्रदेशात आहे.

संक्रमक पट्ट्यातील सर्वांत महत्त्वाचा पट्टा भूमध्य समुद्रालगतचा फ्रेंच प्रदेश आणि वायव्य इटलीचा आहे. याला ⇨प्रॉव्हांसाल भाषा हे नाव असून, त्यात एकोणिसाव्या शतकातील साहित्यसर्जनाच्या लाटेत फ्रेदेरीक मीस्त्राल हा नोबेल पारितोषिक विजेता कवी प्रसिद्धीला आला. पण एकंदरीत प्रॉव्हांसाल ही मुख्यतः केवळ बोलीच आहे.

स्पॅनिश : स्पॅनिश प्रदेशात ‘कॅटालन’ ही महत्त्वाची बोली पूर्व किनाऱ्यालगत असून तिचे उत्तरेकडील टोक फ्रान्समधील रुसीयों भागापर्यंत पसरले आहे. ही बोली निश्चितपणे स्पॅनिशची नसून तिचे फ्रान्सच्या दक्षिणेला असलेल्या बोलींशी साधर्म्य आहे.


पोर्तुगीज : मुळात स्पॅनिशशी जवळजवळ एकरूप असलेली ही भाषा स्वतंत्र राजसत्तेमुळे ठळकपणे बदलली आहे. स्पेनमधील ‘गॅलिशियन’ बोली स्पॅनिशपेक्षा पोर्तुगीजला अधिक जवळच्या आहेत.

रूमानियन : रूमानियन ही पहिल्या महायुद्धानंतरच्या रूमानियनाची भाषा होती. तिच्या काही बोलींची क्षेत्र यूगोस्लाव्हियात सापडतात. तर मॅसिडोनियातही काही बोली आहेत.

क्षेत्रविस्तार : वरील पाच स्वायत्त भाषांपैकी रूमानियन व इटालियन या स्वतःच्या क्षेत्राबाहेर फारशा पसरल्या नाहीत. पण पोर्तुगीज, स्पॅनिश आणि फ्रेंच या मात्र त्यांच्या राजकीय सत्तेखाली असलेल्या प्रदेशात पसरल्या. पोर्तुगीज ही ब्राझीलसारख्या खंडप्राय देशाची तर भाषा आहेत पण शिवाय आफ्रिकेतील आणि पॅसिफिकमधील काही वसाहतींत, त्याचप्रमाणे भारतातील गोवा व इतर पोर्तुगीज सत्तेखालील प्रदेशात प्रचलित होती. स्पॅनिशने तर मध्य व दक्षिण अमेरिकेत ब्राझील सोडून इतर देशांत आपले स्थान पक्के केले आहे आणि फ्रेंच भाषा ही कॅनडाच्या क्वीबेक प्रांतात इंग्रजीला प्रतिस्पर्धी भाषा असून, आफ्रिकेतील पूर्वीच्या वसाहती, मादागास्कर, मॉरिशस इ. प्रदेशांतही तिला प्रतिष्ठा आहे.  भारतात पाँडिचेरी व इतर भूतकालीन फ्रेंच प्रदेशातील तिचे अस्तित्व जाणवते. पाँडिचेरीत तर ती प्रयत्नपूर्वक जतन करण्याचे भारत सरकारचे धोरण आहे.

संदर्भ : 1. Cohen, Marcel Meillet, Antoine, Ed, Les Langues du Monde, Paris, 1954.

           2. Elcock, W. D. The Romance Languages, London, 1960.

           3. Meillet, Antoine, Les Langues dans I’ Europe nouvelle, Paris, 1928.

           4. Pei, Mario, The World’s Chief Languages, London, 1961. 

कालेलकर, ना. गो.