रोमन स्नानगृहे : प्राचीन रोमन साम्राज्यात इ.स. १ ले शतक ते ३०२ पर्यंत रोम व पाँपेई शहरांत अतिविशाल स्नानगृहे बांधली गेली. ह्या वास्तू केवळ स्नानगृहे म्हणून वापरल्या जात नव्हत्या किंवा कल्पिल्यादेखील नव्हत्या तर बहुजनसमाजातील लोकांना रंजनासाठी, गप्पागोष्टी करण्यासाठी, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी, तसेच क्रीडास्पर्धांसाठीदेखील अशा स्नानगृहांचा उपयोग केला जात असे. थोडक्यात, ह्या वास्तू सांस्कृतिक केंद्र म्हणून बांधल्या गेल्या.
रोमन सार्वजनिक स्नानगृहांना ‘थर्मी’ अशी संज्ञा होती. सर्वांत आद्य सार्वजनिक स्नानगृहे प्राचीन ईजिप्तमधील प्रासादांत अस्तित्वात असल्याचे उल्लेख जरी आढळतात, तरी त्यांचे अवशेष फार तुरळक आहेत व त्यांवरून त्या प्रकाराची नीटशी कल्पना येऊ शकत नाही. प्राचीन ग्रीकांच्या जीवनातही स्नानविधीला महत्त्व होते, ह्याचा काहीसा अंदाज ⇨नॉससच्या प्रासादातील (प्रारंभ इ. स. पू. सु. १७००) स्नानदालनांच्या अवशेषांवरून येऊ शकतो. मात्र रोमनांनी प्राचीन काळात जी भव्य स्नानगृहे उभारली, त्यांतूनच सार्वजनिक स्नानगृहप्रकाराची-म्हणजे ‘थर्मी’च्या वास्तुकल्पाची-प्रमाणभूत संकल्पना साकार झाली.
या स्नानगृहांची रचना उंच चौथऱ्यावर केली जाई व त्याभोवती भव्य भिंती कुंपण म्हणून बांधल्या जात. या वास्तुरचनेचे प्रामुख्याने तीन भाग पाडता येतील : (१) मुख्य वास्तू-प्रांगणाच्या मध्यभागी असलेल्या या वास्तूमध्ये मध्यवर्ती प्रमुख दालन व त्याभोवती समअक्षांवर स्नानगृहाच्या विविध दालनांची रचना केली जात असे. प्रथम कोमट पाण्याची खोली (टेपीडॅरियम), त्यातून गेल्यानंतर उष्ण पाण्याचे दालन (कॅलीडॅरियम) आणि दुसऱ्या बाजूला थंड पाण्याचे दालन (फ्रिजिडॅरियम)- तिथे बहुधा पोहोण्याचे तलाव असत. प्रत्येक दालनाच्या भोवती शरीरावरील घाम निथळू देण्याची वाफेची खोली (लॅकोनिकम) आणि कपडे बदलण्याचे दालन (ॲपोडायटेरिया), तसेच तेल, उटणी, अत्तरे लावून मालीश करून घ्यायची मसाज-खोली (अँक्च्युरिया) अशी दालने असत. ही सर्व दालने संगमरवर, काच, आरसे यांनी सुशोभित केलेली असत. (२) दुसरा भाग म्हणजे, या प्रमुख वास्तूभोवती मोठे प्रांगण बगिचासारखे सोडले जाई. त्यात वृक्षारोपण करीत. कारंजे, पुतळे, शिल्पे यांनी सजावट केली जाई. त्याच्याच काही भागावर बाजूला पायऱ्या करून, त्याचा बाह्य क्रीडागृहासारखा-शर्यतीसाठी बैठक म्हणून-उपयोग केला जाई (स्टेडियम). (३) तिसरा भाग म्हणजे, या प्रांगणाभोवतीच्या भव्य भिंतींमधील दालने. त्यांचा उपयोग व्याख्यानगृहे, दुकाने, प्रशिक्षणगृहे, सेवकांची निवासस्थाने अशा विविध प्रकारे केला जाई. वास्तूला या चौकोनी कडेवजा स्तंभावलींमुळे व कमानींच्या रचनेमुळे आगळे सौंदर्य व भव्यता प्राप्त होत असे.
रोममधील ‘थर्मी ऑफ कॅराकॅला’ (२११-२१७) नामक भव्य स्नानगृह ही या प्रकारातील श्रेष्ठ वास्तुरचना मानली जाते. सध्या ते भग्नरूपात अवशिष्ट असले, तरी एकेकाळी १,६०० व्यक्तींची स्नानाची सोय या वास्तूत केली होती. याची बाहेरची भिंत ३०० मी. X ३०० मी. लांब-रुंद होती. यावरून ह्या वास्तूच्या भव्यतेची कल्पना येऊ शकते. याशिवाय ‘बाथ्स ऑफ टायटस’ (इ. स. ८१), ‘बाथ्स ऑफ डोमिशन’ (इ.स. ९५), ‘ट्रेजन्स बाथ्स’ (सु. १००), ‘थर्मी ऑफ डायोक्लीशन’ इ. रोम शहरातील स्नानगृहे ही प्रमाणभूत वास्तुकल्पाची उल्लेखनीय उदाहरणे होत. पाँपेईमध्येही अशी स्नानगृहे होती.
ह्या स्नानगृहांच्या रचनेत रोमन वास्तुकारांनी आपले सर्व कसब पणाला लावलेले आढळते. कमानयुक्त चापाकृती छतरचना, सु. ३० मी. उंचीचे संगमरवरी स्तंभ, त्यांची शिल्पालंकृत शीर्षे, स्तंभावल्यांची प्रमाणबद्धता, चित्रांकित भव्य भिंती, वायुवीजन साधण्यासाठी केलेले खिडक्यांचे नियोजन, अतिभव्य दालने, प्रांगणे इ. वैशिष्ट्यांमुळे ही स्नानगृहे रोमन साम्राज्यातील सांस्कृतिक केंद्रेच मानली जातात.
संदर्भ : Wheeler, Mortimer, Roman Art and Architecture, London, 1946.
दीक्षित, विजय
“