रोझमेरी : (हिं. रसमारी इं. ओल्ड मॅन लॅ. रोझमेरीनस ऑफिसिनॅलिस कुल-लॅबिएटी). एक सुगंधी फुलझाड. हे सु. २ मी. उंच, सदापर्णी, काटक झुडूप मूळचे द. यूरोप, आशिया मायनर व उ. आफ्रिका येथील असून आता अनेक देशांत थंड जागी उद्यानांतून लावलेले आढळते. भारतात समशीतोष्ण हिमालयात व निलगिरी टेकड्यांत त्याची लागवड यशस्वी होण्यास तेथील हवामान सोयीचे असल्याचे आढळले आहे. द. भारतात येरकौड- शेवराय टेकड्यांत ते लागवडीत आहे. रोझमेरीनस या त्याच्या प्रजातीत एकूण तीनच जाती असून त्यांचे मूलस्थान भूमध्य सामुद्रिक प्रदेश आहे रोझमेरी त्या प्रदेशात शुष्क खडकाळ जागी जंगली अवस्थेत वाढते. हिचे खोड व पाने यांना दीर्घकाल टिकून राहणारा सुगंध असल्याने उद्यानांतून शेकडो वर्षे ती लागवडीत आहे. ह्या झुडपाला साधी, लांबट, अरुंद, अखंड, समोरासमोर, सु. २.५ सेंमी. लांब, वरून गर्द हिरवी व खालून पांढरी पाने येतात त्यांच्या किनारी बाहेर वळलेल्या असतात. त्यांच्या बगलेत आखूड मंजरीत [⟶ पुष्पबंध] फिकट निळी किंवा पांढरी व लहान फुले वसंत ऋतूत येतात त्यांतील मध व त्यांचा सुगंध यांमुळे त्यांवर मधमाश्यांची गर्दी जमते. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨लॅबिएटी किंवा तुलसी कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. फळात चार गुळगुळीत कपालिका (शुष्क व कडक सालीचे लहान भाग) असतात. सर्वांगावर सुगंधी, बाष्पनशील (उडून जाणारे) तैलयुक्त, प्रपिंडीय केस [⟶ प्रपिंडे] असतात. नवीन लागवड कलमे व बिया वापरून करतात. सु. १५ सेंमी. लांबीची कलमे रेतीयुक्त माती असलेल्या वाफ्यात सु. १० सेंमी. खोलवर पुरून ठेवतात मुळे फुटल्यावर त्यांची लागवड १२० सेंमी. अंतरावरच्या ओळीत परस्परापासून ४५ सेंमी. अंतरावर करतात.

रोझमेरी : (१) पानांफुलांसह फांदी, (२) फूल.रोझमेरीच्या पानांना आल्हादकारक सुगंध येतो परंतु त्यांची चव तिखट, काहीशी कडवट व कापरासारखी असते. त्यांपासून १.२% बाष्पनशील तेल मिळते, त्याला ‘ऑइल ऑफ रोझमेरी’ अथवा ‘रोझमेरी तेल’ म्हणतात व त्याचा उपयोग औषधांत व सुगंधी द्रव्याच्या उद्योगात करतात. हे तेल पाने, कोवळ्या फांद्या व फुलोरे यांपासून वाफेच्या साहाय्याने ऊर्ध्वपातन प्रक्रियेने काढतात. व्यापारी प्रमाणात ते स्पेनमधील जंगली वनस्पतीपासून मिळते थोड्या प्रमाणात फ्रान्स, डाल्मेशियन बेटे, ट्युनिशिया व मोरोक्को येथून मिळविलेल्या वनस्पतीपासून ते काढतात. भारताला आयात तेलावरच अवलंबून रहावे लागते. देठे काढलेल्या शुष्क पानांपासून उत्तम प्रतीचे तेल मिळते. ते फिकट पिवळे किंवा रंगहीन असते व त्याचा सुगंध पानांप्रमाणेच असतो. निलगिरी तेल, टर्पेंटाइन तेले इत्यादींची त्यात भेसळ करतात. तेलाचा उपयोग मुख्यतः स्वस्त सुगंधी द्रव्ये, साबण इत्यादींत करतात.

वनस्पतीचे सर्व भाग स्तंभक (आकुंचन करणारे) असून तंत्रिका तंत्रास (मज्‍जासंस्थेस) पौष्टिक व उत्तम दीपक (भूक वाढविणारे) असतात. तात्पुरते वंध्यत्व आणण्यास रोझमेरीचा चहा मध्य अमेरिकेत वापरतात. फुलोरे व पाने वायुनाशी, स्वेदकारी (घाम आणणारी), मूत्रल (लघवी साफ करणारी), सौम्य विरेचक (पोट साफ करणारी) उत्तेजक, दीपक आणि आर्तवजनक (मासिक स्राव सुरू करणारी) असतात. दम्यावर सुक्या पानांचा धूर घेतात. पानांचा काढा गर्भपातक आहे. रोझमेरी हे स्मृतिचिन्ह असल्याने वाङ्‌मय, दंतकथा व विजयोत्सव यांमध्ये तिला महत्त्व प्राप्त झाले आहे.

 संदर्भ : 1. Badhwar, R. L. Rao, P. S. Sethi, H. Some Useful Aromatic Plants, Delhi, 1964.

            2. C. S. I. R., The Wealth of India, Raw Materials, Vol. IX, New Delhi, 1972.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.