रा (रेवाफ्रा, री) : ईजिप्ती पुराणकथांमधील विश्वनिर्माता सूर्यदेव. प्रमुख मंदिर हीलिऑपोलिस येथे होते. प्राचीन ईजिप्तमध्ये विश्वव्यवस्थेविषयी पुराणकथा रचणाऱ्या पुरोहितांचे अनेक संप्रदाय होते. हीलिऑपोलिस हे अशा संप्रदायांपैकी एका संप्रदायाचे प्रमुख केंद्र होते. या संप्रदायाचा पुरोहितवर्ग प्रभावी असल्यामुळे ईजिप्तमधील जनमानसावर ‘रा’ चा प्रभाव मोठ्या प्रमाणात पडला. सुमारे एक हजार वर्षे तोच ईजिप्ती लोकांचा सर्वश्रेष्ठ देव होता. तो फेअरो राजांचाही अधिकृत देव होता. प्रत्येक फेअरो राजा स्वतःला त्याचा पुत्र व अवतार समजत असे.

रा या सूर्यदेवतेचे ब्रांझशिल्पराजपुत्राच्या स्वरूपात कमळातून जन्मणारे बालक, सूर्यमंडळाने मस्तक वेढलेला तरुण मनुष्य, मेंढ्याचे मस्तक असलेला मनुष्य इ. रूपांत तो आढळतो. युरेअस नावाच्या सर्पासह मस्तकाभोवती तेजोमंडल असलेला आणि ससाण्याचे मस्तक असलेला मनुष्य, हे त्याचे स्वरूप विशेष प्रसिद्ध आहे. प्रारंभी तो अनेक सूर्यदेवांपैकी एक होता परंतु पुढे त्याच्या उपासनेने इतर देवतांच्या उपासनांना व्यापले. त्यामुळे देवतांची रे-होरख्ते, ॲमन-रे, सेबेक- रे, मिन-रे इ. संमिश्र रूपे तयार झाली. याउलट, इतर देवतांचाही त्याच्यावर प्रभाव पडला, असे दिसते. उदा., होरसच्या प्रभावामुळे त्याला ससाण्याचे मस्तक प्राप्त झाले, असे दिसते.

 

पुराणकथेनुसार विश्वनिर्मितीपूर्वी ‘असत्’ म्हणता येईल असा ‘नन’ (वा ‘नु’) नावाचा आद्यसागर होता. त्याच्या उदरात चराचर सृष्टीची बीजे धारण करणारा ‘आतुम’ नावाचा देव होता. पुरोहितांनी प्रारंभीच्या काळापासूनच त्याचे ‘रा’ या देवाशी ‘आतुम-रा’ या स्वरूपात तादात्म्य मानले होते. विश्वनिर्मितीपूर्वी आतुम हा सागरातील एका कमळाच्या कळीमध्ये रहात होता. आपले तेज क्षीण होऊ नये म्हणून त्याने आपले डोळे मिटून घेतले होते. एके दिवशी ही अवस्था टाकून ‘रा’ च्या तेजस्वी स्वरूपात प्रकट झालेल्या त्याने ‘शू’ आणि ‘तेफ्नूट’ या देवदांपत्याला जन्म दिला. या दांपत्याने ‘गेब’ आणि ‘नट’ या दुसऱ्या दांपत्याला जन्म दिला. या दुसऱ्या दांपत्याने ⇨ओसायरिस व ‘इसिस’ आणि ‘सेत’ व ‘नेफ्थिस’ या दोन दांपत्यांना जन्म दिला. अशा रीतीने ‘रा’ हा हीलिऑपोलिस येथील देवतामंडळातील सर्व देवतांचा पूर्वज ठरतो. कथाकारांनी उत्तरकालात ‘रा’ या नावाचे स्त्रीलिंगी रूप बनवून ‘रात’ वा ‘इउसास’ ही त्याची पत्नी असल्याची कल्पना मांडली. सर्व प्राणिमात्रांची निर्मिती त्याच्या अश्रूंपासून झाल्याची कथा आहे. ईजिप्ती भाषेत एकाच शब्दाचे अश्रू व मानव असे दोन्ही अर्थ असल्यामुळे ही कथा तयार झाली असावी, असे अभ्यासकांना वाटते.

‘रा’ वृद्ध झाल्यावर यातुविधीत पारंगत असलेल्या इसिस या देवीने त्याला सर्पदंश घडविला. त्यानंतर विष उतरविण्याच्या निमित्ताने त्याच्या सामर्थ्याचे उत्पत्तिस्थान असलेले त्याचे गुप्त नाव जाणून घेतले आणि त्याद्वारे त्याचे राज्य बळकावले. लोकांनीही त्याच्याविरुद्ध बंड केले. त्याने आपल्या डोळ्याला हाथर या देवीचे रूप देऊन बंडखोरांवर पाठविले आणि लोकांचा नाश केला. सर्व मानवजात नष्ट होण्यापूर्वी त्याने आपला राग आवरला परंतु लोकांची कृतघ्नता पाहून तो स्वर्गात निघून गेला. तेव्हापासून दिवसाचे बारा तास तो आपल्या नौकेतून आपल्या राज्यात संचार करतो. रात्रीचे बारा तास तो अधोलोकात प्रवास करतो. त्याचा शाश्वत शत्रू ‘ॲपेप’ नावाचा सर्प असून, त्याचा हल्ला काही काळापुरता यशस्वी होतो, तेव्हा सूर्यग्रहण होते.

पहा : पुराणकथा.

संदर्भ :Aldington, Richard : Ames, Delano, trans, New Larousse Encyclopedia of Mythology,

          London, 1975.

                                    

साळुंखे, आ. ह.