रेन्ये, आंरी द : (२८ डिसेंबर १८६४–२३ मे १९३६). विख्यात फ्रेंच कवी. जन्म आँफ्लर येथे. राजनैतिक सेवेत शिरण्याच्या दृष्टीने रेन्येने पॅरिस येथे कायद्याचा अभ्यास केला. तथापि तेथे तो फ्रेंच प्रतीकवादी कवींच्या प्रभावाखाली आला आणि त्याने साहित्यक्षेत्राकडे वळावयाचे ठरविले. लांदमँ (१८८५), आपॅझमाँ (१८८६) आणि सीत (१८८७) ह्या त्याच्या आरंभीच्या काव्यसंग्रहांवर ‘ल् पार्नास’ ह्या कलावादी कविपरंपरेचा प्रभाव दिसतो. तसेच त्याच्या आरंभीच्या काव्यकृतींवर प्रतीकवादाचीही छाया आहे.

त्याच्या अन्य उल्लेखनीय काव्यसंग्रहांत एपिझॉद (१८८८), पोएम आंस्यां ए रोमानॅस्क (१८९०), तॅल काँ साँझ्य (१८९२), ला सिते देझो (१९००), ले मेदाय दार्जील (१९०२, इं. शी. क्ले मेडल्स), ला सांदाल ॲलँ (१९०६, इं. शी. द विंग्ड सँडल), ल मिर्वार देझर (१९०६ – १०) आणि व्हेस्तिजिया फ्लामे (१९२१) ह्यांचा अंतर्भाव होतो. ज्यऱ्युस्तिक ए दिव्हँ (१८९७, इं. शी. टफ अँड डिव्हाइन) हा त्याचा सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह. ह्या संग्रहापासूनच त्याच्या पृथगात्म काव्यप्रतिभेचा प्रत्यय येऊ लागला. फ्लाम्मा तेनाक्स हा काव्यसंग्रह त्याच्या प्रतिभेचा शेवटचा स्फुल्लिंग होय.

सहजता आणि घोटीव शिल्पासारखी शैली ही त्याच्या काव्यरचनेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत. ले मेदाय दार्जील आणि ला सिते देझो हे काव्यसंग्रह त्या दृष्टीने उल्लेखनीय होत. त्याचा कल प्रयोगशीलतेपेक्षा अभिजात परंपरेकडे अधिक होता. त्याचे काव्य तालबद्ध, संगीतमय आणि विविधतेने नटलेले आहे. आपल्या कवितेत तो फ्रेंच भाषेतील सुप्त संगीताचा पुरेपुर उपयोग करून घेतो. तसेच फ्रेंच काव्यपरंपरेतील विविध प्रवाहांचा सुरेख संगम त्याच्या काव्यात आढळतो.

रेन्येने काही कादंबऱ्याही लिहिल्या. ह्या कादंबऱ्यांतून भूतकालीन–विशेषतः चौदाव्या व अठराव्या शतकांतील इटलीची व फ्रान्सची–पार्शअवभूमी आढळते. त्याने लिहिलेल्या कादंबऱ्यांत ला दुब्ल मेत्रॅस (१९००), ला पयर दामूर (१९०७, इं. शी. फिअर ऑफ लव्ह), ला पॅशरॅस (१९१२, इं. शी. द सिनर) आणि ल् व्हॉयाज् दामूर (१९३०) ह्यांचा अंतर्भाव होतो.

फ्रेंच अकादमीने आपले सदस्यत्व देऊन त्याच्या साहित्यसेवेचा गौरव केला होता. पॅरिस येथे त्याचे निधन झाले.

टोणगावकर, विजया