रुडकी विद्यापीठ : उत्तर प्रदेश राज्यातील रुडकी येथील विद्यापीठ. प्रारंभी येथे टॉमसन अभियांत्रिकी महाविद्यालय होते. पुढे रुडकी विद्यापीठ अधिनियम १९४८ (उत्तर प्रदेश राज्य अधिनियम क्रमांक ९) अन्वये त्यास विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला (२५ नोव्हेंबर १९४९). विद्यापीठाचे स्वरुप निवासी व अध्यापनात्मक आहे. शैक्षणिक वर्ष जुलै ते मे असून त्यात दोन सत्रे असतात. अध्यापनाचे माध्यम इंग्रजी आहे. विद्यापीठात विज्ञान व तंत्रविद्या आणि अभियांत्रिकी या विद्याशाखा असून अभियांत्रिकी विभागाच्या सर्व शाखांमध्ये विद्यापीठाने विशेषीकरण साधले आहे.

बहिःस्थ परीक्षा, शिष्यवृत्त्या, विद्यावेतने, फी-माफी इ. सवलती विद्यापीठात उपलब्ध असून पाठनिर्देश पद्धती, अंतर्गत गुणांकन, रोजगार नियोजन व मार्गदर्शन केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण, वसतिगृहे, आरोग्यसेवा, विस्तारसेवा, कर्मशाला, निरंतर शिक्षण व गुणसंवर्धन कार्यक्रम तसेच अभियांत्रिकी विभागातील अन्य अद्ययावत् सोयी उपलब्ध आहेत. पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांतर्गत रासायनिक अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत् अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिकी व दळणवळण औद्योगिक अभियांत्रिकी, यांत्रिक अभियांत्रिकी, धातुविज्ञान, संगणक, वास्तुशिल्पशास्त्र तसेच पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमांतर्गत रासायनिक अभियांत्रिकी, प्रक्रिया अभियांत्रिकी आणि संयंत्र अभिकल्प, सांरचनिक अभियांत्रिकी, यंत्रणा अभियांत्रिकी व प्रचालन संशोधन, सूक्ष्मतरंग व रडार, वास्तुशिल्पशास्त्रीय अभिकल्प इ. विविध वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यांशिवाय अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी वास्तुकला, विज्ञान व तंत्रविद्या, भूकंप अभियांत्रिकी, संगणक विज्ञान व तंत्रविद्या, दूरदर्शन तंत्रविद्या, दूरदर्शन तंत्रविद्या, औद्योगिक व्यवस्थापन, वाहतूक अभियांत्रिकी, द्रवीय अभियांत्रिकी तसेच एम् एससी. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यासाठी स्वयंचलित संगणक इ. एक वर्षांचे पदविका अभ्यासक्रम विद्यापीठात उपलब्ध आहेत.

गुणांकन पद्धती हे विद्यापीठाचे वैशिष्ट्य असून तीत ७५% विशेष श्रेणी, ६५% प्रथम श्रेणी व ५०% द्वितीय श्रेणी असे विभाजन आढळते. पाठनिर्देशावर गुणांकन केले जाते. विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीचा तो एक भाग आहे.

विद्यापीठातर्फे स्पर्धा परीक्षा घेतल्या जाऊन रोजगार कार्यक्रमही राबविला जातो. सर्वसाधारणपणे ५०% गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय आणि खाजगी क्षेत्रांत सेवा उपलब्ध करून दिली जाते. उपान्त्य वर्षांत विस्तार प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जातो. विविध उद्योगसमूहांतील तज्ञांतर्फे त्यात सु. २० ते ३० व्याख्यांने दिली जातात. ह्या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकेही करून दाखविण्यात येतात. विविध शासकीय सेवाउद्योग व बँका यांच्यातर्फे उद्योगधंद्याच्या उभारणीसाठी देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीसंबंधीही त्यात मार्गदर्शन केले जाते.

अभियंते व अध्यापक यांसाठी कर्मशाला, निरंतर शिक्षण यांसारखे काही अल्प मुदतीचे अभ्यासक्रम विद्यापीठ राबविते. अभिकल्पविस्तार (डिझाइन डेव्हलपमेंट) तसेच संरचना, साधने व उपकरणे यांच्या चाचण्यांसंबंधीही मार्गदर्शन केले जाते.

विद्यापीठाच्या ग्रंथालयात २,०९,२६७ ग्रंथ व नियतकालिके उपलब्ध होती (१९८७-८८). याच वर्षी विद्यापीठात ५०० अध्यापक व २,६०० विद्यार्थी होते.

मिसार, म. व्यं.