रुबिएसी : (कदंब वा मंजिष्ठादी कुल). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ⇨रुबिएलीझ अथवा कदंब गणातील एक कुल. यामध्ये सु. ४५० प्रजाती आणि ५,५०० जाती असून त्या ⇨ओषधी, लता, झुडपे किंवा वृक्ष आहेत. त्यांचा प्रसार सर्वत्र आहे. समशीतोष्ण व ध्रुवीय प्रदेशांपर्यंत त्यांचा आढळ असला, तरी त्यांची जास्तीत जास्त संख्या उष्ण प्रदेशात आहे. त्यांची साधी पाने समोरासमोर असून कधी अनेकांचे एक वर्तुळ प्रत्येक पेऱ्यावर असते. त्यांना तळाशी अंतरावृंतीय (दोन देठांमधल्या जागेत) वा अंतर्वृंती (अक्ष व देठ यामध्ये) उपपर्णे (उपांगे) असतात. फुले द्विलिंगी, नियमित, ४-५ भागी (प्रत्येक पुष्पदलांच्या मंडलात ४-५ भाग असलेले), अपिकिंज किंवा अर्धवट अपिकिंज असून फुलोरे [⟶ पुष्पबंध] कुंठित, वल्लरी, चामरकल्प किंवा गुच्छासारखे (स्तबक) असतात. संदले अंशतः किंवा पूर्णतः जुळलेली, प्रदले (पाकळ्या) खाली जुळून त्यांची नलिका बनते आणि वर ती सुटी असतात, त्यामुळे पुष्पमुकुट नाळक्यासारखा (नसराळ्यासारखा), तुतारीसारखा किंवा समईसारखा दिसतो. केसरदले पाकळ्यांइतकी व त्यांना चिकटलेली असतात. किंजदले दोन व जुळलेली असून किंजपुट अधःस्थ किंवा अर्धअधःस्थ व त्यावर मांसल बिंब असते. किंजपुटात बहुधा दोन कप्पे व प्रत्येकात एक अधोमुख बीजक असते [⟶ फूल]. फळ विविध प्रकारचे म्हणजे बोंड, मृदुफळ, अश्मगर्भी (आठळीयुक्त) आणि कधी अनेक फुलांपासून बनलेले संयुक्त (उदा., बारतोंडी) असते. बिया सपुष्प (गर्भाबाहेरील अन्नांश असलेल्या) असतात. या कुलातील वनस्पतींचे ⇨परागण (पराग एका फुलांतून दुसऱ्यात नेणे) बहुधा कीटकांकडून होते. शरीरातील कित्येक कोशिकांत (पेशींत) सुईसारखे कॅल्शियम ऑक्झॅलेटाचे स्फटिक, टॅनीन, श्लेष्मल पदार्थ इ. असतात. या कुलात अनेक उपयुक्त वनस्पती (उदा. अळू, कॉफी, सिंकोना, अनंत, हॅमेलिया, कदंब, भुतकेस, बारतोंडी, मंजिष्ठ, डिकेमाली, पेंडगूळ, राईकुडा इ.) असून त्यांचा उपयोग भिन्न प्रकारे करतात.
जोशी, गो. वि.