रिल्के, रायनर मारीआ : (४ डिसेंबर १८७५−२९ डिसेंबर ११९२६). श्रेष्ठ जर्मन भावकवी. प्राग शहरी जन्मला. वयाच्या अकराव्या वर्षी त्याला लष्करी शाळेत दाखल करण्यात आले. तथापि तो अशक्त असल्यामुळे लष्करी शिक्षणाचा दगदग त्याला झेपली नाही. त्यानंतर लिट्स येथे तो व्यवसायप्रशासनाचे शिक्षण घेऊ लागला, परंतु तेही त्याला जमले नाही. प्राग येथील चार्ल्स विद्यापीठातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जर्मन साहित्य आणि कलेतिहास ह्या विषयांचा त्याने अभ्यास केला. काही काळ कायद्याचेही अध्ययन केले. १८९६ साली तो म्यूनिक येथे आला. आपल्याला साहित्यिक व्हावयाचे आहे, हे त्याने निश्चित केले होते. लेबेन उंट लीडर (इं. शी. लाइफ अँड साँग्ज) हा त्याचा काव्यसंग्रह १८९४ मध्येच प्रसिद्ध झाला होता.
१८९८ मध्ये रिल्केचा परिचय लो आंद्रेआस सालोमे ह्या स्त्रीशी झाला. तिचे वडील रशियन आणि आई जर्मन होती. तिच्यामुळेच रिल्केने रशियन संस्कृतीचा परिचय करून घ्यावयास सुरुवात केली. १८९९ मध्ये आणि नंतर १९०० साली तिच्याबरोबर तो रशियालाही गेला. रशियाने रिल्केला अत्यंत प्रभावित केले. आपले आंतरिक वास्तव आणि आपल्या भावनांचे आदर्श तेथे गवसल्याचा प्रत्यय त्याला आला. रशियात त्याची व टॉलस्टॉयची भेट झाली. त्या भेटीचाही त्याच्यावर फार प्रभाव पडला. तेथून परतल्या नंतर ब्रेमेनजवळील व्हॉर्प्सव्हेदू येथील कलावंतांच्या वसाहतीत तो राहवयास गेला. १९०१ मध्ये क्लारा वेस्टहॉप ह्या शिल्पकार युवतीशी तो विवाहबद्ध झाला. त्याच वर्षी ह्या दांपत्याने एका मुलीस जन्म दिला आणि ते विभक्त झाले. आपापल्या कलाक्षेत्रात स्वतःचा विकास करून घेण्याचा हेतू त्यामागे होता. १९०२ साली विख्यात फ्रेंच शिल्पकार ⇨रॉदँ ह्याच्यावर पुस्तक लिहिण्याच्या हेतूने रिल्के पॅरिसला आला आणि पुढील बारा वर्षे त्याने पॅरिसमध्ये घालविली. ह्या कालखंडात वर्षभर (१९०५-०६) त्याने रॉदँचा सचिव म्हणूनही काम केले. आपल्या आयुष्यात रिल्के यूरोपभर फिरला होता. स्पेन, इटली, डेन्मार्क, स्वीडन ह्या देशांमध्येही त्याचे वास्तव्य होते.
पहिले महायुद्ध सुरू झाल्यानंतर (१९१४) रिल्के जर्मनीत आला आणि १९१५ मध्ये ऑस्ट्रियन सैन्यात दाखल झाला. १९१६ साली युद्धसेवेतून मुक्त झाल्यानंतर तो स्वित्झर्लंडमध्ये राहू लागला. स्वित्झर्लंडमधील व्हॅलमाँट येथे त्याचे निधन झाले.
रिल्केच्या विशेष उल्लेखनीय साहित्यकृती अशा : काव्यसंग्रह-ट्राउमगेकोयण्ट (१८९७, इं. शी. ड्रीम-क्राउन्ड), मिअर त्सूर फायर (१८९९, इं. शी. इन माय ऑनर), दस ष्टुण्डेनबूख (१९०५, इ. शी. द बुक ऑफ अवर्स), नॉय गेडिश्ट (१९०७ आणि १९०८, इं. भा. न्यू पोएम्स १९६४), डी सोनेट आन् ओर्फेउस (१९२३, इं. भा. सॉनेटस टू ऑर्फीअस, १९४६) आणि डी डुइनेझर एलेगीएन (१९२३, इं. भा. डुइनो एलिजीज, १९६३).
गद्य : गोशिश्टेन फोम लीथेन गोट्ट (१९०४, इं. शी. टेल्स अबाउट द डिअर गॉड), आउगुस्त रोदॅ (१९०३, इ. भा. १९१९), डी आउफत्साशुन्गेन डेस माल्ट लाउरिडस ब्रिग (१९१०, इं. भा. द नोटबुक ऑफ माल्ट लाउरिडस विग, १९३०), डी वाइस फोन लीब उण्ट टोड डेस कोर्नेटस क्रिस्टोफ रिल्के (१९०६, इं. भा. द टेल ऑफ द अँड डेथ ऑफ कोनेंट क्रिस्टोफर रिल्के, १९३२).
रशियाभेटीच्या संस्काराने रिल्के गूढवादी आणि मानवतावादी बनला. विनम्रता, करुणा आणि बंधुभाव ह्या महान मूल्यांवर आधारलेल्या मानवतेचे स्वप्न त्याचे कविमन पाहू लागले. त्या दृष्टीने त्याचा द बुक ऑफ अवर्स हा काव्यसंग्रह विशेष उल्लेखनीय होय. रशियाच्या साम्यवादी स्वप्नांनीही त्याला स्फूर्ती दिली होती. रशियाने त्याच्या संवेदनशीलतेलाच एक परिणाम दिले. स्वप्नवृत्तीने भारलेल्या रिल्केच्या अगदी आरंभीच्या कवितांतूनही व्यापक सत्यांपर्यंत पोहोचण्याची धडपड दिसून येते. प्रेम, मृत्यू, निसर्ग, रतिभावना, वेदना अबोध मनातील भये, परमानंद ह्यांच्याशी संबधित अशा अनुभवसृष्टीचा तळ आपल्या अंतःप्रज्ञेने तो गाठतो. मनुष्यनिर्मित मिथ्यकथा आणि ईश्वरविषयक संकल्पना ह्यांच्या मागील मानसशास्त्रीय सत्य शोधण्याचा प्रयत्नही त्याने आपल्या कवितांतून केला, तसेच मध्ययुगीन प्रतिमासृष्टीला त्याने नवा भावाशय दिला. शिल्पकार रॉदँच्या सहवासात आल्यानंतर रिल्केवर वस्तुनिष्ठ, व्यक्तिनिरपेक्ष कलासंकल्पनेच्या प्रभाव पडला आणि तो न्यू पोएम्समधील कवितांतून प्रत्ययास येतो. परिपूर्ण घाट आणि गतिमान ही ईश्वराच्या अस्तित्वाची द्योतक आहेत आणि त्याची अभिव्यक्ती आपण कवितेतून घडवीत आहोत, अशी ह्या कवितांच्या निर्मितीमागील रिल्केची भूमिका होती. न्यू पोएम्समधील कवितांचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे त्यांत तत्त्वज्ञान, रूपण कला, संगीत आणि कविता ह्यांचे परिणामकारक संश्लेषण घडवून आणण्याच्या प्रयत्नर रिल्केने केलेला आहे. ‘सॉनेटस टू ऑर्फीअस’मध्ये वस्तू आणि शब्द ह्यांना एका नव्या, सर्जनशील नात्यात त्याने गुंफले आणि परिपूर्ण भावगेयतेचा एक आदर्श निर्माण केला. कोसळू लागलेल्या पारंपरिक व्यवस्थेच्या चौकटीत माणसाच्या व्यक्तिगत स्थितीकडे पाहण्याची एक नवी अंतर्दृष्टी डुइनो एलिजीजमधील प्रत्येक विलापिकेत आढळते. स्वतः रिल्केला ही आपली सर्वश्रेष्ठ काव्यकृती आहे, असे वाटे. डाल्मेशियन किनाऱ्यावरील द्वेनो डुइनो येथे वास्तव्य असताना ह्या संग्रहातील आरंभीच्या काही विलापिका त्याने रचिल्या होत्या. जीवन आणि मृत्तू हे एकाच व्यापक साकल्याचे भाग होत, अशी रिल्केची धारण होती विसंवादातही त्याने एकात्मतेचा प्रत्यय घेतला आणि ह्या विलापिकांतून तो सशब्द केला.
द नोटबुक ऑफ माल्ट लाउरिड्स ब्रिग ही रिल्केची आत्मचरित्रात्मक कादंबरी रिल्केला समजावून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. एक गरीब डॅनिश कलावंत हा ह्या कादंबरीचा नायक. जीवन आणि मृत्यू हे एका व्यापक साकल्याने भाग होत, ही रिल्केची भूमिका ह्या असांकेतिक कादंबरीत प्रत्ययास येते. मृत्यूप्रमाणेच प्रेम, ईश्वर ह्यांसारखे रिल्केचे मन व्यापून राहणारे विषयही ह्या कादंबरीत येतात. हा नायक रिल्केचा प्रति-स्व (अँटि-सेल्फ) मानला जातो. ह्या कादंबरीवर अस्तित्ववादी विचारांची छायाही आढळते.
टेल्स अबाउट द डिअर गॉडमध्ये रशियाने त्याच्या मनावर घडविलेले संस्कार दिसून येतात. परमेश्वराची संकल्पना मांडण्याचा प्रयत्न येथेही आहेच. ……..कोर्नेट क्रिस्टोफर रिल्केमध्ये एका तरुण लष्करी अधिकाऱ्याच्या जीवनातील अखेरच्या घडीचे, स्वच्छंदतावादी पद्धतीने केलेले चित्रण आहे. अनेकदा ते अतिनाट्यात्मकतेकडे झुकले.
रिल्केने बोडलेअर, स्तेफान मालार्मे, पॉल व्हर्लेअन ह्यांच्या साहित्यकृतीचे अनुवादही केले. इंग्रज कवयित्री एलिझाबेथ वॅरेट ब्राउनिंग हिच्या सॉनेट्स फ्रॉम द पोर्तुगीजचेही त्याने जर्मन भाषेत रूपांतर केले.
संदर्भ : 1. Belmore. H. W. Rilke’s Craftsmanship, Oxford, 1954.
2. Butler, E. M. Rainer Marla Rilke, Cambridge, 1941.
3. Graff, W. M. Rainer Maria Rilke, Creative Anguish of a Unmeditated Vision, New Haven, 1954.
4. Hartmann, Geoffry, The Unmeditated Vision, New Haven, 1954.
5. Mason, Eudo, Rilke, London, 1963.
6. Mason, Eudo, Rilke, Europe and the English Speaking World, Cambridge, 1961.
7. Peters, Heinz F. Rainer Mari Rilke : Masks and the Man, 1960.
8. Rose, William Craig-Houston, C. Rainer Maria Rilke : Aspects of His Mind and Poetry, London, 1938.
9. Webb, Karl E. Rainer Maria Rilke and Jugendstil : Affinities, Influences, Adaptation, 1978.
10. Wood, Frank, Rainer Maria Rilke : The Ring of Forms, Minneapolis, 1958.
11. Wydenbruck, Nora, Rilke, Man and Poet, London, 1949.
कुलकर्णी, अ. र.
“