रॉय, सुकुमार : (३० ऑक्टोबर १८८७−१० सप्टेंबर १९२३). प्रख्यात बंगाली बालसाहित्य लेखक व संदेश (स्था. १९२१)या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक. सध्याच्या बांगला देशातील मैमनसिंग जिल्ह्यातील माशुजा गावी जन्म. पिता उपेंद्र किशोर रॉय. सुकुमार हे अतिशय बुद्धिमान विद्यार्थी होते. दोन विषयांत ऑनर्स घेऊन त्यांनी बी. एस्सी. पदवी घेतली. १९११ साली कलकत्ता विद्यापीठातून ‘गुरुप्रसन्न घोष’ शिष्यवृत्ती मिळवून ते इंग्लंडला गेले आणि तेथील ‘मँचेस्टर स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेतून छायाचित्रण व चित्रठसे (ब्लॉक्स) तयार करण्याची विद्या प्रथम श्रेणीत संपादन केली. उपेंद्र किशोर रॉय स्थापित ‘यू. रॉय अँड सन्स’ या कंपनीत ते व्यवस्थापक या नात्याने काम बघत.
सुकुमार रॉय हे फार लहान वयापासून लेखन करू लागले. केवळ आठ वर्षांचे असतानाच त्यांची ‘नदी’ नावाची एक दीर्घकविता शिवनाथ शास्त्री संपादित मुकुल नावाच्या लहान मुलांच्या मासिकात प्रकाशित झाली. पुढे १९२१ साली संदेश हे लहान मुलांचे मासिक त्यांनी सुरू केले व त्यात कथा, नाटुकली, कविता इ. सुंदर चित्रांसह छापून लहान मुलांची मने जिंकून घेतली. हास्यरसप्रधान कविता व त्याबरोबर स्वतः काढलेली व्यंगचित्रे यांत त्यांचा हात धरू शकणारा कलावंत नाही. मुलांचे साहित्यिक म्हणून बंगाली साहित्यात त्यांचे श्रेष्ठ स्थान आहे. त्यांच्या मृत्यूनंतर क्रमाक्रमाने त्यांची आबोल ताबोल (पाचवी आवृ. १९५६), ह-य-व-र-ल (दुसरी आवृ. १९५२), झाला पाला (चार नाटिका, दुसरी आवृ. १९४५), पागला दासू (बालकथा-१९४६), बहुरूपी (तिसरी आवृ. १९६४) इ. पुस्तके प्रकाशित झाली. ‘चलच्चि-तचंचरी’ नावाचे त्यांनी प्रौढांसाठी लिहिलेले एक प्रहसनही लक्षणीय आहे. गायक व नट म्हणूनही त्यांची ख्याती होती. बंगाली चित्रपटसृष्टीतले विख्यात दिग्दर्शक सत्यजीत रॉय (रे) हे सुकुमार रॉय यांचे सुपुत्र होत.
कलकत्ता येथे सुकुमारांचे देहावसान झाले.
आलासे, वीणा
“