राष्ट्र सेवा दल : युवा पिढीला राष्ट्रनिष्ठा, लोकशाही, जातिधर्मातीतता, समता. विज्ञानाभिमुखता इत्यादींची शिकवण देण्यासाठी काम करणारी एक प्रमुख संघटना. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली देशात स्वातंत्र्याची चळवळ चालू होती. या चळवळीच्या कामात शिस्त व व्यवस्थितपणा आणायला मदत करणे व लहान मुलामुलींना जाति-धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे धडे देणे, ही कामे करण्यासाठी युवक संघटना चालवण्याची अपरिहार्यता काँग्रेसच्या काही तरुण नेत्यांना वाटू लागली. या विचारातून ना. सु. हर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली १९२३ साली ‘हिंदुस्थानी सेवा दला’ची स्थापना झाली. मासिक झेंडावंदन शिस्तबद्ध रीतीने आयोजित करण्याचे काम हे सेवा दल करू लागले. १९३२ च्या सत्याग्रहाच्या कालखंडात ब्रिटिश सरकारने हे सेवा दल बेकायदा ठरवले. दुसरे जागतिक महायुद्ध सुरू झाल्यानंतर स्वातंत्र्याच्या चळवळीस जोर चढला तथापि काही सांप्रदायिक विचारांच्या संघटना जोर करू लागल्या होत्या. त्यांचा मुकाबला करण्यासाठी वि. म. हर्डीकर, शिरूभाऊ लिमये, ना. ग. गोरे आदींनी पुढाकार घेऊन ४ जून १९४१ रोजी पुणे येथे तरुणांचे एक शिबिर घेऊन जातिधर्मातीत राष्ट्रवाद जोपासण्यासाठी राष्ट्र सेवा दलाची पुनर्घटना केली. एस्. एम्. जोशी यांना दलप्रमुख नेमण्यात आले. संध्याकाळी मैदानावर मुलामुलींनी एकत्र जमायचे, चरखा चिन्ह मध्यभागी असलेल्या तिरंगी राष्ट्रीय झेंड्याला प्रणाम करायचा, कवायत, लेझीम, लाठी, सामुदायिक गाणी, मैदानी खेळ, अभ्यासवर्ग वगैरे कार्यक्रम घ्यायचे. वंदे मातरम् हे राष्ट्रगीत झाल्यावर शाखा विसर्जन होई. अशा शाखा पश्चिम महाराष्ट्रात गावोगाव सुरु झाल्या. पुढे छोडो भारत आंदोलनाला ९ ऑगस्ट १९४२ रोजी प्रारंभ झाला. सेवा दलाचे अनेक कार्यकर्ते भूमिगत चळवळीत उतरले. त्यामुळे सरकारने सेवा दलावर करडी नजर ठेवली . अनेक कार्यकर्त्यांचा छळ झाला. भूमिगत चळवळीत खेडोपाडी सेवा दलाच्या कार्यकर्त्यांचा संपर्क वाढल्याने राष्ट्र सेवा दलाचे काम महाराष्ट्रात फार मोठ्या भागात पसरले. पुढे सातारा येथे सेवा दल सैनिकांचा भव्य मेळावा झाला (१९४७). आझाद हिंद सेनेचे एक प्रमुख सेनानी कॅ. शाहनवाजखान हे त्या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे होते. बारा हजार युवक-युवती त्यात सहभागी झाल्या होत्या.
सेवा दलाच्या शक्तीचे हे प्रदर्शन पाहून काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटले की तिचे नियंत्रण पूर्णतया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या हातात असले पाहिजे. सेवा दलाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना वाटत होते, की काँग्रेसचे ध्येयधोरण आपल्याला मान्य असले, तरी संघटनेचे कार्य स्वायत्तपणाने चालले पाहिजे. सेवा दल कार्यकर्त्यांच्या १९४८ च्या बैठकीत चर्चा होऊन असा निर्णय घेण्यात आला की राष्ट्र सेवा दलाचे काँग्रेसशी संघटनात्मक संबंध असणार नाहीत. समाजवादी शीलाचे नागरिक तयार करणे आणि विधायक कार्यासाठी निष्ठावान, कार्यक्षम व समर्पणवृत्तीचे कार्यकर्ते उपलब्ध करून देणे, ही ध्येये सेवा दलाने स्वीकारली. ही स्वायत्तता सेवा दलाने पुढेही अबाधित ठेवली.
पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर दलितांना खुले व्हावे, त्यासाठी साने गुरुजींनी महाराष्ट्रभर झंझावती दौरा केला व पुढे पंढरपूर येथे उपोषण केले. त्या चळवळीसाठी लोकरंजनातून लोकशिक्षण करण्याच्या हेतूने राष्ट्र सेवा दलाचे कलापथक संघटित करण्यात आले. वसंत बापट, पु. ल. देशपांडे, लीलाधर हेगडे, आवाबेन देशपांडे, सुधा वर्दे इ. त्यात सहभागी होते.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्रनिर्मितीचे प्रचंड कार्य समोर उभे होते. युवकांची शक्ती त्या कामी लावण्यासाठी साने गुरुजी सेवा पथक सुरू करण्यात आले. अनेक खेड्यांत श्रमदान शिबिरे भरवण्यात आली. रस्ते बांधणे, तळ्यातला गाळ उपसणे, शेतांचे बांध दुरुस्त करणे, सार्वजनिक संडास साफ करणे इ. कामे करण्यात आली. पुढे आचार्य विनोबा भावे यांनी भूदान आंदोलन सुरू केले. राष्ट्र सेवा दलाचे भूदानपथक एक वर्षभर कार्य करीत होते.
शाखाकार्य, कलापथक, भूदानपथक इ. विविध कार्यक्रमांद्वारे सेवा दलाचे कार्य अखंडपणे पुढे चालू राहिले. पुढे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात काम करणाऱ्या समाजवादी युवक संघटनांशी तिचे संबंध प्रस्थापित झाले. इंटरनॅशनल युनियन ऑफ सोशॅलिस्ट यूथ व इंटरनॅशनल फाल्कन मूव्हमेंट (मुलामुलींच्या मनावर शांततेचा संस्कार घडविण्यासाठी पश्चिम यूरोपात काम करणारी पालकांची संघटना) या संघटनेचे सभासदत्व सेवा दलाने स्वीकारले आहे. १९६२ मध्ये सेवा दलाने घटना दुरुस्ती करून सभासदनोंदणी व अंतर्गत निवडणूक यांचा अंगीकार केला. सेवा दलाचे कार्य १९६७ पासून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, मणिपूर, जम्मू-काश्मीर इ. राज्यांतही सुरू झाले.
राष्ट्र सेवा दलात स्त्री-पुरुषांच्या सहकार्यावर प्रथमपासून भर दिल्याने अनेक स्त्री कार्यकर्त्यांनी सेवा दल बांधणीत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. तसेच कलापथकांतही मुलींनी काम करण्याला सुरुवात झाली. मधूनमधून शिबिरे, मेळावे अशा प्रकारचे कार्यक्रम होत राहिले. १९७३ पासून समता मोर्चे, हुंडाबळी मोर्चे आदी कार्यक्रम हाती घेण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करण्यासाठी १९८० मध्ये सेवा दलाने विज्ञानपथक सुरू केले.
यापूर्वी लीलाधर हेगडे, वसंत बापट, यदुनाथ थत्ते, सुधा वर्दे, बापू काळदाते हे वेळोवेळी सेवा दलाचे अध्यक्ष असून १९८५ पासून पन्नालाल सुराणा हे अध्यक्ष आहेत.
सध्या सेवा दलाच्या महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, नासिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, बीड, सोलापूर, नांदेड, परभणी, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांत एकूण १२३ सायंशाखा व १४ साप्ताहिक शाखा चालतात. मध्य प्रदेशात रेवा, शहडोल, जबलपूर या जिल्ह्यांत मिळून तेरा, बिहारमध्ये गया, नवाडा, पाटणा, मोंघीर, पूर्णिया या जिल्ह्यांत मिळून अकरा व उत्तर प्रदेशात बलिया, आझमगढ, आग्रा या जिल्ह्यांत मिळून सोळा शाखा नियमितपणे चालतात. सहकार व शिक्षण व्यासपीठाच्या वतीने त्या त्या क्षेत्रांतील कार्यकर्त्यांच्या कामाचे संयोजन केले जाते.
सेवा दलाने शिक्षण, आरोग्य, सहकार इ. क्षेत्रांत धडपडणारी नवी पिढी कार्यक्षम घडविली. आंतर भारती, साने गुरुजी कथामाला या चळवळींनाही सेवा दलाने साह्य केले आहे. सेवा दलातर्फे राष्ट्र सेवा दलाची घटना, इतिहास, सैनिक गीते, कै. नरहर कुरुंदकरांचे वाटा तुझ्या माझ्या, पु. ल. देशपांड्यांचे पुढारी पाहिजे हे लोकनाट्य इ. प्रकाशनेही करण्यात आली.
संदर्भ : १. कार्यवाह, राष्ट्र सेवा दल, राष्ट्र सेवा दल संघटन पद्धती, पुणे, १९८२.
२. थत्ते, यदुनाथ, बुनियादी सिद्धान्त, पुणे, १९८२.
३. लिमये, अनुसया डेंगळे, ना. ना. हेगडे, लीलाधर, संपा. राष्ट्र सेवा दल : २५ वर्षांची वाटचाल, पुणे, १९६५.
थत्ते, यदुनाथ