रायणी : (रंजना, रायण हिं., गु. खिरणी गु. रायण क. बकुला लॅ. मॅनिल्कारा हेक्झॅन्ड्रा, मिम्युसॉप्स हेक्झॅन्ड्रा कुल-सॅपोटेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] सु. १५–१८ मी. उंच व ३·५ –४·५ मी. घेर असलेला भव्य सदापर्णी वृक्ष. याच्या मॅनिल्कारा या प्रजातीतील एकूण ७० जातींपैकी भारतात फक्त चार जाती आढळतात त्यांपैकी ही एक जाती आहे व ती पूर्वी मिम्युसॉप्स या प्रजातीत घातली होती. हा वृक्ष भारतातील शुष्क सदापर्णी जंगलात (मध्य भारत व दक्षिण द्वीपकल्पीय भागात) व श्रीलंकेतही आढळतो. शोभेकरिता व खाद्य फळांकरिता सर्वत्र लावतात. तो प्रकाशप्रिय असल्याने नैसर्गिक रीत्या बियांपासून नवीन वृक्ष निर्मिती दाट सावलीत होत नाही. खोडाचा खालचा बराच भाग सरळ व उंच असून त्यावर पसरट फांद्यांचा व पानांनी भरलेला माथा असतो, त्यामुळे तो डेरेदार दिसतो. खोडाची साल गर्द करडी व भेगाळ असते. पाने गर्द हिरवी, चिवट, साधी, एकाआड एक, गुळगुळीत, खाली फिकट, तळाशी निमुळती, टोकाकडे गोलसर, लंबगोल-आयत व सु. ५ –१२ X २·५ –५ सेंमी. असतात. फुले लहान एकेकटी किंवा २ –६ च्या झुपक्याने पानांच्या बगलेत सप्टेंबर ते नोव्हेंबर-जानेवारीत येतात. ती पांढरट पिवळसर असून पाकळ्या एकूण अठरा, बाहेरच्या वर्तुळात बारा व आतील वर्तुळात सहा याप्रमाणे दोन वर्तुळांत आणि त्याखालची तपकिरी पुष्पदले (संदले) प्रत्येकी तीनच्या दोन वर्तुळांत असतात. केसरदले (पुं-केसर) सहा व वंध्य केसर सहा एकाआड एक असतात [⟶ फूल]. ऊर्ध्वस्थ किंजपुटात १२ कप्पे असून मृदुफळ पिकल्यावर लालसर पिवळे, लंबगोल (१·५ –२·५ सेंमी. लांब) असते बिया (१ – १·५ सेंमी. लांब) काहीशा चपट्या, एक ते दोन, लंबगोल, पिंगट व चकचकीत असतात त्यांतील अन्नांश (पुष्क) मांसल असतो. एप्रिल ते जुलै या काळात फळे येतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे मधूक कुलात [⟶ सॅपोटेसी] वर्णिल्याप्रमाणे असतात ⇨ बकुळ व ⇨ मोह यांच्याशीही या वृक्षाचे साम्य आहे. पावसाळ्यात बियांचा उपयोग करून नवीन लागवड करतात. लहान रोपांना काही दिवस थोडी सावली लागते. जंगलातील उंच वृक्षाखाली ती मिळते.
रायणीचे लाकूड दृढ व बळकट असते. मध्यकाष्ठ लाल ते फिकट जांभळट पिंगट आणि रसकाष्ठ (बाहेरचे) फिकट लालसर ते फिकट तपकिरी असते तसेच ते कठीण, चिवट, जड व टिकाऊ असते ते पाण्याने खराब होत नाही व त्याला वाळवीचा उपद्रवही होत नाही. रापविलेले लाकूड कापण्यास जड जाते, तथापि रंधून व घासून गुळगुळीत होते व त्याला चांगली झिलई होते. तेलाचे घाणे, खांब, तुळ्या, गाड्या, शेतीची अवजारे, ठोकण्याचे धुमस, हत्यारांचे दांडे, सजावटी सामान, कातीव काम, हातातील काठ्या इ. विविध उपयोगांकरिता रायणीचे लाकूड वापरात आहे.
रायणीची फळे गोड असल्याने ती ताजी किंवा सुकवून खातात ती स्तंभक (आकुंचन करणारी) असतात. बियांचे तेल खाद्य असून त्याला ‘रायण तेल’ म्हणतात. ते फिकट पिवळे असून त्याला ऑलिव्ह तेलाचा वास येतो. बियांत कडू सॅपोनीन असते व ते पेंडीत शिल्लक राहते. पाने गुरांना चारा म्हणून घालतात. झाडापासून डिंक मिळतो. साली १०% टॅनीन असून ती कातडी कमाविण्यास वापरता येते, तिचा उपयोग तापात करतात व ती पौष्टिक असते. ताडीत साल घातल्यास तिचे दारूत रूपांतर होत नाही. रायण तेल शोथशामक (आग शांत करणारे) व वेदनाहारक असते. चिकूच्या कलमाकरिता रायणीचा खुंटाप्रमाणे उपयोग करतात. रस्त्यांच्या दुतर्फा शोभेकरिता रायणीचे वृक्ष लावतात.
पहा : चिकू सॅपोटेसी.
संदर्भ : 1. C. I. S. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, New Delhi,1962.
2. McCann, Charics, 100 Beautiful Trees of India, Bombay, 1959.
पाटील, शा. दा. परांडेकर, शं. आ.
“