रामानंद : (१२९९ ? – १४१० ?). उत्तर भारतातील रामावत वा रामानंदी संप्रदायाचे प्रवर्तक व आद्य रामभक्त आचार्य. त्यांची संपूर्ण व अधिकृत अशी चरित्रपर माहिती उपलब्ध होत नाही. त्यांच्या चरित्रातील काही घटनांचेच उल्लेख इतर ग्रंथांतून आढळतात. अगस्त्यसंहिता, भक्तमाल, प्रसंगपारिजात, भविष्यपुराण, वैश्वानरसंहिता, रसिकप्रकाश, वैष्णवधर्म, रत्नाकर इ. ग्रंथांतून त्यांची थोडीफार चरित्रपर माहिती आढळते तथापि तिची प्रामाणिकता व विश्वासार्हता संदिग्ध आहे. त्यांचे जन्मस्थळ तसेच जन्म व मृत्यूच्या तारखा यांबाबत अभ्यासकांत मतभेद आहेत. त्यांचा जन्म प्रयाग येथे एका कान्यकुब्ज ब्राह्मण कुटुंबात माघ कृष्ण सप्तमी संवत् १३५६ रोजी झाल्याचे परंपरा व अगस्त्यसंहिता यांच्या आधारे बहुतांश अभ्यासक मानतात. रामानंदी संप्रदायाच्या अयोध्या, मिथिला, चित्रकूटादी मठांतूनही याच तिथीस त्यांची जयंती साजरी केली जाते. काहींच्या मते त्यांचे जन्मवर्ष इ. स. १४१० आहे. फार्कर त्यांचा जीवनकाल १४०० ते १४७० तर रामचंद्र शुक्ल तो पंधराव्या शतकाचा पूर्वार्ध व सोळाव्या शतकाचा आरंभ असा मानतात. त्यांचे जन्मस्थळ दक्षिण भारतातील मेलकोटे (कर्नाटक) असल्याचेही काही अभ्यासक मानतात. त्यांचे मातापिता सुशीला व पुण्यसदन. लहानपणी त्यांना अध्ययनासाठी काशीस पाठवले होते आणि तेथे त्यांच्यावर आरंभी शांकर अद्वैत मताचा प्रभाव पडला असावा तथापि नंतर त्यांनी स्वामी राघवानंदांचे शिष्यत्व पतकरले. स्वामी राघवानंद हे विशिष्टाद्वैती सतपुरुष त्यांचे गुरू होत.

अध्ययनानंतर भारताची तीर्थयात्रा करून काशीस राघवानंदांच्या मठात परत आल्यावर तेथील शिष्यांनी यात्रा करताना रामानंदांनी खानपानाचे व स्पृश्यास्पृश्यतेचे निर्बंध पाळले नसावेत म्हणून त्यांच्या समवेत भोजनास नकार दिला. याचा परिणाम म्हणून गुरूच्या आज्ञेवरून त्यांनी आपला नवा उदार दृष्टिकोण असलेला व कर्मकांडास फारसे महत्त्व न देणारा रामावत वा रामानंदी संप्रदाय स्थापिला. काशी येथेच पंचगंगा घाटाच्या परिसरात त्यांनी एका गुहेत मठ स्थापून तेथेच कबीरादी बारा शिष्यांना उपदेश केल्याचे परंपरा मानते. काशी येथे वैशाख शुद्ध तृतीया, संवत् १४६७ (इ. स. १४१०) रोजी त्यांनी देह ठेवला असावा, असे बहुतेक अभ्यासक व परंपरा मानते. काही अभ्यासकांच्या मते इ. स. १५१० हे त्यांच्या निधनाचे वर्ष.

रामानंदांच्या शिष्यपरिवारातील बारा शिष्यांची नावे व त्यांचा नेमका काल यांबाबत तसेच त्यांचे नेमके ग्रंथकर्तृत्व कोणते, याहीबाबत मतभेद आहेत. परंपरेनुसार दिली जाणारी त्यांच्या प्रमुख बारा शिष्यांची नावे अशी : अनंतानंद, कबीर, सुखानंद, सुरसुरानंद, पद्मावती (स्त्री), नरहर्यानंद, पीपा, भावानंद, रैदास (चांभार), धना (न्ना), सेन (सेना न्हावी) व सुरसुरी. भक्तमालमध्येही ही बारा नावे आढळतात. ह्या बारा शिष्यांची समकालीनता समाधानकारक रीत्या प्रस्थापित होऊ शकत नाही, असे परशुराम चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.

श्रीवैष्णवमताब्जभास्कर  व श्रीरामार्चनपद्धति ह्या दोनच रचना निःसंदिग्धपणे रामानंदांच्या रचना होत. इतर अनेक प्रकाशित व अप्रकाशित रचना रामानंदांच्या म्हणून सांगितल्या जातात तथापि त्यांचे कर्तृत्व रामानंदांकडे देणे कठीण आहे. रामानंदकृत म्हणून सांगितल्या जाणाऱ्या रचनांत सिद्धान्तपटल, रामरक्षास्तोत्र, आनंदभाष्य, योगचिंतामणि, अध्यात्मरामायण, शिवरामाष्टक, हनुमानस्तुति इत्यादींचा अंतर्भाव होतो. आदिग्रंथ, सर्वांगी इ. ग्रंथांतून आलेली काही पदे रामानंदांची म्हणून सांगितली जातात तथापि त्यांचे कर्तृत्वही शंकास्पदच आहे.

रामानंदांचा पूर्वसंबंध रामानुजांच्या श्रीसंप्रदायाशी बहुतेक अभ्यासक भक्तमालचा पुरावा देऊन जोडतात. रामानंदांनीही स्वतः आपल्या रामार्चनपद्धतीमध्ये आपली जी गुरुपरंपरा दिली आहे ती प्रमाण समजली जाते. ती अशी:राम-सीता-पृतनापती-शठकोपनाथ-पुंडरीकाक्ष-श्रीराममिश्र-यामुन-पूर्णारामानुज-कुरेश-कोपदेव-माधवाचार्य-देवाधिप-पुरुषोत्तम-गंगाधर-सद्रामेश्वर-द्वारानंद-देवानंद-श्रियानंद-हर्यानंद-राघवानंद-रामानंद. सर्वसाधारणपणे ही सर्वमान्य अशी गुरुपरंपरा असून ती इतर प्राचीन परंपरांशीही संवादी आहे.

उत्तर भारताच्या संत परंपरेत रामानंदांचे स्थान निरतिशय महत्त्वाचे आहे. ते स्वतंत्र प्रज्ञेचे संत होते. त्यांच्या विचारांत सहृदयता, निर्भयता व उदार दृष्टिकोण दिसून येतो. त्यांचा गहिरा प्रभाव तत्कालीन व नंतरच्या उत्तर भारतातील आध्यात्मिक वातावरणावर पडून सर्वत्र मोठे परिवर्तन घडून आले. तत्कालीन प्रभावशाली धार्मिक नेता, मार्गदर्शक, जातिवर्णभेदाची जाचक बंधने शिथिल करणारा सुधारक, धर्मप्रचारासाठी संस्कृत ऐवजी हिंदीचा पुरस्कार करणारा भाषाभिमानी, भक्तिमार्गी असामान्य संघटक व प्रचारक म्हणून रामानंदांचे स्थान भारतीय परंपरेत वैशिष्ट्यपूर्ण मानावे लागते. काशीच्या विद्वान मुसलमानांच्या विचारांचाही त्यांच्यावर प्रभाव पडून त्यांचा दृष्टिकोण व्यापक बनला. तीर्थयात्रेत तत्कालीन भारताचे अवलोकन करून त्यांनी आपल्या विचारांस युगधर्मानुरूप उदार वळण दिले व नव्या संप्रदायाद्वारे त्या विचारांचा प्रचार केला. दक्षिणेतील व उत्तरेतील भक्तिआंदोलनास जोडणारा एक अपूर्व दुवा म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे उपास्य दैवत राम असून त्यांचा मार्ग भक्तिमार्गच आहे. रामाच्या ठायी अनन्यभावे शरणागती ही त्यांची साधना होती. बडथ्वाल यांच्या मते त्यांचा साधनामार्ग योग व प्रेम यांचे समन्वित रूप होय. वैष्णव व नाथ संप्रदायांचाही प्रभाव त्यांच्यावर होता. दक्षिण भारतातील वैष्णवांची जातिवर्णातील ⇨आळवार परंपरा रामानुजांनी मानली होती व रामानुजांच्या विशिष्टाद्वैती मताचा रामानंदांनी पुरस्कार केला. रामानुजांनी अस्पृश्य अशा कांचीपूर्णास आपले गुरू मानले होते. तोच उदार व स्त्री पुरुष जातिवर्णभेदातीत धागा रामानंदांनी उत्तर भारताच्या रामभक्तिआंदोलनात विशेषत्वे उचलून धरला. रामभक्तीला सांप्रदायिक रूप देणारे रामानंद हे आद्य आचार्य होत. त्यांच्या प्रेरणेनेच मध्ययुगात व नंतरच्या कालात रामभक्तिपर हिंदी साहित्य प्राचुर्याने निर्माण झाले. ⇨कबीर, ⇨तुलसीदास व ⇨मैथिलीशरण गुप्त या श्रेष्ठ हिंदी कवींवर रामानंदांचा विलक्षण प्रभाव पडला. रामानंदांनी भक्तिमार्गाचे द्वार सर्वच जातिवर्णांच्या स्त्री पुरुषांना उघडून दिले. परिणामी उत्तर भारताच्या मध्ययुगात महान व उदार विचारधारा निर्माण होऊन ती समृद्ध झाली. त्यांच्या उदार भावनेने हिंदू व मुसलमानांना जवळ आणण्याची पार्श्वभूमी तयार करून दिली. हिंदीतील अनेक कवी आपले प्रेरणास्थान रामानंदच मानतात आणि ह्या कवींत काही मुसलमान कवीही आहेत.


 रामावत वा रामानंदी संप्रदाय : रामानंदांचा संबंध दक्षिण भारतातील रामानुजांच्या श्रीसंप्रदायाशी असल्याचे विल्सन, पीतांबरदत्त बडथ्वाल, मेकॉलिक, परशुराम चतुर्वेदी, रामरहलदास प्रभृती अभ्यासक भक्तमाल, रसिकप्रकाश, संप्रदाय दिग्दर्शन, हर्याचार्यकृत रामस्तवराजभाष्य इ. ग्रंथांच्या आधारे तसेच आपल्या रामार्चनपद्धतीमध्ये स्वतः रामानंदही मान्य करतात. फार्कर यांच्या मते रामानंद हे परंपरेने चालत आलेल्या रामावत संप्रदायाचेच अनुयायी होते आणि ह्या संप्रदायात अध्यात्मरामायणवाल्मीकिरामायण ह्या ग्रंथांना आदराचे स्थान होते. संप्रदायाचे आधुनिक अभ्यासक स्वामी व रघुवराचार्य तसेच भगवदाचार्य यांच्या मते आदिकालापासून एकच श्रीसंप्रदाय होता तथापि कालांतराने मंत्र, उपासना, उपास्य इत्यादींबाबतच्या आचारभिन्नतेमुळे त्यांच्या दोन शाखा झाल्या. एका शाखेत रामस तर दुसरीत नारायणास (विष्णूस) उपास्य म्हणून महत्त्वाचे स्थान मिळाले. कालांतराने रामशाखा क्षीण होत गेली परंतु तिचा उद्धार व प्रचार रामानंदांनी केला. तथापि हे मत ग्राह्य मानण्यास ठोस पुरावा नाही. कदाचित मूळ श्रीसंप्रदाय उत्तर भारतातील समस्या सोडविण्यास असमर्थ ठरला असावा व त्यातूनच रामानंदांना अधिक उदार दृष्टिकोणाच्या तसेच कर्मकांड व रूढी यांच्या जाचक बंधनापासून मुक्त असलेला संप्रदाय प्रवर्तित करण्याची आवश्यकता भासली असावी.

संप्रदायाच्या अधिकृत ग्रंथांत रामानंदांच्या दोन ग्रंथांशिवाय आनंदभाष्य हा ग्रंथ विशेष महत्त्वाचा मानतात. तसेच भगवदाचार्यकृत त्रिरत्नी हा ग्रंथही प्रमाणभूत मानला जातो. सांप्रदायिक भाष्यांत जानकीभाष्ये आणि भगवदाचार्यकृत वेदान्तभाष्य महत्त्वपूर्ण होत. ह्या ग्रंथांतून संप्रदायाचे दार्शनिक विचार, धार्मिक सिद्धांत, आचारविचार इत्यादींचे दर्शन घडते.

रामानंदांचा प्रमुख मठ काशी येथील पंचगंगा घाटावर होता आणि त्यांचे प्रमुख बारा शिष्य होते याचा निर्देश वर आलाच आहे. रामानंदानंतर पंचगंगा मठाच्या गादीवर अनंतानंद आले. संप्रदायाच्या विकासात अनंतानंद आणि त्यांच्या शिष्य-प्रशिष्यांचा वाटा मोठा होता. मध्ययुगात अनंतानंदांचे शिष्य कृष्णदास पत्रोहारीने योग-चमत्कार दाखवून योग्यांचा पराभव केला व राजस्थानातील गलता येथे आपल्या संप्रदायाची गादी स्थापन केली. पत्रोहारीच्या कील्ह, अग्र व टीला ह्या तीन प्रमुख शिष्यांनी संप्रदायाचा विकास व विस्तार करून त्याला भक्कम स्वरूप दिले. मध्ययुगात तसेच त्यानंतरच्या काळात संप्रदायाच्या अनेक गाद्या निर्माण झाल्या. त्यातील ३५ गाद्या ‘द्वारागाद्या’ म्हणून विशेष प्रसिद्ध आहेत. ह्या द्वारागाद्या अनंतानंद, सुरसुरानंद, नरहर्यानंद, सुखानंद, रामकबीर, भावानंद, पीपा, योगानंद, अनभयानंद, कील्ह, अग्र, टीला, भगवन्नारायण, केवलबुवा इत्यादींच्या नावे स्थापिल्या गेल्या. संप्रदायाची प्रमुख स्थाने गलता, रेवासा, डाकोर, चित्रकूट, अयोध्या, मिथिला इ. होत. रामानंदी संप्रदायातील योगाचे प्रवर्तक कील्ह हे होते. द्वारकादासांनी त्याचा चांगला विकास केला. म्हणूनच काही रामानंदी साधू ‘अवधूत’ म्हणूनही ओळखले जातात. अग्रदास हे संप्रदायातील माधुर्यभावाचे प्रचारक असून आधुनिक काळात अयोध्या येथील जानकी घाटाचे महंत रामचरणदास यांनी माधुर्यभावाचा विशेष प्रचार केला.

दिगंबर, निर्मोही, निर्वाणी, खाकी, निरावलंबी, संतोषी व महानिर्वाणी हे संप्रदायाचे सात आखाडे असून त्यांत साधूंचे सहा वर्ग आहेत. हे वर्ग असे : यात्री, धोरा, बंदगीर, मुरीठिया, नागा व अतीत. कुंभपर्वात आणि त्या त्या ठिकाणीच फक्त नागा साधूंना दीक्षा दिली जाते. डाकोर, डाँडिया, नंदराम, त्यागी व महात्यागी हे संप्रदायाचे पाच ‘खालसे’ होत. मठांची व्यवस्था महंत, गोलकी व साधारण सभेद्वारा  पाहिली जाते. वैष्णवांच्या दीक्षाविधीचे पंचसंस्कार-ताप, पुंड्र, नाम, मंत्र आणि याग-संप्रदायात प्रचलित आहेत. उपास्य दैवत द्विभुज राम असून संप्रदायाचा मंत्र रामषडाक्षर (→ रामाय नम:) हा आहे. रामानंदी संप्रदायाशी दुरून संबंधित असलेले पंथ-कबीर पंथ, सेना पंथ, रैदासी पंथ इ. होत.

धर्मसिद्धांत : रामानुजांचे विशिष्टाद्वैती दर्शनच हा संप्रदायही मानतो. ब्रह्म म्हणजेच राम. हे रामरूपी ब्रह्म निकृष्ट प्राकृतिक गुणांनी रहित असल्याने ते निर्गुण आहे आणि द्रव्य गुणांनी युक्त असल्याने सगुणही आहे. त्याच्यापासूनच सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय होतात. तो करुणामय, कल्याणगुणाकर व त्रिलोकांत परमप्राप्त होय. भक्ताने त्याचे दास्य पतकरून ईर्षारहित व समाधानी रहावे. सीमा ही त्याची अनादी सहचरी वा प्रिया आणि पुरुषाकारभूता होय. ती शुभगुणयुक्त, वात्सल्याची परमसीमा व क्षमाशील आहे. राम हाच परमेश्वर होय. म्हणून त्याचीच उपासना इष्ट होय. वैष्णवांचे तत्त्वत्रय रामानंदांना मान्य आहे. तत्त्व हे चिदचिद्विशिष्टरूपाने एकच आहे. नाम व पदार्थभेदाने त्याचे (१) चित्, (२) अचित् व (३) ईश्वर असे तीन भेद होतात. ही तिन्ही तत्वे नित्य होत. चित् व अचित् या दोहोंनी विशिष्ट असल्याने परमेश्वर राम हा चिदचिद्विशिष्ट होतो.

जीव हा नित्य परमेश्वराच्या अपेक्षेने अज्ञ, चेतन, अज, सूक्ष्म, अनेक आणि जिज्ञासूंना वेय व स्वकर्मानुसार फल भोगणारा आहे. जीवाचे बद्ध, मुक्त इ. भेद आहेत. ‘ प्रकृती ’ शब्दाचा वापर संप्रदायात सांख्याच्या अर्थानेच केला आहे. जगत्कारण प्रधानादी नसून ब्रह्मच होय. आपल्या संकल्पमात्रेकरून ब्रह्म सृष्ट्युत्पत्ती करते. प्रापंचिक बंधनातून मुक्त होऊन ‘साकेतलोका’त प्रमाण करून सायुज्य मुक्ती प्राप्त करणे यासच मोक्ष म्हटले आहे. आनंदभाष्यानुसार मोक्ष हा परमपुरुषानुभवरूप मानला आहे. जीव सुषुम्ना नाडीतून निघून ब्रह्मात विलीन होतो. मुक्ती त्वरित न मिळता क्रमाने मिळते. जीव ब्रह्मसुखाचा अनुभव घेऊ शकतो.

ईश्वर व जीव यांत पिता-पुत्र, रक्ष्य-रक्षक, सेव्य-सेवकादी संबंध होत. ईश्वर शेषी व जीव त्याचा शेष होय. ईश्वराचे दास्य हेच जीवाचे एकमेव प्रयोजन होय. ईशकृपेवाचून जीवास मोक्ष प्राप्त होत नाही. म्हणूनच प्रपत्तीची आवश्यकता असते. प्रपत्ती व न्यास ही भक्तीची दोन प्रमुख अंगे होत. परमेश्वराच्या निर्हेतुक कृपेला प्रपत्ती व स्वतःच्या निवृत्तीला न्यास म्हटले आहे.

सृष्टीच्या पूर्वी सूक्ष्म चिदचिद्विशिष्ट ब्रह्म कारणावस्थेत, सृष्टीकाली तेच स्थूल चिदचिद्विशिष्ट होऊन उपादान कारण रूपात आणि विलयावस्थेत ते पुन्हा सूक्ष्म व चिदचिद्विशिष्ट स्वरूपात राहते.

भक्तीला मोक्षसाधन मानले असून तिची प्रपत्ती व न्यास ही दोन अंगे होत. सर्व भक्तीचे अधिकारी होत. द्विभुज राम हेच ध्येय असून भगवत्कृपाप्राप्तीसाठी नवविधा भक्ती प्रचलित आहे तथापि मुख्य भर दास्यभाव भक्तीवर आहे. माधुर्य, सख्य, वात्सल्य, शांतादी भक्तीही संप्रदायात आधुनिक काळात प्रचलित आहे. कर्मकांडास संप्रदायात फारशी मान्यता व महत्त्व नाही तथापि आन्हिक कर्म नित्यनेमाने करणे विहीत आहे. वैष्णवांचे पंचसंस्कारही प्रचलित आहेत. अष्टायात्रीय पूजापद्धतीही सांप्रत प्रचलित आहे.

श्रीसंप्रदायात व या संप्रदायात काही फरक असले, तरी त्यांचे दार्शनिक मत विशिष्टाद्वैतीच आहे. दोन्ही संप्रदायांत ब्रह्म हे चिदचिद्विशिष्टच मानले आहे आणि मोक्षाचे साधन परमोपास्याची प्रपत्ती हेच मानले आहे. श्रीसंप्रदायातील ब्रह्माच्या ठिकाणी राम, लक्ष्मीच्या ठिकाणी सीता कल्पून द्विभुज रामास परमोपास्य मानले आहे.

संप्रदायात जाचक कर्मकांड शिथिल करून सर्व जातिवर्णांच्या स्त्री पुरुषांना रामानंदांनी प्रवेश दिला व रामभक्तीचे नवे उदार पर्व सुरू केले. त्याचा मध्ययुगात व नंतरच्या काळात खूपच विकासही झाला.

पहा : भक्तिमार्ग रामानुजाचार्य वैशिष्टाद्वैतवाद वैष्णव संप्रदाय हिंदी साहित्य.

संदर्भ : 1. Farquhar, J. N. The Historical Position of Ramanand,  J. R. A. S., 1922.

            २. चतुर्वेदी, परशुराम, उत्तरी भारत की संत परंपरा, अलाहाबाद, १९६४.

            ३. श्रीवास्तव, बद्रीनारायण, रामानंद संप्रदाय तथा हिंदी साहित्यपर उसका प्रभाव, अलाहाबाद, १९५७.

सुर्वे, भा. ग.