रामदुर्ग संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पूर्वीच्या मुंबई इलाख्यातील एक छोटे मराठा संस्थान. ते कोल्हापूरच्या ब्रिटिश एजंटच्या अखत्यारीत होते. क्षेत्रफळ ४३२·६४ चौ. किमी. लोकसंख्या ४०,११४ (१९४१). वार्षिक उत्पन्न सु. २·७५ लाख. उत्तरेस कोल्हापूर संस्थान, पश्चिम – दक्षिणेस धारवाड जिल्ह्यातील प्रदेश, पूर्वेस विजापूर जिल्हा या सीमा. संस्थानात रामदुर्ग व नरगुंद ही दोन शहरे व ३७ खेडी होती. शिवाजी महाराजांनी रामदुर्गचा किल्ला बांधला अशी समजूत आहे. या किल्ल्यावर शिवाजींनी अप्पाजी सुरी हबळीकर याची नेमणूक केली होती. १६९२ मध्ये तो मोगलांनी जिंकला पण १७०७ मध्ये अप्पाजींचा कारकून रामराव दादाजी भावे याने तो परत मिळवला. अप्पाजीच्या मृत्युनंतर आसपासच्या प्रदेशावर भाव्यांनी अंमल बसवला आणि १७५३ मध्ये ३५० घोडेस्वार पुरवण्याच्या करारावर पेशव्यांनी त्यास कायम केले. १७७८ मध्ये हैदर अली व पुढे टिपू याने हे संस्थान जिंकण्याचा प्रयत्न केला, पण तो सफल झाला नाही. १८१० मध्ये दुसऱ्या बाजीरावाने नरगुंदकर व रामदुर्गकर या दोन भावे वंशातील कुटुंबांत प्रदेशाच्या वाटण्या करून दिल्या. १८१८ मध्ये रामदुर्गने इंग्रजांना पेशव्यांविरुद्ध मदत केली व १८५७ मध्येही इंग्रजनिष्ठा दाखवली. विसाव्या शतकात संस्थानात दोन नगरपालिका होत्या. शिक्षण, आरोग्य इ. क्षेत्रांत सुधारणा झाल्या. १९३९ मध्ये प्रजासंघाची स्थापना होऊन राजकीय हक्कांसाठी संघर्ष झाला. संस्थानिक पहिल्या दर्जाचे सरदार असून त्यांना न्यायदानाचे पूर्ण अधिकार होते. संस्थानिकांस दत्तक घेण्याची सनद असून ज्येष्ठ मुलगा वारस ठरत असे. १९४७ मध्ये झालेल्या दंगलीमुळे राजेसाहेबांनी आपण होऊन शासन मुंबई राज्याकडे सोपवले. १ नोव्हेंबर १९५६ पासून संस्थान म्हैसूर (कर्नाटक) राज्यात समाविष्ट झाले.

कुलकर्णी, ना. ह.