राजेंद्र कृषि विद्यापीठ : बिहार राज्यातील एक विद्यापीठ. राजेंद्र कृषिविद्यापीठ अधिनियमानुसार (३ डिसेंबर १९७०) समस्तीपूर येथे स्थापना. कनकई येथील बिर्सा कृषी विद्यापीठाचा भाग वगळता बिहार राज्यातील उर्वरित परिसर राजेंद्र कृषी विद्यापीठाच्या कक्षेत मोडतो. सात घटक महाविद्यालये, एक संशोधन संस्था व अनेक उपकेंद्रे ही विद्यापीठकक्षेत येतात. जुलै ते जून असे विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष असून त्यात तीन सत्रे आहेत. कृषी, पशुविकारविज्ञान व पशुसंवर्धन, गृहविज्ञान, कृषी अभियांत्रिकी, मुलभूत विज्ञाने व मानव्यविद्या ह्या विद्यापीठाच्या विद्याशाखा आहेत. अध्यापनाचे माध्यम हिंदी आहे.
विस्तार सेवा हा विद्यापीठाचा महत्त्वाचा विभाग आहे. त्याद्वारा राज्यातील शेतकरी आणि विस्तार सेवेतील कर्मचारी यांसाठी प्रात्यक्षिक, प्रशिक्षण कार्यक्रम व शेतकऱ्यांचे मेळावे यांचे आयोजन तसेच आधुनिक किसान नावाच्या हिंदी मासिकाचे प्रकाशन केले जाते. वरील विभागाच्या सहाय्यामुळे नभोवाणी व दूरदर्शन यांतील कार्यक्रमांद्वारा शेतकऱ्यांमार्फत महत्वाची माहिती संक्रमित करण्यात येते.
विद्यापीठाची परीक्षा पद्धती वैशिष्ट्यपूर्ण असून ती श्रेणीपद्धतीवर आधारलेली आहे. सामान्यज्ञानाची चाचणी १०%, अर्धवार्षिक परीक्षा २०%, प्रात्यक्षिक चाचणी २५% व अंतिम परीक्षा ४५% अशी परीक्षेची विभागणी केलेली आढळते. पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रमांतर्गत त्रिसत्र शिक्षणपद्धती आहेत. वसतिगृहे, मोफत आरोग्यसेवा इ. सोयीही विद्यापीठात उपलब्ध आहेत.
विद्यापीठाच्या ग्रंथालयात ७८,२४१ ग्रंथ व ८०२ नियतकालिके असून प्रलेखपोषण (डॉक्युमेन्टेशन) आणि पुनर्मुद्रण यांच्या सुविधा आहेत. विद्यापीठातील पदवीपूर्व व पदव्युत्तर विभागांत एकूण १,७०० विद्यार्थी शिकत होते. (१९८३-८४). याच वर्षाचे विद्यापीठाचे उत्पन्न व खर्च अनुक्रमे ४·११ कोटी रु. व ५·५१ कोटी रु. होता.
मिसार, म. व्यं.