दिल्ली विद्यापीठ : दिल्ली केंद्रशासित प्रदेशातील एक जुने विद्यापीठ. दिल्ली येथे केंद्रीय विधिमंडळाच्या कायद्यान्वये याची १९२२ मध्ये स्थापना झाली. प्रथम विद्यापीठाचे स्वरूप एकात्म, अध्यापनात्मक  आणि वसतिगृहात्मक होते पण १९५२ च्या सुधारणा कायद्यानुसार ते अध्यापनात्मक व संलग्न विद्यापीठ करण्यात आले. त्याच्या क्षेत्रात दिल्ली केंद्रशासित प्रदेशातील महाविद्यालये अंतर्भूत होतात. विद्यापीठास एकूण ६२ महाविद्यालये संलग्न असून त्यांपैकी १४ घटक महाविद्यालये विद्यापीठक्षेत्रातच वसलेली असून त्यांतील दहा महाविद्यालये सायंकाळी अध्यापन करतात. विद्यापीठाचे ग्रंथालय प्रशस्त असून त्यात ४,९३,३४२ ग्रंथ होते (१९७३). विद्यापीठाचे संविधान इतर विद्यापीठांसारखे असूनसुद्धा राष्ट्रपती हे अभ्यागत, उपराष्ट्रपती हे कुलपती आणि सरन्यायधीश हे प्रो–चान्सलर असतात. याशिवाय कुलगुरू व कुलसचिव हे सवेतन अधिकारी सर्व प्रशासकीय व्यवस्था पाहतात. विद्यापीठात मानव्यविद्या, विधी, शिक्षण, विज्ञान, गणित, वैद्यक, ललितकला, व्यवस्थापन, तंत्रविद्या अभ्यासक्रम वगैरे विविध विषयांच्या विद्याशाखा असून पत्रद्वारा शिक्षण देण्याची व्यवस्था विद्यापीठाने केली आहे. विद्यापीठाने पदव्युत्तर परीक्षा व एल्एल्. बी. तसेच तंत्रविज्ञान कक्षा यांकरिता षण्मास परीक्षापद्धती सुरू केली आहे (१९६९). यांशिवाय पदवीपूर्व परीक्षांसाठी पाठनिर्देशपद्धती अवलंबविण्यात आली आहे. विद्यापीठाने प्राणिविज्ञान, अर्थशास्त्र, भौतिकी, रसायनशास्त्र, वनस्पतिविज्ञान व समाजशास्त्र या विषयांत प्रगत अभ्यासकेंद्रे स्थापन केली असून विद्यापीठ अनुदान मंडळाने त्यास मान्यता दिली आहे. विद्यापीठात एक आरोग्य केंद्र आहे. तसेच विद्यापीठात स्वतंत्र  ग्रंथनिर्मिती संचालनालय असून त्याद्वारा अनेक प्रमाण ग्रंथांचे हिंदीत अनुवाद प्रसिद्ध करण्यात येतात. विद्यापीठाचे उत्पन्न २१९·०७ लाख रु. होते (१९७३–७४). विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांतून व प्रगत अभ्यास केंद्रांतून १,२४,५३० विद्यार्थी शिकत होते (१९७४).

देशपांडे, सु. र.

Close Menu
Skip to content