राजकोट : गुजरात राज्यातील याच नावाच्या जिल्ह्या चे मुख्य ठिकाण व पूर्वीच्या राजकोट संस्थानाची राजधानी. लोकसंख्या ४,४४,१५६ (१९८१). हे अहमदाबादच्या आग्नेयीस २०० किमी. अजी नदीच्या दोन्ही तीरांवर वसलेले आहे. उद्योग, व्यापार, शिक्षण व संस्कृती या दृष्टींनी राजकोट हे महत्वाचे केंद्र आहे. शहराचा पश्चिम भाग अधिक दाटीवाटीचा असून त्यात कापड गिरण्या, इतर कारखाने व प्रशासकीय कार्यालये अधिक आहेत. पूर्व भाग अलीकडे विकसित झालेला आहे. या भागात निवासी व्यवस्थेबरोबरच विविध उद्योगधंदेही विकसित झालेले आढळतात. वस्त्रोद्योग, तयार कपडे, यंत्रे, मेवामिठाई, सुवासिक द्रव्ये, रसायने, आगपेट्या, साबण, प्लॅस्टिक, विद्युत् साहित्य, वनस्पती तेल इ. उद्योगधंदे शहरात चालतात. जवळच औद्योगिक वसाहत आहे. धान्य, कापूस, कापडाचा धागा, तेलबिया, कातडी, तूप, इमारतीचा दगड यांचा व्यापार येथे चालतो. राजकोटची छपाई प्रसिध्द आहे. येथे एक शासकीय दुग्धशाळाही आहे. सौराष्ट्र विद्यापीठ (स्था. १९६७) येथेच आहे. शहरात एकूण १४ महाविद्यालये असून त्यापैकी विधी, महिला व औषधनिर्माणशास्त्र यांचे प्रत्येकी एक, तर दोन शिक्षक-प्रशिक्षण महाविद्यालये आहेत. त्यांशिवाय एक शासकीय तंत्रनिकेतन संस्थाही आहे (१९८५-८६). धमेंद्रसिंहजी महाविद्यालय (१९३७) हे सर्वांत जुने महाविद्यालय आहे. राष्ट्रीय शाळा (१९२१), बालभवन, विराणी माध्यमिक शाळा इ. अनेक शैक्षणिक संस्था शहरात आहेत. येथील राजकोट इंग्लिश स्कूल (पूर्वीचे ‘काठेवाड’ अथवा ‘ॲल्फ्रेड’ हायस्कूल) या माध्यमिक शाळेत महात्मा गांधीचे शिक्षण झाले. त्यांचे वडील करमचंद गांधी यांचे निवासस्थान ‘बापूनो देलो’ किवा ‘काबा गांधी देलो’ हे येथेच आहे. शहरातील प्रसिध्द ‘जूबिली उद्याना’ मध्ये ‘लांग ग्रंथालय’ (कोठेवाड ग्रंथालय), ‘कॉनॉट सभागृह’ व ‘वॅट्सन संग्रहालय’ (१८५८) ही आहेत. वॅट्सन संग्रहालय गुजरात सरकारच्या पुरातत्वविद्या विभागाच्या अखत्यारीखाली आहे. १९४९ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली. लोहमार्ग व रस्ते यांनी राजकोट राज्यातील महत्वाच्या ठिकाणांशी जोडलेले असून तेथे विमानतळही आहे. जवळच अजित धरण आणि पाल परी व राजेंद्र ही सरोवरे आहेत. शासकीय रूग्णालय, पदमकुंवरबा रूग्णालय, रसूलखानजी रूग्णालय इ. आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध आहेत. जनता बाग, सरदार बाग, जूबिली उद्यान, प्रद्युग्न उद्यान, चर्च, घड्याळ मनोरा, गांधी निवास, वॅट्सन संग्रहालय इ. शहरातील प्रेक्षणीय स्थळे होत.

चौधरी, वसंत