राइल, गिल्बर्ट : (१९ ऑगस्ट १९०० – ६ ऑक्टोबर १९७६). विसाव्या शतकातील प्रमुख ब्रिटिश तत्ववेत्ते. जन्म ससेक्समधील ब्राइटन येथे. शिक्षण क्वीन्स कॉलेज, ऑक्सफर्ड येथे. १९२४ मध्य राइल यांची क्राइस्टचर्च, ऑक्सफर्ड येथे तत्वज्ञानाचे व्याख्याते म्हणून नेमणूक झाली. दुसऱ्या महायुद्धात ते वेल्श गार्ड्स ह्या रेजिमेंटमध्ये दाखल झाले. त्यांची लष्करी गुप्त वार्ता विभागात नेमणूक झाली व ते मेजर ह्या हुद्यापर्यंत चढले. महायुद्धाच्या समाप्तीनंतर ते ऑक्सफर्ड येथे तत्वमीमांसेचे ‘वेन्फ्लेट प्राध्यापक’ म्हणून रुजू झाले व तेथूनच ते १९६७ मध्ये निवृत्त झाले. १९४८ ते १९७१ ह्या कालखंडात ते माइंड ह्या तत्वज्ञानात्मक नियतकालिकाचे संपादक होते. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातील प्रमुख ब्रिटिश तत्ववेत्त्यांमध्ये त्यांची गणना होते. द कॉन्सेप्ट ऑफ माइंड (मनाची संकल्पना –१९४९) हा त्यांचा सर्वांत प्रसिद्ध असा ग्रंथ आहे. फिलॉसॉफिकल आर्ग्युमेंट्स (तत्वज्ञानात्मक युक्तिवाद –१९४५), डायलेमाज (शृंगापत्ती–१९५४), अ रॅशनल अँनिमल (विवेकशील प्राणी – १९६२), प्लेटोज प्रोग्रेस (प्लेटोची प्रगती –१९६६) व द थिंकींग ऑफ थॉट्स (विचार करणे म्हणजे काय? –१९६८) हे त्यांचे इतर ग्रंथ होत. त्यांचे लेख दोन खंडांत कलेक्टेड पेपर्स या शीर्षकाने १९७१ मध्ये प्रसिद्ध झाले.
राइल यांचे तत्वज्ञानात्मक लिखाण मुख्यतः तत्वज्ञानाचे स्वरूप, मनाचे तत्वज्ञान आणि (भाषिक) अर्थ ह्या विषयांवर आहे.
तत्वज्ञानाच्या स्वरूपाविषयी त्यांची भूमिका अशी, की तत्वज्ञानाचे उद्दिष्ट दुहेरी असते. आपल्या विचारांत जो संकल्पनात्मक गोंधळ असतो, त्याचे निरसन करणे हा तत्वज्ञनाच्या उद्दिष्टाचा एक भाग आहे. हा संकल्पनात्मक गोंधळ होण्याचे प्रमुख कारण असे, की विधानांचा तार्किक आकार (लॉजिकल फॉर्म) आणि विधाने ज्या वाक्यांत व्यक्त झालेली असतात, त्यांचा व्याकरणात्मक आकार यांत आपण गल्लत करतो. उदा., ‘शंकराचार्य पूजनीय आहेत’ आणि ‘वैराग्य पूजनीय आहे’ ह्या दोन वाक्यांचा व्याकरणात्मक आकार एकच आहे. ती उद्देश्य विधेय ह्या आकाराची आहेत. ह्यावरून ह्या वाक्यांनी व्यक्त होणाऱ्या विधानांचा आकार एकच आहे असे आपण मानतो. ‘शंकराचार्य पूजनीय आहेत’ ह्या विधानात शंकराचार्य ह्या व्यक्तीचा उल्लेख आहे आणि ही व्यक्ती–वस्तू, पदार्थ–जगात आहे (किंवा होती) असे ह्या विधानात अभिप्रेत आहे. ह्या न्यायाने दुसऱ्या विधानात वैराग्याचा उल्लेख आहे आणि वैराग्य अशी वस्तूपदार्थ जगात आहे असे त्यात अभिप्रेत आहे, असा निष्कर्ष आपण काढतो. जगात जे काही आहे त्याची यादी केली तर तिच्यात शंकराचार्य, सह्याद्री अशा व्यक्तींची-वस्तूंची गणना करावी लागेल त्याप्रमाणे वैराग्य, स्थितिस्थापकता ह्या गुणांचीही गणना करावी लागेल, ह्या मताशी आपण येऊन ठेपतो. पण हा गोंधळ आहे. ‘वैराग्य पूजनीय आहे’ हे वाक्य ‘जो कोणी विरागी असेल तो विरागी असल्यामुळे पूजनीय असतो’ ह्या रीतीने मांडता येईल. ह्या दुसऱ्या वाक्यात ‘वैराग्य’ हा शब्द उद्देशाच्या स्थानी नाही आणि वैराग्य असा काही पदार्थ जगात आहे, असे मानण्याचे कारण उरत नाही. संकल्पनात्मक गोंधळाचे निरसन केले, की वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पनांची परस्परांशी कोणती तार्किक नाती असतात हे स्पष्ट होते. संकल्पनात्मक गोंधळासाठी ‘कॅटेगरी मिस्टेक’ (कोटिप्रसाद) हा शब्दप्रयोगही राइल यांनी वापरला आहे. एका प्रकारची संकल्पना वेगळ्या प्रकारची आहे, असे मानण्याने कोटिप्रसाद घडतो. आपल्या नेहमीच्या बोलण्यात, विज्ञानात, नैतिक निर्णयात व मूल्यमापनात ज्या संकल्पना अनुस्यूत असतात त्यांच्यामधील परस्परसंबंध स्पष्ट करणे हा तत्वज्ञानाच्या उद्दिष्टाचा दुसरा, विधायक भाग आहे.
द कॉन्सेप्ट ऑफ माइंड हे राइल यांचे प्रमुख पुस्तक. माणसाला मन असते, ह्या मनात घडणाऱ्या घटना खाजगी असतात, त्यांचे त्या, त्या व्यक्तीला साक्षात ज्ञान होते, पण इतरांना होऊ शकत नाही पण मानसिक घटना व शक्ती यांचा आविष्कार बाह्य वर्तनात होतो असे सर्वसाधारणपणे मानले जाते. मनाच्या स्वरूपाविषयीची ही समजूत संकल्पनात्मक गोंधळावर आधारलेली आहे आणि माणसे जे वर्तन करतात, ज्या प्रकारे ती वर्तन करतात आणि परिस्थिती भिन्न असती तर ज्या अन्य प्रकारचे वर्तन करायला ते उद्युक्त झाले असते, त्याचे वर्णन केल्याने मानसिक संकल्पनांचा संपूर्ण अर्थ विशद करता येतो, असा सिद्धांत राइल ह्यांनी त्या पुस्तकात मांडला आहे. हा प्रयत्न कितपत यशस्वी झाला आहे ह्याविषयी वाद असला, तरी ह्या ग्रंथाने मनाच्या तत्त्वज्ञानाला मोठी चालना दिली यात शंका नाही.
भाषिक अर्थाविषयी राइल यांनी मांडलेली भूमिका अशी : शब्द हे अर्थाचे मूळ वाहक असतात, वाक्य नव्हे ज्यांचा अर्थ आपल्याला अवगत असतो असे शब्द एकमेकांशी जोडून आपण वाक्ये बनवितो आणि त्यांचा बोलताना वापर करतो. शब्दाचा अर्थ माहीत असणे म्हणजे वाक्यात कशा प्रकारे त्याचा उपयोग करावा हे माहीत असणे पण शब्द आणि त्याचा अर्थ यांच्यामधील संबंधाविषयीचे एक चूक मॉडेल प्रचलित आहे. ‘देवदत्त’ हे विशेषनाम देवदत्त ह्या विशिष्ट पुरुषाचे वाचक आहे. ह्यावरून कोणताही शब्द घेतला, तर त्याचा जो अर्थ असतो त्या अर्थाचा तो शब्द वाचक असतो, असे मानण्यात येते. ‘देवदत्त’ ह्या शब्दाचे वाच्य असलेला देवदत्त हा माणूस जसा जगात आहे, त्याप्रमाणे कोणत्याही शब्दाने व्यक्त होणारा अर्थही जगात आहे असा निष्कर्ष ह्यावरून काढता येतो पण तो गैर आहे.
अलीकडल्या तत्त्वज्ञानात्मक विचाराला केलेल्या मौलिक योगदानासाठी राइल जितेक प्रसिद्ध आहेत तितकेच त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण भाषिक शैलीसाठीही ते प्रसिद्ध आहेत. व्हिट्बाय, नॉर्थ यॉर्कशर येथे ते निधन पावले.
पहा : भाषिक विश्लेषण मन.
रेगे, मे. पुं.
“