रॅली, सर वॉल्टर : (१५५२–२९ ऑक्टोबर १६१८). सुप्रसिद्ध इंग्रज दर्यावर्दी, लेखक, समन्वेषक आणि अमेरिकेतील आद्य वसाहतकऱ्यांपैकी एक. डेव्हनशर परगण्यातील फार्डेल या गावी जन्म. वडिलांचे नावही वॉल्टर रॅली, आईचे कॅथरिन गिल्बर्ट. ऑक्सफर्डच्या ओरिएल महाविद्यालयात काही काळ अध्ययन. १५६९ मध्ये फ्रान्समधील धर्मयुद्धांमध्ये ह्यूगेनॉट (फ्रेंच प्रॉटेस्टंट) यांच्या बाजूने त्याने भाग घेतला. पुढे मिडल टेंपल, लंडन येथे कायद्याचा अभ्यास (१५७५). १५८० च्या सुमारास आयर्लंडमधील बंडखोरीसंबंधी इंग्लंडच्या धोरणावर त्याने निर्भीड टीका केली. लवकरच एलिझाबेथ राणीची त्याच्यावर मर्जी बसली. परिणामतः त्याला किफायतशीर व्यापारी मक्तेदाऱ्या (उदा., मद्य, कापड इ.), मालमत्ता (उदा., म्यून्स्टरमधील प्रचंड स्थावरसंपदा) तसेच मानाची व अधिकारदर्शक पदे मिळत गेली. १५८३ च्या सुमारास तो कॉर्नवॉलचा संसद प्रतिनिधी बनला. सर हा किताब (१५८५) व राणीच्या रक्षकदलाचे कप्तानपद (१५८७) त्याला लाभले. १६०० मध्ये तो जर्सी (चॅनेल बेटांपैकी एक) बेटाचा गव्हर्नर झाला. सर निकोलस थ्रॉकमॉर्टन यांच्या एलिझाबेथ या मुलीशी रॅलीचा १५८८ मध्ये झालेला विवाह राणी एलिझाबेथपासून गुप्त ठेवण्यात आला होता. एलिझाबेथला झालेल्या मुलामुळे (१५९२) रॅलीचा हा गुप्त विवाह उघडकीस येऊन एलिझाबेथ राणीने रॅली पतिपत्नींना टॉवर ऑफ लंडनच्या तुरुंगात टाकले. पूर्वी एका सागरी मोहिमेत रॅलीने गुंतविलेल्या पैशातून त्याला चांगल्या प्रमाणात धनलाभ झाला व त्या पैशामुळे त्यांची कारावासातून मुक्तता झाली.
रॅली हा निर्भीड व स्पष्टवक्ता असून नौकानयनाबाबत मार्गनिर्देशनासाठी गणिताच्या अभ्यासाचे महत्व त्याने जाणले होते. रसायनशास्त्र, वैद्यक यांचाही अभ्यास त्याने केला होता. जबर आत्मविश्वास व देखणे व्यक्तिमत्व लाभलेल्या रॅलीला खानदानी भपका व डामडौल अत्यंत प्रिय होता.
एलिझाबेथ राणीबरोबर जसजसे रॅलीचे खटके उडत गेले, तसतशी त्याची वैयक्तिक कामगिरी विस्तारत गेल्याचे आढळते. १५८४ ते १५८९ या अवधीत त्याने रोनोके बेटाजवळ (सांप्रतचे नॉर्थ कॅरोलायना राज्य) एक वसाहत उभारली आणि तिला ‘व्हर्जिनिया’ असे नाव दिले मात्र त्याने या वसाहतीत अजिबात पाऊल ठेवले नाही. १५९५ मध्ये रॅलीने द. अमेरिकेतील सांप्रतच्या गुयानाकडे मोहीम काढली. या मोहिमेसाठी त्याला ओरिनोको नदीच्या उगमाच्या बाजूला जावे लागले. या नदीचे त्याने ६४४ किमी. पर्यंत समन्वेषण केले आणि स्पेनच्या वसाहत प्रदेशांतून त्याला ही मोहीम पार पाडावी लागली. रॅलीने आपल्या या मोहिमेचा वृत्तांत आपल्या द डिस्कव्हरी ऑफ गियाना (१५९६) या पुस्तकात वर्णिला आहे. स्पॅनिश दस्तऐवज (लेखकथने) तसेच रेड इंडियनांच्या तोंडून ऐकलेल्या आख्यायिका यांच्यावरून द. अमेरिकेच्या अंतर्भागात ‘एल्डोरॅडो’ नावाचे एक सुवर्णनगर असल्याची त्याची अगदी खात्री झाली होती. त्याने सोन्याच्या खाणींची काही ठिकाणेही दाखविली. तथापि त्या भागात जाऊन वसाहत करण्याच्या त्याच्या प्रकल्पाला कोणीही पाठिंबा दिला नाही. १५९६ मध्ये रॅली रॉबर्ट डेव्हेरक्स (अर्ल ऑफ एसेक्स) याच्याबरोबर स्पॅनिशांच्या कादीझ या शहरावर स्वारी करण्यासाठी गेला होता, पण ही मोहीम अपेशी ठरली १५९७ मध्ये वेस्ट इंडीजमधील अझोर्स बेटांवरील स्वारीच्या वेळी रॅली हा अर्ल ऑफ एसेक्सचा रिअर ॲडमिरल होता.
रॅलीने सदैव अंगिकारलेल्या स्पेनविरोधी आक्रमक धोरणांमुळे एलिझाबेथ राणीनंतर गादीवर असलेल्या शांतताप्रिय जेम्स राजाच्या (कार. १६०३–२५) निकट तो जाऊ शकला नाही. त्याला पुष्कळ हितशत्रू होतेच. १६०३ मध्ये जेम्स राजाला सत्ताभ्रष्ट करण्याच्या कारस्थानात इतरांसह रॅलीलाही गोवण्यात आले. हेन्री ब्रुक, लॉर्ड कॉबॅम इत्यादींच्या लेखी पुराव्यांवरून रॅलीवरील अपराध शाबित झाला आणि त्याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. तथापि शेवटच्या क्षणी ती तहकूब करण्यात येऊन त्याला टॉवर ऑफ लंडनच्या एका तुरुंगात ठेवण्यात आले. या तुरुंगात तो आपली पत्नी व मुलगा तसेच त्यांचे नोकर यांच्यासह सु. १३ वर्षे राहिला. या काळात त्याने शास्त्रीय प्रयोगांचा अभ्यास व तद्विषयक बरेच वाचन केले. राजपुत्र हेन्रीच्या आग्रहास्तव रॅलीने द हिस्टरी ऑफ द वर्ल्ड हा आपला प्रमुख ग्रंथ तुरुंगात असतानाच लिहिला. १६१६ मध्ये त्याची मुक्तता करण्यात आली तथापि त्याला माफ करण्यात आले नाही. गुयानामधील संपत्ती मिळविण्याकरिता रॅलीने जेम्स राजाजी खास परवानगी काढली आणि स्पेनविरोधी कोणतेही कृत्य न करता गुयानामध्ये एक सुवर्णखाण उघडण्याचे आश्वासन देऊन मोहीम हाती घेतली. अंगात अतिशय ज्वर असल्याने रॅलीला आपल्या खलाशांना घेऊन नदीच्या वरच्या बाजूस स्वतः जाता आले नाही. लॉरेन्स केमिस या त्याच्या साहाय्यकाने स्पेनची एक वसाहत नष्ट केली याच मोहिमेत रॅलीचा वॉल्टर हा मुलगा मारला गेला. इंग्लंडला परतल्यावर १६०३ मध्ये माफ केलेली रॅलीची मृत्युदंडाची शिक्षा जेम्स राजाने पुन्हा दिली आणि टॉवर ऑफ लंडनमध्ये त्याचा शिरच्छेद करण्यात आला.
मृत्यूनंतर (१६१८) त्याचे काही प्रासंगिक लेख एकत्रित करण्यात येऊन प्रसिद्ध करण्यात आले. त्याने लिहिलेली काही कविता (५६० ओळी) संगृहीत करण्यात आली आहे. काही कवितांत एलिझाबेथ राणीला ‘सिंथिया’ या नावाने संबोधित करण्यात आले आहे. रॅलीच्या उत्तम गद्यलेखनांमध्ये (१) द डिस्कव्हरी ऑफ गियाना, (२) ए रिपोर्ट ऑफ द ट्रूथ ऑफ काइट अबाउट द आइल्स ऑफ अकोर्स लास्ट समर (१५९१ –या ग्रंथाचे दुसरे नाव : द लास्ट फाइट ऑफ द रिव्हेंज), (३) द हिस्टरी ऑफ द वर्ल्ड (१६१४) या ग्रंथांचा समावेश होतो.
संदर्भ : 1. Rowse, A. L. Sir Walter Ralegh : His Family and Private Life, New York, 1962.
2. Wallace, W. M. Sir Walter Ralegh, Oxford, 1959.
गद्रे, वि. रा.