रहिमतखाँ : (?−जून १९२२). हिंदुस्थानी संगीतातील ग्वाल्हेर घराण्याचे प्रख्यात गायक. प्रसिद्ध गायक ⇨हद्‌दूखाँ यांचे कनिष्ठ चिरंजीव आणि गोड गळ्यामुळे ‘भूगंधर्व’ या पदवीने महाराष्ट्रात विख्यात. रहिमतखाँवडिलांपासूनच गायनविद्येचे शिक्षण. वडील निवर्तल्यावर त्यांच्या जीवनाची बरीच वर्षे वाताहत झाली, पण पुढे त्यांचेच गुरुबंधू असलेल्या सर्कसचालक विष्णुपंत छत्रे ह्यांनी त्यांना बनारसहून आणून भावाप्रमाणे आपल्याजवळ बाळगले आणि त्यांची बडदास्त राखली. महाराष्ट्राला त्यांच्या अद्वितीय गाण्याची ओळख विष्णुपंतांनीच करून दिली. रहिमतखाँ पुढे दक्षिण महाराष्ट्रात कुरुंदवाडकरांच्या दरबारी पाहिले. रहिमतखाँची आवाजी पराकाष्ठेची मधुर, सुरेल, बारीक, जोरदार आणि बांगडीसारखी खणखणीत होती. त्यांची तान तर केवळ अद्वितीय गणली जाते. ती अत्यंत दाणेदार, कमालीची वेगवान, अतिशय अकृत्रिम आणि लयदृष्ट्या अचूक असे. म्हणूनच त्यांना ‘तानके कप्तान’ म्हणत. गोविंदराव टेंबे यांनी त्यांच्या या तानेचे वर्णन ‘मघात बुडविलेला द्राक्षांचा घोस’ असे केलेले आहे. वडील हद्दूखाँ त्यांना ‘मधाची कुपी’ म्हणत. कुरुंदवाड येथे त्यांचा मृत्यू झाला.

मंगरूळकर, अरविंद