रमावल्लभदास : मराठी कवी आणि टीकाग्रंथकार. त्यांच्या जन्ममृत्युसनांबद्दल ऐकमत्य नाही. पांगारकरांच्या मते त्यांचा काळ १५८८ ते १६४८ (शके १५१० ते १५७०), तर सांप्रदायिक मतानुसार तो १६०९ ते १६६८ (शके १५३१ ते १५९०) असा आहे. महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावे हे रमावल्लभदासांचा जन्मशक १५३२ (सन १६१०) असा देतात.
रमावल्लभदासांचे वडील अंबाजीपंत ऊर्फ यमाजीपंत राळेरासकर हे देवगिरी ऊर्फ दौलताबादच्या राजाचे कारभारी होते. रमावल्लभदासांचे मूळ नाव तुकोपंत. त्यांच्या वडिलांकडे असलेले दौलताबादच्या राजाचे कारभारीपद पुढे त्यांच्याकडे आले. त्यानंतर लवकरच परसैन्याशी झालेल्या लढाईत त्यांनी भाग घेतला. ह्या लढाईत दौलताबादच्या राजाचा विजय झाल्यानंतर शत्रुसैन्याची लुटालुट करण्यात आली. त्या लुटीत रमावल्लभदासांच्या हाती एकनाथी भागवताची प्रत आली. तिच्या वाचनाने हे हळूहळू विरक्त्त झाले. पुढे लक्ष्मीधरनामक एका सत्पुरुषांकडून त्यांनी गुरूपदेश घेतला. लक्ष्मीधरांनीच त्यांचे नाव ‘रमावल्लभदास’ असे ठेविले.
त्यांच्या ग्रंथरचनेत गीतेवरील चमत्कारी टीका, शंकराचार्यांच्या बृहद्वाक्यवृत्तीवरील वाक्यवृत्ति ही टीका, भागवताच्या दशमस्कंधाद्वारे लिहिलेला ग्रंथ दशकनिर्धार, गुरुवळी हे गुरुमहिमापर प्रकरण आणि संतनामावळी ह्यांचा समावेश होतो. ह्यांशिवाय त्यांची शिष्या आवडाबाई हिला उद्देशून त्यांनी लिहिलेली अकरा ओवीबद्ध पत्रे प्रबोधचंद्रिका प्रकरण म्हणून ओळखली जातात. अनेक अभंग व पदेही त्यांनी रचिली आहेत. वैष्णवगति हा एक अनुपलब्ध ग्रंथही त्यांच्या नावावर मोडतो.
रमावल्लभदासांनी कृष्णभक्त्तीचा प्रसार केला. कृष्णचरित्राचे संकीर्तन हा त्यांच्या कवितेचा एक लक्षणीय विशेष होय. त्यांनी रचिलेली कृष्णभक्त्तिपर पदे गोड आहेत. गोमंतक-कारवार भागांत रमावल्लभदासांची परंपरा आहे. त्यांची उपर्युक्त्त शिष्या आवडाबाई हिचा मठ मल्लापुरम् येथे असून तेथे प्रतिवर्षी कृष्णजयंती साजरी केली जाते.
सु. गो. उभयकर ह्यांनी श्रीरमावल्लभदासाची गाथा संपादिली असून (१९२८), चमत्कारी टीकेचे संपादन त्यांनी व रा. कृ. कामत ह्यांनी केले आहे (१९२५).
ग्रामोपाध्ये, गं. ब.