रनो, बेर्नार : (४ मार्च १८३६–१६ ऑक्टोबर १९०४). फ्रेंच वनस्पतिशास्त्रज्ञ. कार्बॉनिफेरस कल्पातील (सु. ३५ ते ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) वनस्पतींच्या जीवाश्मांच्या (शिलारूप अवशेषांच्या) साहाय्याने त्यांचे शारीरविषयक संशोधन हे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले.

रनो यांना जन्म ओत्यूँ येथे झाला व नंतर तेथील महाविद्यालयात शिक्षण झाले. १८५५ मध्ये त्यांनी पदवी संपादन केली व दीझाँ येथील ब्रेनो इन्स्टिट्यूटमध्ये ते भौतिकी व रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. १८६७ मध्ये त्यांनी पॅरिस येथे भौतिकीतील पीएच्‌.डी. पदवी मिळविली आणि त्याच वर्षी क्लूनी येथील माध्यमिक शाळेत भौतिकी व रसायनाशास्त्राचे शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्याचवेळी एक छंद म्हणून त्यांनी वनस्पतींच्या जीवाश्मांचा अभ्यास केला. १८७२ मध्ये पॅरिसमधील नॅचरल हिस्टरी म्यूझियममध्ये त्यांची प्रिपरेटर (वैज्ञानिक अभ्यासाकरिता नमुने तयार करणारे तज्ञ) या पदावर नेमणूक झाली आणि १८७६ पासून ते १९०४ पर्यंत तेथेच साहाय्यक निसर्गशास्त्रज्ञ या पदावर त्यांनी कार्य केले. स्फेनोफायलमच्या [⟶ स्फेनोफायलेलीझ] खोडाची अंतर्रचना अभ्यासून त्यासंबंधी त्यांनी संशोधन प्रसिद्ध केले. त्यानंतर बॉट्रिऑप्टेरिस या प्रारंभिक नेचाचा शोध लावून बॉट्रिऑप्टेरिडेसी कुलाची त्यांनी स्थापना केली. पोरोझायलॉन या प्रजातीच्या शोधानंतर १८७९ मध्ये त्यांनी कॉर्डाइटेसीच्या [⟶ कॉर्डाइटेलीझ] संरचनेचा वृत्तांत प्रसिद्ध केला. पुराजीव महाकल्पातील (सु. ६० ते २४ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) काही बीजी वनस्पतींमध्ये चल रेतुके (पुं-जनन पेशी) असावीत, असे त्यांनी गृहीत धरले होते, तसेच काही सूक्ष्मजीवांचे जीवाश्मही त्यांनी वर्णिले आहेत. पुराजीव महाकल्पातील सर्वच वनस्पतींच्या गटाचे (नेचे, बीजी नेचे, लायकोपोडस, एक्विसीटम कॅलॅमाइट्स, सायकॅडस व कॉनिफर्स, सायलोफायटेलीझ इत्यादींचे) शारीरविषयक संशोधन त्यांनी स्वतंत्र ग्रंथांत प्रसिद्ध (१८९३–९६) केले आहे. ‘रेनॉल्टिफिकेलीझ’ हे नाव त्यांच्या सन्मानार्थ नेचांच्या गटाला (प्रायमोफिलिसिसला) दिले आहे. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि.