रंगमंदिर : रंगमंदिराचा वापर नाटके आणि नृत्ये , संगीतिका इ. दाखविण्यासाठी प्रामुख्याने होतो. रंगमंदिर ही खरी अभिनयदर्शनाची जागा आहे. अनादि कालापासून मानवाला काही लोकांनी केलेले हावभाव , धार्मिक नृत्ये व साभिनय कथने समूहाने बघावयाची सवय व आवड आहे व यासाठी सुरुवातीला देवळांचे मंडप , उघडी मैदाने , झाडांचे पार , गुहा ह्यांचा वापर झाला. प्रेक्षकांना नीट दिसण्यासाठी अभिनयाची जागा किंवा रंगमंच उंच करण्यात आला. हा रंगमंच व प्रेक्षागार हे रंगमंदिराचे पहिले घटक. नाटकाचे धार्मिक स्वरूप जाऊन त्याला बहुजनसमाजाच्या करमणुकीच्या साधनाचे स्वरूप आल्यावर जास्त लोकांची बसण्याची सुखसोय साधण्यासाठी नाट्यमंडप किंवा खास रंगमंदिराची व्यवस्था करण्यात आली व त्याबरोबर उतरत्या पायऱ्या किंवा टप्पे यांवर प्रेक्षकांची बसण्याची सोय करण्यात आली. नटांच्या रंगभूषेचे महत्त्व , पात्रांची वाढती संख्या , वाद्यवृंदाची आवश्यकता यांमुळे नेपथ्यगृहाची योजना व पडद्यांचा वापर रूढ झाला व रंगमंदिराचे प्रमुख तीन घटक अस्तित्वात आले. निरनिराळ्या देशांत , त्या त्या देशाच्या विशिष्ट रंगभूमिविषयक गरजांमुळे रंगमंदिराच्या रंगपीठ , नेपथ्यगृह , प्रेक्षागार वगैरे घटकांच्या अन्योन्य प्रमाणात , रचनेत व त्यामुळे संपूर्ण रंगमंदिराच्या रचनेतही विविध स्वरूपाचे बदल दिसून येतात. याच कारणांकरिता रंगमंदिराचा विचार करताना पौर्वात्य आणि पाश्चिमात्त्य रंगमंदिराचा अलग विचार करावा लागेल.
पौर्वात्य रंगमंदिरे : ईजिप्त देशातील रंगमंदिराच्या रचनेबाबत खास माहिती मिळत नाही पण त्यांचा वापर राजपरिवारासाठी व धर्माधिकाऱ्यांसाठी होत असे. चीन , जपान , जावा येथील रंगमंदिरे लाकडी असून रेशमी पडद्याच्या तंबूंचा वापर रंगमंचासाठी होई. जपानमध्ये नो व काबुकी नाट्यप्रकारांसाठी वेगवेगळी रंगमंदिरे वापरत. नो रंगपीठ हिनोको लाकडापासून बनविलेल्या चार खांबांवर आधारित छपराखाली असे व मागील बाजूला सुरूच्या झाडांचे चित्र असून इतर तिन्ही बाजू उघड्या असत. याउलट काबुकी प्रकारात फिरते रंगपीठ , रंगभूमीवरील चोरदरवाजे , वादळ व भूकंपाचे आभास ह्या सर्वांचा वापर फार रुंद व कमी खोल रंगपीठावर करण्यात येई. रंगपीठाची अवास्तव लांबी नटांच्या आडव्या हालचालींमुळे जरुरीची होती. काबुकी रंगपीठाच्या उजव्या बाजूस चढत जाणारी व समूहदृश्ये , मिरवणुकी व पीठप्रवेश यांसाठी वापरावयाची फुलांची वाट ही खास वैशिष्ट्ये आहेत.
भारतीय रंगमंदिराची योजना देऊळ , राजवाडे , तसेच नागर समाजाच्या वापरासाठी स्वतंत्रपणे केलेली आढळते. रंगमंदिराचे आकार वर्तुळाकृती , अर्धवर्तुळाकृती , त्रिकोणी , चौकोनी असे अनेक असून अभिनयगुप्ताने आकार व विस्ताराच्या दृष्टीने त्याचे १८ प्रकार वर्णिले आहेत. प्रेक्षागृह व रंगपीठ हे दोन प्रमुख भाग. प्रेक्षागृह हे रंगपीठाकडे तोंड करून बांधलेले असून त्याची योजना पीठाच्या आकारावर अवलंबून असे. देवळातील उघड्या रंगमंदिरातील गणांसहित देव , चक्रवर्ती महाराज , राजे , सरदार व त्यांचा परिवार आणि प्रजाजन या सर्वांसाठी खास आसनांची असलेली व्यवस्था मानसारा त वर्णिली आहे.
प्राचीन भारतात मोहें-जो-दडो व हडप्पा येथे , तसेच रामगड , उदयगिरी येथील गृहांत भरतकालीन नाट्यगृहे असावीत , तसेच प्रसिद्ध कैलास लेण्यातही संगीत-नृत्यादी कार्यक्रम होत असावेत.
भरतमुनींच्या नाट्यशास्त्रा नुसार प्राचीन रंगमंदिराच्या बांधणीत ध्वनियोजना , रंग , उजेड , हवा , अग्नी इत्यादींचा तसेच राक्षसांपासून संरक्षण ह्या सर्वांचा विचार होत असे. रंगपीठावर वाद्यवृंदांची योजना रंगमंचाच्या समोरच असे. प्रेक्षागारात अनेक पायऱ्यांच्या ढाळावर बसविलेल्या बैठका , गच्च्यांच्या बैठकी व मकर , व्याघ्र , गज यांच्या आकृतींनी युक्त असे नक्षीकामाचे नेपथ्य , कलाकुसरीचे काम असलेल्या भिंती , खिडक्या व दरवाजे वापरीत असत. खुल्या रंगमंदिराचे रंगपीठ वरून व बाजून झाकलेले असे. रामायण , महाभारत तसेच नाट्यशास्त्र , शिल्परत्न , संगीत चूडामणी , मानसार आदि ग्रंथांतून रंगमंदिराचे प्रकार , स्तंभ , दरवाजे , भिंती , नेपथ्यगृह यांची मांडणी व खास योजना यांची माहिती आढळते. उदा. , रंगशीर्ष सहा प्रकारच्या लाकडांनी समन्वित असावे व दोन खास द्वारे नेपथ्याकडे जाण्यासाठी इतरत्र योजावी , अशी सूचना आढळते. ग्रीक रंगमंदिरे सर्व जनतेसाठी होती , तर भारतीय रंगमंदिरे किंवा रंगशाळा खास निवडक लोकांसाठी असत. उपरोक्त प्राचीन ग्रंथांतून फक्त राजा , प्रधान , दरबारातील मानकरी , विद्वज्जन व अंतःपुरातील स्त्रिया यांनी कोठे व कसे बसावे , यासंबंधीच्या सूचना आहेत. रंगमंचाचे तीन मुख्य भाग वर्णिले आहेत. रंगपीठाच्या समोरचा भाग म्हणजे रंगशीर्ष , त्यामागील रंगमध्य आणि प्रसाधानाची जागा म्हणजे नेपथ्यगृह. रंगशीर्षास रंगमुख आणि रंगपीठाच्या बाजूस रंगस्निशा अशी नामाभिधाने आहेत. भारतीय रंगमंदिराच्या बांधणीची कला बाराव्या शतकापर्यंत परिपूर्णत्वास पोहोचली होती , हे ह्या वर्णनावरून समजते.
पाश्चात्य रंगमंदिरे : पाश्चात्त्य रंगमंदिराचा उगम ग्रीक लोकांच्या स्थापत्यातून झाला. डायोनायसस हा ग्रीकांचा रसराज देव , त्यासाठी अथेन्समधील लोकांनी रंगमंदिरे बांधली. ती वर्तुळाकृती व डोंगरांच्या कडेला उतारावर असत. पेरिक्लीझच्या काळात रंगमंदिराच्या प्रेक्षागारात वाढ होऊन जवळजवळ १४ , ००० प्रेक्षकांची बैठकीची सोय करण्यात आली. दगडामध्ये असलेली छिद्रे व खाचा यांवरून तत्कालीन रंगमंदिरात मागील नेपथ्याचा वापर सुरू झाला असावा , असे दिसते. अभिजात ग्रीक शोकात्मिकांच्या प्रयोगात लाकडी चाकाचे फिरते मंच दृश्ये झटपट बदलण्यासाठी वापरत. मागील पडद्यावर दुमजली राजवाडा व गच्च्या चित्रित करण्यात येत. देवदूतांचे आभास निर्माण करण्यासाठी याऱ्यांचा वापर करून पात्रांना रंगमंचावर वरून खाली सोडण्यात येत असे. रोमन लोकांनी रंगमंदिराची वाढ वाद्यवृंदाचा भाग कमी करून व रंगमंचाच्या पायऱ्या व पटाची वाढ करून साधली. मांडणीसाठी त्यांनी वर्तुळाकृती व अनेक पायऱ्या व टप्पे असलेली रंगमंदिरे उपयोगात आणली.
मध्ययुगात ख्रिस्ती धर्माच्या पगड्यामुळे एकंदर नाट्यव्यवसायाला ओहोटी लागली व फक्त फिरत्या लहान नाटकमंडळ्या अस्तित्वात राहिल्या. ह्या भाटांचे कार्यक्रम छोट्या जुजबी लाकडी मंचावर होत. पाललाद्यो , साब्बातीनी , स्कामॉतत्सी , इनिगो जोन्स इ. स्थापत्यशास्त्रज्ञांनी अभिजात रंगमंदिरा ं चा पुनरुद्धार केला. साब्बातीनी ह्याने कमानी , रस्त्यावरील दृश्ये वापरून रंगपीठाला खोलीचा आभास निर्माण केला. इंग्रजी व यूरोपियन रंगमंदिरांची वास्तू त्यांच्या वापरानुरूप वेगळी होती. इंग्रजी रंगमंदिराचा वापर नाटकासाठी होता , तर यूरोपियन रंगमंदिरात नाच , गाणी , सामूहिक गाणी , मूकाभिनय इ. कार्यक्रमही नाटकाबरोबरच सादर केले जात. रेनचे लंडनमधील ‘थिएटर रॉयल ’ ( १६७४) व पार्मा ( इटली) येथील ऑलीओतीचे ‘थिएटर फ्रानेसी ’ ( १६१८) ही सुरुवातीची बांधीव रंगमंदिरे. यूरोपात रंगमंचावरील दृश्यालाच महत्त्व असल्यामुळे एकाच ढाळावर आसनांची व्यवस्था होती व त्यासमोरील सपाट जागा नाट्यासाठी वापरीत. उलट इंग्रजी नाट्यगृहातील टप्प्यांच्या उतारावर बैठकीची हारीने मांडणी असे. रंगमंचाचा पडदा २१ फूट ( सु. ६.४ मी.) मागे असून मंचकाचे रंगमुख , रंगशीर्ष , रंगमध्य व नेपथ्यगृह असे भाग होते. रंगशीर्षाचा वापर नाट्यासाठी होता , तर रंगमंचाजवळ बदलते नेपथ्य योजण्यात येत असे. रंगमुखावर अनेक गच्च्यांचा वापर खास जागांसाठी केलेला असे. गच्च्यांच्या वापरामुळे नट व प्रेक्षक यांमध्ये एकोप्याचे वातावरण निर्माण होण्यास मदत होत असे.
सतराव्या शतकापर्यंत दोन्ही पद्धतींचे एकत्रीकरण झालेले दिसून येते. रीजन्सी कालखंडात सर्वांत मोठी रंगमंदिरे निर्माण झाली. हेन्री हॉलंडचे लंडन येथील ड्रु री लेन ( १७९४) , पॅरिसचे तिआय्य फ्रान्सेझ व मिलान येथील ल् स्काला ह्या नालाकृती वास्तूंत अनेक हारींमध्ये प्रेक्षकांच्या बसण्याच्या जागा होत्या. कालांतराने रंगमंचाचा समोरी ल भाग लहान होत गेला व त्याबरोबर गच्च्यांवरील जागांचे महत्त्व कमी झाले. रंगमंचासमोरील पहिल्या ओळीतील जागांचे महत्त्व वाढू लागले. वरील बसण्याच्या जागांच्या वाढीमुळे त्यांच्या आधाराचे आकार वाढून त्याचा त्रास होऊ लागला. नंतर झुकावाचे बांधकाम वापरून खांबांचा वापर थांबवण्यात आला.
रंगमंदिराच्या तलच्छंदात १८७६ च्या सुमारास मूलगामी बदल जर्मनीच्या बेरूत फेस्टसपलिहॉस या वास्तूत गोटफ्रीट झेंपर ह्या वास्तुशिल्पज्ञाने व्हागनरच्या मार्गदर्शनाखाली केला. ह्यामुळे आरंभीच्या अनेक मजल्यांच्या नालाकृती रंगमंदिराऐवजी पंख्याच्या आकाराचे प्रेक्षागार वापरात आले. माक्स लिटमान ह्या जर्मन वास्तुशिल्पज्ञाचे म्यूनिक येथील प्रिन्स रीजन्ट चार्लटन , बोर्ग येथील शिलर , म्यूनि येथील कुन्स्टलर रंगमंदिरे एका उताराच्या तलच्छंदाचा वापर करून बांधली व याच धर्तीवर इंग्लंडमध्ये स्ट्रॅटफर्ड-ऑन-ॲव्हन या शेक्सपिअर स्मृतिमंदिराचा आराखडा १९३२ साली बनविण्यात आला.
अमेरिकेमध्ये या बदलांचा परामर्श फार उशिरा घेण्यात आला. जोसेफ अर्बन ह्याने त्याचा प्रथम वापर केला. रंगमंचावरील जागा दिवे , पडदे , रंगमुखाची योजना यांसाठी वापरता येते. पण ही जागा फार मोठी होऊ लागल्याने फिरता रंगमंच व रूळांवरच्या सरकत्या रंगमंचाची आडवी योजना कमी वेळात जास्त बदल करण्याच्या उद्देशाने मूर्त करण्यात आली. यामुळे रंगमंचाची उंची कमी होऊन वास्तूचा ऊर्ध्वच्छंद जास्त आधुनिक करण्यास वास्तुशिल्पज्ञास वाव मिळाला. उजेडाची व्यवस्था ज्यावेळी मध्यवर्ती विद्युत् केंद्रातून होऊ लागली , तेव्हा ती उंची आणखी कमी झाली.
रंगमंदिराच्या व नाट्यप्रयोगाच्या कल्पनांत १९१५ पासून आधुनिक दृष्टिकोन प्रभावी ठरले. रंगमंचाचे , उजेडाचे , बदलत्या दृश्याचे अवडंबर कमी करून अभिनयाला महत्त्व प्राप्त झाले व त्याचे पर्यवसान नॉर्मन बेत गेडिस ह्याच्या वर्तुळाकृती रंगमंदिरासारखे अनेक नवीन वास्तुप्रकार निर्माण होण्यात झाले. नटांवर प्रखर प्रकाशझोत टाकून रंगमंचाचे इतर भाग काळोखात ठेवण्याच्या उपक्रमामुळे रंगमुखाचेही महत्त्व कमी झाले.
अभिव्यक्तिवादी नाटककारांनी निरनिराळ्या प्रतीकांचा वापर करून पीठावरच्या आभासाची गरज आणखी कमी केली. मिडसमर नाइट्स ड्रीम , ग्रँड होटेल , सीझर अँड क्लिओपात्रा ह्यांसारख्या कलाकृतींना फार मोठे रंगमंच व रंगशीर्षाची जरूरी असे. टाक्यांचा वापर करून निर्माण केलेली पावसाची दृश्ये , उजेड आणि आवाजच्या साह्याने निर्माण होणारी वादळे व गडगडाट , आगीची , ढगांची दृश्ये , हिमवृष्टी व इंद्रधनुष्याचे आभास अशा अनेक क्लृप्त्यांची आवश्यकता नाहीशी झाली. अप्रतिरूपी , अभिव्यक्तिवादी , दृक्प्रत्ययवादी अशा रंगमंचांच्या मांडणीचा वापर हर्मन रॉस , एडमंड स्ट्रम , अलेक्झांडर बॉक्सी ह्यांनी केला.
रंगमंदिराचा वापर सातत्याने अव्यावसायिक कलाकारांकडून नृत्य , वाद्यवृंद कार्यक्रम , गाण्याचे कार्यक्रम इ. इतर कार्यक्रमांसाठी होऊ लागला व त्याचा परिणाम रंगमंदिराची सर्वोपयोगी योजना होण्यात झाला. जमिनीच्या वाढत्या किंमतीमुळे न्यूयॉर्कसारख्या शहरात रंगमंदिराच्या वास्तूत कचेऱ्या , पतपेढ्या इत्यादींची योजना करण्यास नगरपालिकांनी परवानगी दिली. मुंबईचे बिर्ला मातुश्री सभागृह किंवा भारतीय विद्याभवन ही भारतातील उदाहरणे. धंदेवाईक नाट्यमंदिरांचा ऱ्हास व सर्वोपयोगी रंगमंदिरांचा उगम एकाच वेळेस झाला. रंगमंदिराची बहिर्रेखा ( शिखररेखा) , ऊर्ध्वच्छंद यांचा विचार वास्तूच्या पूर्ण आकाराच्या दृष्टीने होऊ लागला. त्याबरोबर जलपाळण्याचा वापर करून रंगपीठावरील मांडणी क्षणार्धात पडद्यामागे तळघरात नेण्याची किंवा जरूरीप्रमाणे वाद्यवृंदाची जागा बाहेर आलेले रंगशीर्ष म्हणून वापरण्याची सोय झाली.
वेनिंगर आणि वॉल्टर ग्रोपिअस यांच्या कल्पनांचा परिणाम रंगमंदिराच्या वास्तुकलेवर झाला. दोन प्रेक्षागृहांची जोड करून निर्माण झालेल्या , गेरहार्ड चेंबर या वास्तुशिल्पज्ञाच्या मॅनहाइम येथील राष्ट्रीय रंगमंदिरावरून ( १९५३) बदलत्या रंगमंदिराची कल्पना येते. व्हर्नर राहू , इमॅन्युएल लिडर , सॅपमन , पीटर मोन्नार ह्या वास्तुशिल्पज्ञांनी अनेक प्रयोग केले. जॉर्ज युटझनचे सिडनी शहरातील रंगमंदिर मोठ्या शिल्पाकृती छताने आच्छादित असून ह्यामध्ये दोन प्रेक्षागारे आहेत. करमणुकीचे व सांस्कृतिक कार्यक्रम , प्रायोगिक नाट्य , नाट्यशाला , सुगम संगीत , वाद्यवृंदाचा कार्यक्रम ह्या सर्वांसाठी येथे सोय आहे. तसेच उपहारगृहे , विश्रांतिगृहे ह्यांचीही व्यवस्था आहे.
पडसाद , कोती श्रवणक्षमता , आवाजाचा लोप किंवा विपर्यास ह्या सर्व गुणदोषांवर अठराव्या शतकातील अगडबंब असे रंगशीर्ष , अंतर्गत पडदे , गालिचे ह्यांमुळे पांघरूण घातले जाई. आधुनिक सुसूत्र अशा रंगमंदिरांत अनेक सपाट भिंती व छते असल्यामुळे ध्वनिनियंत्रणासाठी सरकपट्ट्या , त्रिकोणी दंडगोल , फिरती छते व भिंती आणि सरंजामी खुर्च्या यांचा वापर करण्यात आला.
आधुनिक रंगमंदिरांच्या आकाराबाबत खास नियम नाहीत. पण एकंदर वास्तूचा सर्वांगीण विचार करून आयोजन केले जाते.
महाराष्ट्रातील अलीकडे निर्माण झालेल्या रंगमंदिरांत प्रायोगिक नाट्यासाठी सूत्रबद्ध जागा , संगीत व आवाजाची पुरेपूर लय राखणारी ध्वनिव्यवस्था अशी खास वैशिष्ट्ये आहेत. रवींद्र नाट ्य मंदिर ( मुंबई) , बिर्ला मातुश्री सभागृह ( मुंबई) अशा वास्तूंवर भारतीय वास्तुवैभवाचा ठसा उमटलेला दिसतो. टाटा रंगमंदिराचा परिसरच मोठा नयनमनोहर आहे. सभोवार उत्तम स्थळशिल्पे निर्माण करून वास्तुकारांनी योग्य वातावरण निर्माण केले आहे. त्याबरोबर काच , लाकूड , दगड व सिमेंट-काँक्रीटच्या माध्यमांतून एका वेगळ्याच वास्तुवैभवाचा आविष्कार येथे केला आहे. विदेशी तसेच भारतीय संगीत व गायन कृत्रिम ध्वनिव्यवस्थेशिवायही ऐकू यावे , अशा प्रकारचा या रंगमंदिराचा आकार आहे.
पावसाळ्यात खुल्या रंगमंदिराचा वापर करता येत नसला , तरी उन्हाळ्यात कोणत्याही कृत्रिम साधनांशिवाय अशी रंगमंदिरे हजारो प्रेक्षकांची सोय करू शकतात. अशा प्रकारचे रंगमंदिर मुंबईत आहे परंतु इतरत्र अशा रंगमंदिराचा वापर अजून केला जात नाही. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरासभोवती ही उत्तम बागबगीचा केलेला आहे. विस्तृत मोकळी जागा राखल्यामुळे व जवळचे पुतळे , कारंजी यांमुळे एकंदर वास्तूचे वैभव वाढते. नुकतेच येथे एक मोठे भित्तिशिल्पही लावण्यात आले आहे. अशा प्रकारच्या बाहेरच्या सोंयीबरोबर आतील रचनाही महत्त्वाची असते. सोबतच्या कलादालनात चित्रकला व शिल्पकला यांचे नमुने व प्रदर्शने रसिकांना पहावयास मिळतात.
अंतर्गत पडदे , गालिचे , रंगशीर्ष वगैरेंचा उत्तम वापर पुणे , नागपूर येथील आधुनिक रंगमंदिरांत आढळतो. वातानुकूलित असूनही अनेकवेळा या वास्तूंमधील हवा नेहमीच्या साध्या नाट्यगृहांपेक्षा दूषित असते. याला कारण खंडित वीजपुरवठा आणि संयोजकांकडून केला जाणारा विजेचा कमी वापर. यावर उपाय म्हणून जास्त प्रमाणात हवा बाहेर खेचणारे पंखे वापरणे आवश्यक आहे.
एकत्रित किंवा पूर्ण रंगमंदिरे ही नवीन वास्तुसंकल्पना मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे. नव्या रंगमंदिरांमध्ये प्रायोगिक रंगभूमीसाठी आवश्यक यांत्रिक-तांत्रिक सुविधा उपलब्ध करता येतात.
संदर्भ : 1. Bell, Stanley Ma r shall, Norman Southern, Richard, Essentials of Stage Planning, London, 1949.
2. Powley, Frederie, Theatre Architecture: A Brief Biblography , New York, 1932.
3. Sabine, Paul E. Acoustics and Architecture, London, 1932.
कान्हेरे , गो. कृ.
“