योसा बुसान : (१७१६–१७ जानेवारी १७८४). जपानी कवी आणि चित्रकार. केवळ बुसान ह्या नावानेही ओळखला जातो. मूळ नाव तानिगुची बुसान. सेत्सू प्रांतातील केमा येथे एका संपन्न कुटुंबात त्याचा जन्म झाला. कलेच्या अभ्यासासाठी घराबाहेर पडून त्याने बराच प्रवास केला. हाइकू ह्या काव्यप्रकारावर प्रभुत्व मिळविण्यासाठी त्याने अनेक गुरू केले. १७५१ मध्ये क्योटो येथे व्यावसायिक चित्रकार म्हणून तो काम करू लागला. १७५४ ते १७५७ ही तीन वर्षे त्याने तांगो प्रांतातील योसा येथे काढली. तेथे असतानाच योसा बुसान हे नाव त्याने घेतले. हाइकू ह्या काव्यप्रकाराची जपानी साहित्यातील परंपरा विशेष संपन्न करणाऱ्या ⇨मात्सुओ बाशो (१६४४–९४) ह्या श्रेष्ठ जपानी कवीबद्दल त्याला नितांत आदर होता. बुसानच्या कवितेवर त्याच्यातल्या चित्रकाराचा ठसा उमटल्याचे दिसून येते. संपन्न दृश्यात्मकतेचा प्रत्यय हा त्याच्या कवितेचा एक विशेष होय.
क्योटो येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.