येनान जाऊंग : ब्रह्मदेशाच्या उत्तरेकडील माग्वे जिल्ह्यातील एक शहर. हे इरावती नदीच्या पूर्व किनाऱ्यावर मंडालेच्या उत्तरेस २१७ किमी. अंतरावर वसले आहे. लोकसंख्या २४,४१६ (१९८३). ब्रह्मदेशातील अनेक वर्षांपासून सर्वाधिक तेलउत्पादन करणारे तेलखाणींचे हे महत्त्वाचे केंद्र आहे. ब्रह्मदेशातील विद्यमान तेलउत्पादन क्षेत्रांमध्ये चौक या शहरानंतर याचा दुसरा क्रमांक लागतो. रंगूनजवळील सिरियाम येथील तेलशुद्धीकरण कारखान्याला तेलाच्या नलिकांद्वारे हे केंद्र जोडले आहे. १८८७ नंतर या शहराच्या आधुनिकीकरणाला सुरुवात झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानच्या ताब्यात असताना हे महत्त्वाचे प्रशासकीय केंद्र होते.

क्षीरसागर, सुधा