युद्धजन्य धोका विमा : मुलकी वा बिनलष्करी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी उतरविलेल्या विमापत्रांत युद्धपरिस्थितीत पोहोचणाऱ्या जीवितहानीचाही धोका अंतर्भूत असतो. परंतु ज्यांची नोकरी लष्करी–म्हणजे भूसेना, वायुसेना वा नौदल यांमधील–असते, त्यांना विमापत्रे हप्त्यापोटी अधिक रक्कम भरूनच मिळू शकतात. प्रत्यक्ष युद्ध चालू असता प्रायः संबंधित शासनसंस्था प्रत्यक्ष युद्धात भाग घेणाऱ्यांसाठी खास विमायोजना आखतात.

मालमत्तेबाबत सागरी वाहतुकीच्या व आगीच्या विमापत्रांत शांततेच्या काळात हप्त्यापोटी अधिक रक्कम देऊन युद्धजन्य नुकसानीपासून संरक्षणाचे कलम अंतर्भूत करता येते. प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले म्हणजे मात्र, अशा प्रकारची जबाबदारी व्यापारी तत्त्वावर चालणाऱ्या कंपन्या घेऊ शकत नाहीत. युद्धात अपरिमित नुकसान होऊ शकते. युद्धकाळाची मर्यादा ही अनिश्चित असते. त्यामुळे या नुकसानीबाबत मोठ्या संख्यांसंबंधीचे नियम (लॉ ऑफ लार्ज नंबर्स) लागू पडत नाहीत व नुकसारीबाबत स्थूल स्वरूपाचे अंदाजही करता येत नाहीत, म्हणून किफायतशीर हप्ते घेऊन, धंदा या स्वरूपात युद्धजन्य नुकसानीबाबत विमा योजना आखणे कठीण होते. याचमुळे केवळ शासनसंस्थाच याबाबत पुढाकार घेऊ शकते, असे मानले जाते. अमेरिकेसारख्या प्रगत देशांतही दुसऱ्या महायुद्धात तेथील शासनाने ‘वॉर रिस्क्‌स कॉर्पोरेशन’ या नावाची शासकीय संस्था डिसेंबर १९४१ मध्ये स्थापन केली. भारतात शासनाने सर्व कारखानदार व उद्योगपती यांवर सक्तीची युद्ध विमा योजना लागू केली. या योजनेचे हप्ते गोळा करण्याचे काम अडत देऊन विमा कंपनीकडे सुपूर्त केले होते. तरी या योजनेची सर्व जबाबदारी शासनावरच होती. या योजनेत तिमाही हप्ता बसविण्यात आला होता आणि प्रत्यक्ष होणारी नुकसानी लक्षात घेऊन हे तिमाही हप्ते कमी-जास्त करण्याचे अधिकार शासनाने स्वतःकडे राखून ठेवले होते. पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धांतही अशा प्रकारची योजना जारी करण्यात आली होती.

सारांश, युद्धजन्य धोक्याबाबत विमा योजना ही बाब व्यापारी संस्थांच्या आवाक्याबाहेरची मानली जाते व देशाची शासनसंस्थाच अशा प्रकारच्या योजनांची कार्यवाही करू शकते. याबाबत सर्व हक्क शासनाधीन असतात.

प्रत्यक्ष युद्धजन्य धोका विमा : या योजनेच्या कार्यवाहीस एक प्रतिनिधी या नात्याने व शासनाशी सहकार्य करण्याच्या भावनेने थोडाफार हातभार विमाकंपन्या लावतात, पण याबाबतची अंतिम जबाबदारी शासनाचीच असते. दुसऱ्या महायुद्धामुळे ही तर्कप्रणालीच योग्य होय, असे आढळले आहे.

गद्रे, वि. द.