युति : पृथ्वीच्या व सूर्याच्या मध्यातून जाणारे व अयन वृत्ताशी काटकोनात असणारे प्रतल चंद्राच्या किंवा एखाद्या ग्रहाच्या कक्षेला ज्या दोन बिंदूंत छेदते त्यांना युति-प्रतियुती बिंदू म्हणतात. युति-बिंदूवर असणाऱ्या ग्रहाचे आणि सूर्याचे भोग [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] समान असून दोन्ही एकाच दिशेत दिसतात. प्रतियुतीच्या वेळी त्यांच्या भोगांमध्ये १८०० चा फरक असतो. सूर्य व चंद्र किंवा चंद्र व ग्रह आणि तारा किंवा ग्रह व तारा यांच्या युत्या आकाशात घडताना दिसतात व विशिष्ट अवस्थेत पृथ्वीला जवळ असणारी ज्योती दूरच्या ज्योतीला संपूर्णपणे किंवा काही अंशी झाकत असते.
बुध व शुक्र या अंतर्ग्रहांच्या आणि बाकीच्या बहिर्ग्रहांच्या सूर्याशी घडणाऱ्या युत्यांत थोडा फरक आहे. अंतर्ग्रहाच्या एका सूर्य-प्रदक्षिणेत सूर्याशी दोन वेळा युत्या घडतात. सूर्य आणि पृथ्वी यांमध्ये अंतर्ग्रह असताना जी युती होते तिला अंतर्युती व सूर्याहून दूर अंतरावर असताना जी युती होते, तिला बहिर्युती असे म्हणतात. अंतर्युतीच्या वेळी सूर्य व अंतर्ग्रह यांमधील दक्षिणोत्तर अंतर शून्य किंवा नगण्य असेल त्या वेळी ग्रहाचे छोटे बिंब सूर्याच्या मोठ्या तेजस्वी बिंबावरून काळ्या ठिपक्यासारखे सरकत जाताना दिसते, त्यास ग्रहाचे ⇨अधिक्रमण असे म्हणतात. बहिर्ग्रहाच्या बाबतीत अंतर्युती व अधिक्रमण या घटना होऊ शकत नाहीत. युतीच्या वेळी बहिर्ग्रह पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतरावर असतो. तर प्रतियुतीच्या वेळी पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ येतो. युतीच्या वेळी ग्रह सूर्याच्याच दिशेत व सूर्यबिंबाच्या नजीक दिसत असल्यामुळे सूर्यतेजात युतीचा आविष्कार सहज पाहता येत नाही.
दर अमावस्येला चंद्राची सूर्याशी अंतर्युती होते त्या वेळी चंद्र जर आपल्या कक्षेवरील राहू किंवा केतू या पातबिंदूनजिक असेल, तर खंडग्रास किंवा खग्रास सूर्यग्रहण होते. पौर्णिमेस प्रतियुती घडते आणि या वेळी राहू किंवा केतू यांचे स्थान चंद्राजवळ असेल, तर पृथ्वीच्या छायेत चंद्र जाऊन खग्रास किंवा खंडग्रास चंद्रगहण घडते [⟶ ग्रहण]. चंद्र मार्गावरील तारे किंवा ग्रह यांना काही वेळा चंद्र झाकतो, त्यास ⇨पिधान असे म्हणतात. तेजस्वी ताऱ्यांच्या व ग्रहांच्या पिधानांचे दृश्य फारच मनोवेधक असते.
भारतीय ज्योतिषशास्त्रातील जुन्या प्रथेनुसार युतीच्या वेळी ज्योतींमधील दक्षिणोत्तर अंतर जर १ अंशापेक्षा कमी असेल, तर त्यास ‘युद्ध’, अंतर अंशाहून अधिक असेल, तर ‘समागम’, बिंबांचा स्पर्श होत असेल, तर ‘उल्लेख’ आणि बिंबे मिसळलेली दिसली, तर ‘भेद’ अशा संज्ञा युत्यांना दिलेल्या आहेत. समान भोग असताना होणाऱ्या युतीप्रमाणेच ज्योतींचे ⇨दिगंश समान असताना किंवा ⇨विषुवांश समान असतानाही आणखी दोन प्रकारच्या युत्या होऊ शकतात.
सूर्यसापेक्ष सर्व ग्रह तीन राशी किंवा ९० अंशांहून लहान असणाऱ्या कोन विस्तारात बऱ्याच प्रसंगी येतात. त्याप्रमाणेच सूर्य चंद्रासह सर्व ग्रह जेव्हा पृथ्वीसापेक्ष लहान कोन विस्तारात येतात तेव्हा त्यास ग्रहविषयक परम किंवा विशेष युती असे म्हटले जाते.
फडके, ना. ह.