यारोस्लाव्ह्‌ल : रशियाच्या याच नावाच्या प्रांताची (ओब्लास्ट) राजधानी. लोकसंख्या ६,१९,००० (१९८३ अंदाज). ते व्होल्गा नदीवर वसले आहे. यरस्लाफ द वाइझ या कीव्हच्या ग्रँड ड्यूकने ते १०१० मध्ये वसविले, असे मानले जाते तथापि प्राचीनतम लिखित पुरावा मात्र १०७१ सालापासूनचा मिळतो. व्होल्गा नदीवरील व्यापारी मार्गावर असल्याने या शहराचा सतत विकास होत गेला. १२३८ मध्ये तार्तारांनी ते उद्ध्वस्त केले. १३३२ व १३७१ मध्ये अनुक्रमे पहिला आयव्हॅन कल्यिटा आणि नॉव्हगरॉड यांनी ते लुटले होते पण या सर्वच आपत्तींतून शहराचे झपाट्याने पुनरुज्जीवन झाले. शहराच्या आधुनिक औद्योगिकीकरणास १७२२ मध्ये उभारण्यात आलेल्या कारखान्यापासून आरंभ झाला. विद्यमान रशियातील कापड उद्योगाचे, विशेषतः लिनन कापडाचे, हे मोठे केंद्र आहे. त्याखेरीज तेलशुद्धीकरण, अभियांत्रिकी, कृत्रिम रबर, टायर, यंत्रे इ. उद्योगधंदे येथे विकसित झाले आहेत.

शहरात काही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू आहेत. उदा., तेराव्या शतकातील चर्च ऑफ द ट्रान्सफिगरेशन, तसेच कॅथीड्रल ऑफ द ॲसम्प्शन, सेंट जॉन द बाप्टिस्ट आणि निकोला नादेन ह्या सतराव्या शतकातील चर्चवास्तू उल्लेखनीय आहेत. शहरातील जुने रंगमंदिर (स्था. १७५०) प्रसिद्ध आहे.

जाधव, रा. ग.