यालू : चीन व उत्तर कोरिया यांच्या सरहद्दीवरून ईशान्य-नैर्ऋत्य दिशेने वाहणारी नदी. लांबी ८०० किमी. जलवाहन क्षेत्र सु. ६२,८०५ चौ. किमी. चीनमध्ये यालू व कोरियात आमनोक कांग या नावांनी ओळखली जाणारी ही नदी या दोन्ही देशांच्या सरहद्दीजवळ चांगपाई पर्वतरांगेत उगम पावते व नैर्ऋत्य दिशेने वाहत जाऊन कोरियन उपसागराला (पीत समुद्र) मिळते. वीजनिर्मिती, वाहतूक व काही प्रमाणात खनिज उत्पादन या दृष्टींनी या नदीला आर्थिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच देशांच्या सरहद्दीवरून वाहत असल्याने राजकीय क्षेत्रातही ती आंतरराष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाची ठरली आहे. १८९४ मधील चीन–जपान युद्धात, १९०४ मधील रशिया–जपान युद्धात व १९५० मधील संयुक्त राष्ट्रांचे सैन्य व चीन यांच्या युद्धात या नदीचे खोरे रणभूमी बनले होते.

वरच्या टप्प्यातील नदीकाठावरील जंगलांतून मिळणारे लाकूड वाहून नेण्याच्या दृष्टीने या नदीचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेतला जातो. वर्षातील ६ ते ७ महिने या नदीतून लहान बोटी सहजपणे वाहतूक करू शकतात. याशिवाय मोठ्या बोटी नदीमुखातून आत सु. २४ किमी.पर्यंत येऊ शकतात. नदीखोऱ्यातील जंगलउत्पादनांमुळे नदीकाठावरील आन्‌डुंग (चीन) व शिनईजू, चांगसाँग (कोरिया) ही शहरे लाकूड उद्योगासाठी प्रसिद्ध झाली आहेत. वीजनिर्मितीच्या दृष्टीनेही ही नदी महत्त्वाची असून तिची संभाव्य वीजनिर्मितीक्षमता १५ लक्ष किवॉ. आहे. या दृष्टीने सूपुंग धरण महत्त्वाचे असून तेथील केंद्रात ७ लक्ष किवॉ. वीजनिर्मिती होते. तिचा पुरवठा प्रामुख्याने मँचुरिया (चीन) व उत्तर कोरियातील औद्योगिक क्षेत्रांना केला जातो. नदीच्या वरच्या भागातून वाहून येणाऱ्या गाळामध्ये सोन्याचा अंशही बऱ्याच प्रमाणात आढळतो. याशिवाय खोऱ्यात लोह व कोळसा यांच्याही खाणी आहेत.

आन्‌डुंग हे नदीमुखावरील सर्वांत महत्त्वाचे शहर व बंदर असून ते यालू नदीवरील ९०० किमी. लांबीच्या पुलाने कोरियाशी जोडलेले आहे.

क्षीरसागर, सुधा चौंडे, मा. ल.