यांत्रिक शेती :  मानव व चतुष्पाद प्राणी यांच्या शारीरिक शक्तीऐवजी वारा, पाणी, वाफ, वीज, तेलादी इंधने यांचा उपयोग करून गती साध्य करून घेणे किंवा खरे म्हणजे गतीचा वेग वाढविणे, हे यंत्राचे मुख्य कार्य. शेतीच्या जुन्याच अवजारांत तांत्रिक सुधारणा करून त्यांची कार्यक्षमता वा त्यांच्या कामाचा वेग वाढविणे शक्य असते, पण वरील व्याख्येच्या अनुरोधाने त्यांना यंत्र न म्हणता अवजारच म्हणावे हे युक्त. वारा आणि पाणी या निसर्गशक्तींचा उपयोग फार जुन्या काळापासून केला जात आहे. पण उत्पादनव्यवहारात त्यामुळे काही क्रांतिकारक परिवर्तन घडून आले नाही. असे परिवर्तन औद्योगिक क्षेत्रात अठराव्या शतकापासून व शेती उत्पादनाच्या क्षेत्रात एकोणिसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकापासून होऊ लागले. शेतीतील यांत्रिकीकरणाचा प्रारंभ प्रथम इंग्लंडमध्ये व त्यानंतर पश्चिम यूरोपातील देशांत झाला. पण अलीकडच्या काळात, विशेषतः पहिल्या महायुद्धानंतर, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांना शेतीच्या यांत्रिकीकरणाबाबत पहिला दर्जा प्राप्त झाला आहे. आज अमेरिका, कॅनडा, रशिया व ऑस्ट्रेलिया हे यांत्रिक शेतीबाबत अग्रगण्य देश समजले जातात. स्वयंचालनाने युगही प्रगत देशांतील शेतीत सुरू झाले आहे.

 

या यांत्रिकीकरणात मुख्य भाग ‘ट्रॅक्टर’चा आहे. ट्रॅक्टर हे भुसभुशीत, रेताड, चिकण इ. वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनींच्या विषम पृष्ठभागावरून शेतीची अनेक प्रकारची अवजारे, मालवाहू गाड्या ओढून नेणारे यंत्र आहे. यामुळे शेतीची बहुतेक प्रकारची कामे होतात. [⟶ ट्रॅक्टर].

 

अविकसितदेशांतील शेतीत काही तुरळक क्षेत्रांत यांत्रिकीकरणाचा शिरकाव झालेला आहे.पण या देशांच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने विचार केला, तर शेतीच्या यांत्रिकीकरणाला सध्याच्या परिस्थितीत फारसा वाव देणे इष्ट नाही, असे सर्वमान्य मत आहे. याचे मुख्य कारण असे की, यंत्राच्या वापराने अगोदरच मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असलेल्या बेकारीत फार मोठी भर पडेल. याशिवाय, शेतीचे लहान आकारमान, ही यंत्रे, त्यांचे सुटे भाग व त्यांचे इंधन यांसाठी लागणाऱ्या परदेशी चलनाची टंचाई, तंत्रज्ञांचा अभाव या अडचणी आहेतच.

 

भारतातील शेतीचा प्रश्न दरमाणशी उत्पादनशक्ती वाढविण्याचा नसून दरहेक्टरी उत्पादनशक्ती वाढविण्याचा आहे. यंत्रामुळे तेवढ्याच कामाला कमी माणसे लागतात व दरमाणशी उत्पादन वाढते पण दरहेक्टरी उत्पादनात फार महत्त्वाचा फरक पडत नाही. पण असे असले, तरी भारतासारख्या अविकसित देशांतही शेतीच्या यांत्रिकीकरणाला काहीसा वाव आहे.

 

(१) नवी जमीन लागवडीसाठी आणताना जंगले किंवा गवत साफ करणे,जमीन फोडून काढणे,सारखी करणे,यांसाठीट्रॅक्टर व बुलडोझर यांचा उपयोग इष्ट आहे. भारतात गेल्या पंधरावीस वर्षांतकेंद्रीय व राज्य ट्रॅक्टरसंघांनी लक्षावधी हेक्टर जमीन अशा रीतीनेकसणुकीत आणली आहे.

 

(२) ज्या यंत्रांमुळे शेत-जनावरांच्या शक्तीची बचत करता येते ती यंत्रे (उदा.,पाण्याचे पंप) वापरणे इष्ट आहे. शेतीतील जनावरांची संख्या कमी होणे अनेक दृष्टींनी फायद्याचे ठरेल.

 

(३) मानवी श्रमशक्तीची भारतासारख्या देशात अतिरिक्तता आहे हे म्हणणे सर्वसाधारणपणे खरे असले,तरीदेशाच्या काही भागांतून काही विशेष कामाच्या वेळी मजुरांचा पुरवठा पुरेसाहोत नाही. अशा स्थितीत वेळच्या वेळी कामे उरकण्यासाठी यंत्रांची मदत घेतायेईल.

 

अविकसित देशांत उत्पादक घटकाचे क्षेत्रमान लहान असल्यामुळे यांत्रिक शेती किफायतशीर होणे कठीण आहे. अलीकडच्या काळात लहान शेतीवरही ज्यांचा किफायतशीर उपयोग करून घेता येईल अशा ट्रॅक्टरादी यंत्रांची निर्मिती झालेली आहे व जपान, तैवान इ. देशांतून त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापरही सुरू झाला आहे. पण एकूण अविकसित देशाच्या निरनिराळ्या प्रदेशांतील हवामान, भूरचना, पिके, कसणुकीच्या पद्धती यांना योग्य अशा यंत्रांची निर्मिती करण्याकडे यंत्रोत्पादकांचे फारसे लक्ष गेलेले नाही.

 

भारतात लहान आकाराची शेते, जलसिंचित जमिनीचे एकंदर लागवडीखाली असलेल्या क्षेत्राशी अल्प प्रमाण यांमुळे यंत्रसज्ज शेतीचेही प्रमाण अल्पच आहे. यांत्रिकीकरणात डीझेलवर वा विजेवर चालणारे पंप अशा जलसिंचनास उपयुक्त यंत्रावर विशेष भर दिला जातो. शेतीचे यांत्रिकीकरण सुकर करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने बुदनी व हिस्सार येथील आपल्या संस्थांद्वारे निरनिराळ्या यंत्रांची कार्यक्षमता व टिकाऊपणा यांची परीक्षा करणे तसेच कर्मचारीवर्गाला शेतीची यंत्रे चालविणे, त्यांची देखभाल करणे व यांत्रिक शेती व्यवस्थापन यांसंबंधांत प्रशिक्षण देणे हे कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्याचप्रमाणे या विषयात संशोधन व विकास करण्याचे कार्य कृषी विद्यापीठे करतात. काही ठिकाणी रशियन सरकारच्या मदतीने प्रयोगादाखल म्हणून सरकारी यंत्रसज्ज शेतीही सुरू केली आहे.

                भारतात शेती-यंत्रांचा वापर कसा वाढत जात आहे, हे पुढील आकडेवारीवरून दिसून येईल.

वर्ष               डीझेल               पंप संच वीज           यंत्रशक्तीवर चालणारे ऊसचरक         ४ चाकी ट्रॅक्टर

                     ०००                        ०००                                           ००                                          ००

१९५१            ८३                           २६                                          २१३                                         ८६

 १९५६         १२३                           ४७                                          २३३                                       २१०

 १९६१         २३०                          १६०                                         ३३३                                        ३१०

 १९६६         ४७१                          ४१५                                         ४५१                                       ५४०

 १९७२      १,५४६                      १,६१८                                          ८७२                                  १,४८२

१९७७       २,३५९                      २,४३८                                      १,०८९                                  २,७५९

देशात १९८२ मध्ये ट्रॅक्टरांची संख्या ८४,३२० व विजेवर चालणाऱ्या पंपांची संख्या ३,३७,००० होती. भारतात केंद्र सरकार व राज्य सरकारे यांच्या सहकार्याने खालील १४ ठिकाणी यांत्रिक शेतीप्रकल्प कार्यान्वित आहेत : (१) खम्मम (आंध्र प्रदेश राज्य) (२) कोकिलाबूत (आसाम राज्य) (३) हिस्सार (हरयाणा राज्य) (४) रायचूर (कर्नाटक राज्य) (५) आरालम (केरळ राज्य) (६) लोकिचेरा, (७) लुशिआचेरा (मिझोराम राज्य) (८) झारसुगडा (ओरिसा राज्य) (९) लोधोवाल (पंजाब राज्य) (१०) सुरतगढ (११) जेतसर (राजस्थान राज्य) (१२) चेंगम (तमिळनाडू राज्य) (१३) बहरीच व (१४) रायबरेली (उत्तर प्रदेश राज्य).

 

वरील सर्व शेतांमधील लागवडीखाली आणलेली एकूण जमीन सु. ३५,००० हेक्टर आहे. या शेतीप्रकल्पांद्वारे स्थानिक शेतकऱ्यांना सुधारित बी-बियाणे उपलब्ध करून दिले जाते, त्याचप्रमाणे त्यांच्या जमिनीचे सपाटीकरण, जमिनीचे पुन:प्रापण, पिकांची कापणी करणे इ. कामांची व्यापारी तत्त्वांवर परिपूर्ती केली जाते.

 

संदर्भ : 1. Gadkary, D. A. Mechanical Cultivation in India.

            2. Government of India, Statistical Abstract, New Delhi, 1982.

 

देशपांडे, स. ह.