यांग, चेन निंग : (२२ सप्टेंबर १९२२– ). चिनी-अमेरिकन भौतिकीविज्ञ. बीटा क्षयासारख्या [⟶ किरणोत्सर्ग] दुर्बल अणुकेंद्रीय परस्परक्रियांच्या बाबतीत समता अक्षय्यता तत्त्वाच्या [⟶ समता] होणाऱ्या उल्लंघनाच्या शोधाबद्दल यांग व त्यांचे सहकारी ⇨त्सुंग डाओ ली यांना १९५७ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.

यांग यांचा जन्म चीनमधील हफे येथे झाला. कुन्‌मिंग येथील नॅशनल साऊथवेस्ट ॲसोशिएटेड विद्यापीठाची बी.एस्‌सी. (१९४२) व चिंगयुआन विद्यापीठाची एम्‌.एस्‌सी. (१९४४) या पदव्या त्यांनी संपादन केल्या. त्यानंतर चिंगयुआन विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून ते १९४६ मध्ये अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात गेले. तेथे एन्‍रीको फेर्मी व एडवर्ड टेलर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून त्यांनी १९४८ मध्ये पीएच्‌.डी. पदवी मिळविली. १९४९ मध्ये प्रिन्स्टन येथील इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्सड स्टडी या संस्थेत त्यांनी संशोधनास प्रारंभ केला व तेथेच १९५५ मध्ये त्यांची प्राध्यापकपदावर नेमणूक झाली. १९६५ मध्ये न्यूयॉर्क स्टेट विद्यापीठात ते प्राध्यापक झाले.

यांग यांनी प्रामुख्याने सांख्यिकीय यामिकी [⟶ सांख्यिकीय भौतिकी] व ⇨सममिती नियम या विषयांत संशोधन केलेले आहे. १९५६ मध्ये यांग व ली यांनी बीटा क्षयासारख्या दुर्बल अणुकेंद्रीय परस्परक्रियांच्या बाबतीत समता अक्षय्यता तत्त्वाचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे, असे सैद्धांतिक रीत्या भाकीत केले. हे तत्त्व सु. ३० वर्षे आधारभूत मानण्यात येत होते. या भाकिताची चाचणी घेण्यासाठी व त्याला पुष्टी देण्यासाठी करावयाचे प्रयोगही त्यांनी सुचविले. नॅशनल ब्युरो ऑफ स्टँडर्ड्‌स येथील सी. एस्‌. वू व त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि कोलंबिया विद्यापीठ व शिकागो विद्यापीठ येथील इतर शास्त्रज्ञांनी असे प्रयोग करून या भाकिताची सत्यता प्रस्थापित केली. या त्यांच्या शोधामुळे आणवीय आणि मूलकण भौतिकीच्या मूलभूत सिद्धांतांत आमुलाग्र बदल झाले [⟶ मूलकण]. या संशोधनांखेरीज यांग यांनी आर्‌. एल्‌. मिल्स यांच्या समवेत मूलकण व क्षेत्रे यांकरिता मूलभूत परस्परक्रियांचे गणितीय वर्णन करणारा क्रमनिरपेक्ष (आबेलीय) नसलेला गेज सिद्धांत [⟶ पुंज क्षेत्र सिद्धांत] मांडला. हा सिद्धांत ‘यांग-मिल्स सिद्धांत’ या नावाने ओळखला जातो.

नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना ॲल्बर्ट आइन्स्टाइन पुरस्कार (१९५७), प्रिन्स्टन विद्यापीठाची सन्माननीय डॉक्टरेट (१९५८) इ. सन्मान मिळाले. अमेरिकन फिजिकल सोसायटी, नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस वगैरे वैज्ञानिक संस्थांचे ते सदस्य आहेत.

भदे, व. ग.