यशोवर्मन : (इ. स. सु. सातवे शतक). कनौजचा सुप्रसिद्ध प्राचीन राजा. इ. स. सातव्या शतकाच्या पूर्वार्धात तो होऊन गेला असावा. याच्या पूर्वजांविषयी काही माहिती नाही. पण याच्याविषयी बरीच माहिती याच्या दरबारचा कवी वाक्‌पतिराज याच्या गउडवहो (गौडवध) या प्राकृत काव्यावरून तसेच राजतरंगिणी व काही जैन ग्रंथ यांवरून मिळते. गौडवध काव्यात याचा दिग्विजय वर्णिला आहे. त्यातील कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या उल्लेखावरून तो इ. स. ७३३ मध्ये झाला असावा. त्याने मगध, वंग, दक्षिण भारतातील अनेक देश, पारसीक, कोकण, मारवाड, हिमालयाचा परिसर इ. जिंकल्याचे गौडवधा वर्णन आहे पण ते बरेचसे काल्पनिक आहे. तथापि त्याने मगध जिंकून तेथे आपल्या नावे यशोवर्मपुर स्थापल्याचा उल्लेख कोरीव लेखात येतो. पुढे काश्मीरच्या ललितादित्य-मुक्तापीड राजाने त्याचा पराभव करून त्याला आपला भाट बनविल्याचे कल्हणाने राजतरंगिणीत वर्णिले आहे.

यशोवर्मन अथवा यशोवर्मा हा स्वत: उत्कृष्ट कवी असून त्याचा भवभूति, वाक्‌पतिराज यांसारख्या संस्कृत-प्राकृत कवींना उदार आश्रय होता. त्याने स्वत: रामाभ्युदय नामक उत्कृष्ट संस्कृत नाटक रचले होते, ते आता उपलब्ध नाही पण त्यातील काही उतारे अलंकारग्रंथात घेतले आहेत.

संदर्भ : मिराशी, वा. वि. भवभूति, नागपूर, १९६८.

देशपांडे, सु. र.