यदुमणि महापात्र : (सु. १७८१–१८६५). ख्यातनाम ओडिया कवी. यदुमणी हे एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात प्रसिद्धीला आले असले, तरी त्यांची जन्मतिथी निश्चितपणे ज्ञात नाही. अठराव्या शतकाच्या अखेरीस (१७८१ च्या सुमारास) ओरिसातील नयागढ संस्थानात ईटमती नावाच्या खेड्यात सुतार जातीच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ह्या गावी आजही त्यांचे वंशज राहतात. यदुमणींचे वडील हे लाकडावर नक्षीकाम करणारे तसेच चित्रकारही होते आणि आठघर येथील अधिपतीच्या राजधानीत त्यांचे वास्तव्य होते. यदुमणींना काव्य व चित्रकलेची आवड होती. निरनिराळ्या राजदरबारांत त्यांचा वावर होता व आपल्या शीघ्र कवित्वाने ते दरबारी लोकांचे मनोरंजन करत त्यांच्या काव्यातील विनोद व उपहास ह्या दोन गुणांमुळे त्यांची कीर्ती ओरिसात दूरवर पसरली. त्यांनी दोन आलंकारिक काव्ये वा ‘प्रबंध’ रचले असून त्यांची नावे राघव-विलास आणि प्रबंध पूर्णचंद्र अशी आहेत. यांतील राघव-विलास ह्या काव्याचा फक्त काही भागच उपलब्ध झाला आहे. प्रबंध पूर्णचंद्र हे त्यांचे प्रदीर्घ काव्य शैली, शब्दकळा, अलंकार योजना इ. दृष्टींनी उत्कृष्ट असून ते अत्यंत लोकप्रियही आहे. या काव्यात कृष्ण आणि रुक्मिणी यांच्या विवाहाची कथा मोठ्या कल्पकतेने वर्णिलेली आहे. ओरिसातील ‘पालवाले’ ह्या नावाच्या भाट कवींनी इतर प्रख्यात प्राचीन काव्यांप्रमाणेच हे काव्य गावोगाव फिरून व गाऊन दाखवून अतिशय लोकप्रिय केले आहे. यदुमणींना ह्या काव्यामुळे ओरिसात आदराचे स्थान प्राप्त झाले आहे. अठराव्या शतकातील महाकवी ⇨उपेंद्र भंज यांच्या उत्कृष्ट काव्यांशी यदुमणींच्या काव्याची नेहमी तुलना केली जाते.

उत्तर भारतात बीरबलाची जी प्रसिद्धी व स्थान आहे तशीच प्रसिद्धी व स्थान ओरिसात यदुमणींचे आहे. अतिशय विनोदी व तैलबुद्धीचे म्हणून ते प्रख्यात आहेत. त्यांच्या चतुरोक्ती व विनोद ओरिसात प्रसंगपरत्वे वारंवार निर्देशिले जातात. यदुमणी रहस्य ह्या नावाने त्यांच्या चतुरोक्ती व विनोद संगृहीत आहेत. ओरिसाच्या ग्रामीण भागात ह्या संकलनाचा सतत व प्रचंड प्रमाणावर खप होतो.

संस्कृत व ओडिया ह्या भाषांवर उत्तम प्रभुत्व, चातुर्य, पांडित्य, कवित्व, विनोद इ. गुणांमुळे ओरिसातील अनेक राजदरबारांत यदुमणींना आदराचे व मानाचे स्थान होते.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) शिरोडकर, द. स. (म.)