यंग, टॉमस : (१३ जून १७७३ – १० मे १८२९). इंग्लिश भौतिकीविज्ञ. प्रकाशाचा तरंग सिद्धांत [⟶ प्रकाश] प्रस्थापित करण्यासाठी व डोळ्याच्या शरीरक्रियाविज्ञानविषयी त्यांनी महत्त्वाचे कार्य केले.
यंग यांचा जन्म मिलव्हर्टन येथे झाला. वयाच्या एकोणिसाव्या वर्षापर्यंत त्यांनी निसर्गविज्ञानाचा आणि लॅटिन, ग्रीक, फ्रेंच, इटालियन, हिब्रू , अरेबिक, पर्शियन, खाल्डियन इ. भाषांचा जवळजवळ स्वप्रयत्नांनीच अभ्यास केला. १७९२– १८०३ या काळात त्यांनी लंडन, एडिंबरो, गटिंगेन व केंब्रिज येथे वैद्यकीय शिक्षण घेतले. गटिंगेन विद्यापीठाची एम्.डी. (१७९६) आणि केंब्रिज विद्यापीठाच्या एम्.बी. (१८०३) व एम्.डी. (१८०८) या पदव्या त्यांनी संपादन केल्या. १८०० साली त्यांना बरीच मोठी संपत्ती वारसाहक्काने मिळाली व लंडन येथे त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला पण तो फारसा चालला नाही. १८०१ मध्ये रॉयल इन्स्टिट्यूशनमध्ये निसर्गविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली परंतु त्यांची व्याख्याने लोकप्रिय न झाल्याने १८०३ मध्ये त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय व्यवसायास पुन्हा प्रारंभ केला आणि मृत्यूपावेतो विज्ञानाशी संबंधित अशा विविध पदांवर (वजने व मापे यांकरिता नेमलेल्या रॉयल कमिशनचे सचिव, रेखांश-निश्चिती मंडळाचे सचिव, नॉटिकल अलमॅनॅकचे अधीक्षक वगैरे) काम केले.
यंग यांनी प्रारंभी डोळ्याच्या शरीरक्रियाविज्ञानाविषयी कार्य केले. निरनिराळ्या अंतरांवरील वस्तूंपासून येणाऱ्या प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण डोळ्यातील भिंगाचा आकार लोमश स्नायूंच्या द्वारे बदलून कसे होते याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले [नेत्र-अनुकूलन ⟶ डोळा]. १८०१ मध्ये त्यांनी दृष्टिवैषम्य [प्रकाशकिरणांचे जालपटलावर स्पष्ट रेखीव केंद्रीकरण न होणे ⟶ चष्मा] या दोषाचे व डोळ्याला होणाऱ्या रंगांच्या संवेदनेचे पहिले स्पष्टीकरण दिले. तांबडा, हिरवा व निळा या तीन मूलभूत रंगांची अनुक्रिया होणाऱ्या तीन प्रकारच्या तंत्रिका कोशिका (मज्जा पेशी) जालपटलात असतात व त्यांमुळे रंगांचे ज्ञान होते, असा सिद्धांत त्यांनी मांडला. हा सिद्धांत पुढे हेर्मान हेल्महोल्ट्स यांनी विकसित केला व तो आता यंग-हेल्महोल्ट्स सिद्धांत म्हणून ओळखला जातो.
यंग यांनी १८०० – ०४ या काळात प्रकाशाचा तरंग सिद्धांत प्रस्थापित करण्यास मोठी मदत केली. त्यांनी न्यूटन व क्रिस्तीआन हायगेन्झ यांच्या प्रकाशाच्या स्वरूपासंबंधीच्या कल्पनांची तुलना केली आणि एकाच वेळी होणारे परावर्तन व प्रणमन (प्रकाशकिरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना त्याच्या दिशेत होणारा बदल) यांसारख्या आविष्कारांचे विशदीकरण करण्यास न्यूटन यांचा कण सिद्धांत कसा अपुरा आहे, हे दाखविले. यंग यांनी प्रकाशाच्या व्यतिकरणाची कल्पना मांडली [⟶ प्रकाशकी] व ती तरंगांच्या अध्यारोपणाच्या तत्त्वाने स्पष्ट करून सांगितली. व्यतिकरण पट्टांच्या निर्मितीसाठी त्यांनी केलेला प्रयोग व त्यासाठी वापरलेले साधन (यंग फट-युग्म) सुप्रसिद्ध आहेत. तरंगांच्या अध्यारोपणाच्या तत्त्वाच्या साहाय्याने त्यांनी न्यूटन वर्तुळे [⟶ प्रकाशकी], अधिसंख्य इंद्रधनुष्यांचे रंग [⟶ इंद्रधनुष्य] यांसारख्या आविष्कारांचे स्पष्टीकरण केले. यंग यांच्या या कल्पनांना इंग्लंडमध्ये फार तीव्र विरोध झाला. ⇨ स्थितिस्थापकता व ⇨कैशिकता यांसंबंधीही त्यांनी महत्त्वाचे कार्य केले असून हुक नियमातील स्थिरांकाचा यंग यांनी भौतिकीय अर्थ विशद केला म्हणून या स्थिरांकाला ‘यंग स्थितिस्थापकता गुणांक’ म्हणतात.
यंग यांनी आपल्या भाषाभ्यासाचा उपयोग करून प्राचीन ईजिप्तच्या हायरोग्लिफिक लिपीतील कोरीव लेखांचा अन्वयार्थ लावण्यासंबंधी मूलभूत महत्त्वाचे कार्य केले. १७९४ मध्ये त्यांची रॉयल सोसायटीच्या सदस्यत्वावर निवड झाली व १८०४ ते मृत्यूपावेतो ते सोसायटीचे परराष्ट्रीय सचिव होते. त्यांनी विविध वैज्ञानिक विषयांवर निरनिराळ्या नियतकालिकांत लेखन केले. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या पुरवणीमध्ये त्यांनी साठाहून अधिक नोंदी लिहिल्या. ते लंडन येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.