म्हात्रे, गणपतराव : (१८७९–१९४७). आधुनिक काळातील प्रसिद्ध महाराष्ट्रीय शिल्पकार. पुणे येथे जन्म. त्यांचे वडीलबंधू वास्तुशिल्पी असून त्यांच्यामुळे गणपतरावांना अगदी लहान वयातच मूर्ती करण्याची आवड निर्माण झाली. वयाच्या केवळ बाराव्या वर्षी ते देवादिकांच्या मूर्ती व व्यक्तिशिल्पेही घडवू लागले. रेखन व शिल्पांकन या दोन्ही कलांत त्यांनी अल्पवयातच प्रावीण्य मिळवले. त्यांचे प्रारंभीचे शिक्षण पुण्यात झाले. पुढे त्यांच्या कुटुंबियांचे मुंबईत स्थलांतर झाल्याने त्यांनी पुढील शिक्षणासाठी मुंबईच्या शाळेत प्रवेश घेतला. परंतु कलेच्या ओढाने इंग्रजी पाचव्या इयत्तेनंतर शाळेस रामराम ठोकून त्यांनी मुंबईच्या ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ या कलाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळचे जे. जे. चे प्रिन्सिपॉल ग्रिफिथ यांनी त्यांचे कलेतील कसब पाहून त्यांना एकदम वरच्या (म्हणजे इंटरमीजिएटच्या) वर्गात प्रवेश दिला, असे म्हटले जाते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गणपतराव प्रतिमानकृतीचे (मॉडेलिंग) धडे घेऊ लागले. विद्यार्थिदशेत कलाशाळेच्या प्रदर्शनांत व परीक्षांत त्यांनी अनेक बक्षिसे मिळवली. त्यांची गाजलेली मंदिरपथगामिनी (वा मंदिराच्या वाटेवर पहा: मराठी विश्वकोश : खंड १० पृ. ६८५) ही शिल्पाकृतीही त्यांनी विद्यार्थिदशेतच घडविली (सु. १८९५). ‘बाँबे आर्ट सोसायटी ’ च्या १८९६ च्या वार्षिक प्रदर्शनात या शिल्पाला सर्वोत्कृष्ट शिल्पासाठी ठेवलेले रौप्यपदक लाभले, तसेच भावनगरच्या महाराजांनी ठेवलेले रौप्यपदक लाभले, तसेच भावनगरच्या महाराजांनी ठेवलेले रोख रकमेचे पारितोषिकही मिळाले. अनेक समीक्षकांनी या शिल्पाची मुक्तकंठाने स्तुती केली. ग्रिफिथ व ग्रीनवुड या कलाशिक्षकांनी तर या शिल्पाकृतीच्या सौंदर्याची महती वर्णन करणारे लेख छायाचित्रांसह त्यावेळच्या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध केले. मंदिराकडे जाणाऱ्या या स्त्रीच्या शिल्पाकृतीचा पेहराव व ढब अस्सल भारतीय असून, ब्रिटिश शिल्पशैलीच्या प्रभावापासून ती मुक्त आहे. तिने परिधान केलेल्या नऊवारी साडीच्या सुरेख चुण्यांमधून तिच्या बांध्याचे सौष्ठव व्यक्त होते. तिची केशरचना, एका पायावर भार देऊन किंचित टाच उचलून दुमडलेला दुसरा पाय व त्यातून व्यक्त होत असलेला मंदिराकडे जाण्याचा आविर्भाव हे अत्यंत लालित्यपूर्ण आहेत. शिवाय तिचे कोमल हात, बोटे, रेखीव चेहरा आणि नाजुक पाऊल ह्यांचे शिल्पांकन मोठ्या कौशल्याने केले आहे. ही सुंदर शिल्पाकृती आज सर जे. जे. स्कूलच्या कलासंग्रहात आढळते. जे. जे. स्कूलमधील शिक्षणक्रम पूर्ण केल्यावर त्यांनी काही काळ प्रिन्सीपॉल ग्रीनवुड यांच्या आग्रहामुळे जे. जे. मध्ये शिक्षकाची नोकरी केली (१९२७–२९). नंतर लवकरच त्यांनी गिरगावात प्रा. गज्जर यांच्या प्रयोगशाळेच्या इमारतीत स्टुडिओ स्थापन करून स्वतंत्र व्यवसायास सुरुवात केली. त्यांनी अनेक व्यक्तिशिल्पे, तसेच इतर शिल्पाकृतीही घडविल्या. इतर शिल्पांपैकी विशेष उल्लेखनीय म्हणजे १९०० साली पॅरिसमध्ये भरलेल्या प्रदर्शनात त्यांनी पाठविलेली संगमरवरी वीणावादिनी सरस्वती. अन्य शिल्पांत शबरीच्या वेशातील पार्वती, अहमदाबाद येथील व्हिक्टेरिया राणीच्या स्मारकासाठी केलेले राणीचे संगमरवरी व्यक्तिशिल्प, म्हैसूरचे राजे चामराजेंद्र वाडियार यांचा म्हैसूरला असलेला पुतळा, पनवेलचा स्वामी रघुनाथ महाराजांचा पुतळा व बडोद्यातील अश्वारूढ शिवाजी यांचा उल्लेख करता येईल. वीणावादिनी सरस्वती व शबरी या दोन्ही शिल्पाकृती सांगलीच्या कलासंग्रहालयात पहावयास मिळतात. त्यांनी शिल्पनिर्मितीमध्ये अनेक माध्यमे हाताळली असली, तरी संगमरवरी माध्यमातील त्यांची शिल्पे, त्या माध्यमाच्या सर्वोत्कृष्ट हाताळणीची द्योतक आहेत. आधुनिक भारतीय शिल्पकलेच्या इतिहासात त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. शिल्पकलेची पश्चिमी वास्तववादी घाटणी आत्मसात करून तिचा स्वतःच्या खास व्यक्तिविशिष्ट शैलीत आविष्कार घडवणारे ते आद्य आधुनिक शिल्पकार होत. त्यांच्या शिल्पाकृतींपासून नंतरच्या अनेक शिल्पकारांनी स्फूर्ती घेतली. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
भागवत, नलिनी
“