म्यूलिकेन, रॉबर्ट सँडर्सन : (७ जून १८९६– ). अमेरिकेन भौतिकविज्ञ व रसायनशास्त्र. रेणवीय परिकक्ष [→ पुंज रसायनशास्त्र] पद्धतीचा उपयोग करून त्यांनी रासायनिक बंध व रेणूंची इलेक्ट्रॉनीय संरचना यांबाबत केलेल्या मूलभूत कार्याबद्दल त्यांना १९६६ च्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.
म्यूलिकेन यांचा जन्म न्यूबरीपोर्ट, मॅसॅचूसेटस् येथे झाला. त्यांनी १९१७ मध्ये मॅसॅचूसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून बी. एस. आणि १९२१ मध्ये शिकागो विद्यापीठातून पीएच्. डी या पदव्या संपादन केल्या. १९२१–२५ या काळात ते शिकागो विद्यापीठात व हार्व्हर्ड विद्यापीठात नॅशनल रिचर्स कौन्सिलचे फेलो होते. त्यानंतर न्यूयॉर्क विद्यापीठाच्या वॉशिंग्टन स्क्वेअर कॉलेजमध्ये भौतिकीचे साहाय्यक प्राध्यापक (१९२६–२८), शिकागो विद्यापीठात भौतिकीचे सहयोगी प्राध्यापक (१९२८–३१) आणि प्राध्यापक (१९३१–६१) या पदांवर त्यांनी काम केले. याखेरीज त्यांनी शिकागो विद्यीपीठात अर्नेस्ट डेविट बर्टन विशेष सेवा प्राध्यापक (१९५६–६१) आणि भौतिकी व रसायनशास्त्राचे विशेष सेवा प्राध्यापक (१९६१ पासून) तसेच फ्लॉरिडा राज्य विद्यीपीठात रासायनिक भौतिकीचे विशेष संशोधन प्राध्यापक (१९६१–७१) म्हणून त्यांनी काम केले. दुसऱ्या महायुद्धकाळात त्यांनी शिकागो विद्यापीठात प्लुटोनियम प्रकल्पात ‘संपादन कार्य व माहिती’ विभागाचे संचालक म्हणून काम केले.
म्यूलिकेन यांनी १९२२ मध्ये समस्थानिकांच्या [अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रॉट्रॉनांची संख्या) तोच पण द्रव्यमानांक (अणुकेंद्रातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकूण संख्या) भिन्न असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांच्या] विलगीकरणाकरिता बाष्पीभवनी केंद्रोत्सारणाची [→ केंद्रोत्सारण] पद्धत सुचविली. त्यानंतर त्यांनी केलेले संशोधन बहुतांशी रेणवीय वर्णपटांचे [→ वर्णपटविज्ञान] स्पष्टीकरण आणि रेणूंच्या इलेक्ट्रॉनीय अवस्थांच्या बाबतीत ⇨ पुंज सिद्धांताचा उपयोग यांविषयी होते. फ्रेडरिक हुंड यांच्या समवेत त्यांनी रासायनिक बंधांविषयीचा रेणवीय परिकक्ष सिद्धांत विकसित केला. रेणूतील इलेक्ट्रॉन त्यातील सर्व अणुकेंद्रांनी निर्माण केलेल्या क्षेत्रात हालचाल करीत असतात, या संकल्पनेवर हा सिद्धांत आधारलेला आहे. विलगित अणूंचे आणवीय परिकक्ष रेणूतील दोन वा अधिक अणूंवर विस्तार पावून रेणवीय परिकक्ष बनतात. या परिकक्षांच्या सापेक्ष ऊर्जा रेणूच्या वर्णपटांवरून मिळविता येतात, असे म्यूलिकेन यांनी दाखविले. रेणवीय परिकक्ष निर्धारित करण्यासाठी त्यांनी आणवीय परिकक्षांचा रैखिक संयोग करण्याची पद्धत अवलंबिली. रासायनिक बंधांची ऊर्जा आणवीय परिकक्षांच्या परस्परव्याप्ती इतकी असते, असे त्यांनी दाखविले. म्यूलिकेन यांनी विद्युत् ऋणतेच्या (रेणूतील एखाद्या विशिष्ट अणूच्या स्वतःकडे इलेक्ट्रॉन आकर्षित करून घेण्याच्या क्षमतेच्या) उपयोगासंबंधी केलेले कार्यही महत्त्वाचे आहे. त्यांनी हा गुणधर्म १/२ (I + E) या सूत्राने मिळतो, असे दाखविले. येथे I हे अणुचे आयनीकरण वर्चस् (दिलेल्या प्रकारच्या अणूपासून एखादा इलेक्ट्रॉन काढून तो अनंत अंतरावर नेण्यासाठी प्रती एकक विद्युत् भाराला लागणारी ऊर्जा) आणि E ही त्याची इलेक्ट्रॉन आसक्ती आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनीय वर्णपटांच्या निरपेक्ष तीव्रतांच्या सैद्धांतिक विवरणासंबंधीच्या संशोधनातून संयुग्मित कार्बनी रेणूंच्या (ज्यांत एकांतरित-एकाआड एक-द्विबंध आहेत अशा रेणूंच्या) अभ्यासाकडे त्यांचे लक्ष वेधले. ⇨ पुंज यामिकीय विवरणाच्या आधारे त्यांनी अतिसंयुग्मनाच्या आविष्काराचे स्पष्टीकरण केले आणि त्याचे व्यापक महत्त्व प्रथमच प्रतिपादन केले. अतिसंयुग्मन हे संयुग्मनासारखेच असते पण त्यात संयुग्मित प्रणालीबरोबर मिथिल (CH3-), मिथिलीन (-CH2) व इतर संबद्ध गट यांची परस्परक्रिया होते. त्यानंतर म्यूलिकेन यांनी विशिष्ट द्विआणवीय व बहु-आणवीय वर्णपटांच्या विवरणाविषयी आणि संबंधित व्यापक सिद्धांतावर कित्येक संशोधनपर निबंध प्रसिद्ध केले.
नोबेल पारितोषिकाखेरीज म्यूलिकेन यांना गिल्बर्ट ल्यूइस पदक (१९६०), पीटर डेबाय पुरस्कार (१९६३), जे, जी. कर्कवुड पदक (१९६४), विलर्ड गिब्ज पदक (१९६५), प्रीस्टली पदक (१९८३) इ. बहुमान तसेच कोलंबिया, स्टॉकहोम व केब्रिंज या विद्यापाठांतर्फे सन्माननीय पदव्या मिळाल्या. अमेरिकेची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, रॉयल सोसायटी (लंडन), केमिकल सोसायटी (लंडन), इंडियन ॲकॅडेमी ऑफ, सायन्सेस वगैरे अनेक वैज्ञानिक संस्थांचे ते सदस्य आहेत.
भदे, व. ग.