मौखरी घराणे : प्राचीन भारतातील एक इतिहासप्रसिद्ध घराणे. त्याचा सुसंगत इतिहास उपलब्ध नाही तथापि इ. स. सहाव्या शतकात गुप्त साम्राज्याच्या अखेरीस हे घराणे उत्तर भारतात प्रबल सत्ताधारी झाले होते. त्यामुळे प्राचीन काळच्या महत्त्वाच्या राजवंशांमध्ये त्याची गणना होते. प्राचीन काळी आपला वंश पुराण प्रसिद्ध पुरुषांपासून उत्पन्न झाला असे दाखविण्याची राजेलोकांमध्ये प्रवृत्ती होती. तिला अनुसरून मौखरी राजे आपला वंश अश्वपती राजाला वैवस्वत मनूच्या कृपेने जे शंभर पुत्र झाले, त्यांपासून उत्पन्न झाला असे मानीत असत. त्यांच्या पूर्वजांना ‘मुखर’ असे नाव होते. त्यांपासून उत्पन्न झालेल्या वंशाला मौखरी हे नाव पडले, अशी वंशाची व्युत्पत्ती ईशानवर्म्याच्या हरह शिलालेखात दिली आहे.

मौखरी नावाची अनेक घराणी प्राचीन काळी राज्य करीत होती. सहाव्या शतकाच्या प्रथमार्धात एक मौखरी सामन्त घराणे गया जिल्ह्यात राज्य करीत होते. बराबर व नागार्जुनी टेकड्यांत त्याचे तीन कोरीव लेख सापडले आहेत. त्यात यज्ञवर्मा वा यज्ञवर्मन्, त्याचा पुत्र शार्दूलवर्मन् व त्याचा मुलगा अनन्तवर्मन् अशी वंशावळ दिली आहे. यज्ञवर्मा गुप्तांचा सामंत म्हणून उदयास आला असला, तरी पुढे त्याच्या वंशजांनी आपले स्वातंत्र्य पुकारले असावे.

या घराण्यापेक्षा उत्तर प्रदेशातील कनौज येथे राज्य करणारे मौखरी घराणे जास्त प्रसिद्ध आहे. याची वंशावळ अशी : हरिवर्मन् ⇨ आदित्यवर्मन् ईश्वरवर्मन् ईशानवर्मन शर्ववर्मन् अवन्तिवर्मन्  ग्रहवर्मन्. हरिवर्मन्‌ हा पाचव्या शतकाच्या अखेरीस उदयास आला. त्याने कान्यकुब्ज (कनौज) येथे आपले राज्य स्थापले. पहिल्या तीन राजांनी ‘महाराज’ अशी साधी पदवी धारण केली होती. तेव्हा त्यांचे राज्य फारसे विस्तृत नसावे. पण चौथा राजा ईशानवर्मन याने दूरवर स्वाऱ्या करून अनेक विजय संपादन केले. त्याने आंध्र, शूलिक (ओरिसातील शुल्की) आणि गौड या राजांचा पराभव केल्याचे वर्णन त्याच्या मालव संवत् ६११ (इ.स. ५५५) च्या शिलालेखात आले आहे. त्याने व त्याच्या नंतरच्या राजांनी महाराजाधिराज ही सम्राटपदनिदर्शक पदवी धारण केली. ईशानवर्म्याला सूर्यवर्मानामक मुलगा होता. त्याचे नाव पुढील वंशावळीत येत नाही. तथापि अन्य उल्लेखावरून त्याने त्याला मगध देशावर नेमलेले दिसते. उत्तर-गुप्तवंशी कुमारगुप्ताने ईशानवर्म्याचा पराजय केल्याचा उल्लेख गुप्तांच्या अफ्‌सड येथील लेखांत आला आहे.

शर्ववर्म्याच्या कारकीर्दीत रानटी हूण टोळ्यांनी उत्तर भारतावर पुन्हा आक्रमण केले. शर्ववर्म्याने ही आक्रमणे परतविली आणि महनीय कामगिरी केली. तिचा उल्लेख त्याचे शत्रू उत्तरकालीन गुप्त यांच्या लेखांत येतो. हे विशेष आहे. तेथील वर्णनावरून शर्ववर्म्याने आपल्या गजसैन्याच्या बळावर हूणांचा धुव्वा उडवला असे कळते.

शर्ववर्म्यानंतर अवन्तिवर्मा गादीवर आला. त्याच्याही कारकीर्दीत हूणांची आक्रमणे होतच होती. त्यांना तोंड देऊन देशाचे रक्षण करण्यात त्याला स्थानेश्वराच्या प्रभाकरवर्धनाचे साहाय्य मिळाले.पुढे प्रभाकरवर्धनाने हे राजकीय सख्य दृढ करण्याकरीता अवन्तिवरम्याचा पुत्र ग्रहवर्मा याला आपली कन्या राज्यश्री दिली, अशी माहिती हर्षचरितात (बाणभट्ट) मिळते. 

मौखरी आणि उत्तरकालीन गुप्त यांचे कित्येक पिढ्या हाडवैर होते. प्रभाकरवर्धनाच्या निधनाने प्राप्त झालेल्या संधीचा फायदा घेऊन मालवाधिपती देवगुप्ताने कनौजवर स्वारी केली. ग्रहवर्म्यास ठार केले. आणि राज्यश्रीस बंदीत टाकले. त्याचा सूड प्रभाकरवर्धनाचा ज्येष्ठ पुत्र राज्यवर्धन याने घेतला. त्याने देवगुप्ताचा पराभव केला. पण तितक्यात त्याच्या साहाय्यार्थ आलेल्या गौडाधिपती शशांकाने राज्यवर्धनाला संधीकरीता बोलावून तो एकटा व निःशस्त्र असताना विश्वासघाताने त्याचा वध केला. तेव्हा हर्षाने दिग्विजयाची घोषणा केली. तितक्यात राज्यश्री बंदीतून निसटून विंध्यारण्यात आश्रयार्थ गेली. हर्षाने तिचा शोध लावून तिला कनौजला आणले. त्याने शशांकाचा पराभव करून त्याला शरण आणले. व कनौजच्या मंत्र्याच्या संमतीने आणि तेथील अवलोकितेश्वर बोधिसत्त्व याचा कौल घेऊन तो तेथील गादीवर बसला. अशा रीतीने कनौजच्या मौखरी घराण्याचा शेवट झाला. मौखरींच्या राज्याचा विस्तार त्यांच्या अत्यंत भरभराटीच्या काळी पश्चिमेस वर्धनांच्या श्रीकंठदेशापासून पूर्वेस मगधाच्या पूर्व सीमेपर्यंत आणि उत्तरेस तराईपासून दक्षिणेस उत्तर प्रदेशाच्या दक्षिण सीमेपर्यंत झाला होता. मगध आणि गौडदेशही काही काळ त्यांच्या अंमलाखाली असावे. पण लौकरच ते देश त्यांच्या ताब्यातून गेले. आणि त्यांचे राज्य सध्याच्या उत्तर प्रदेशापुरते मर्यादित राहीले.

मौखरींचे नाव त्यांनी हूणांशी केलेल्या यशस्वी लढ्यामुळे इतिहासात चिरस्मरणीय राहील. या लढ्याचा उल्लेख काही विद्वानांच्या मते मुद्राराक्षस नाटकाच्या भरतवाक्यात आहे.

संदर्भ: 1.Basak,R.G. History of North-Eastern India, Calcutta, 1967.

           2. Majumdar, R. C.Ed. The Classical Age, Bombay, 1970.

           3. Tripathi, R. S. History of Kanauj, Delhi, 1959.

मिराशी, वा. वि.