मोरेसी : (वट कुल). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग] ⇨ तुती व तत्सम इतर वनस्पतींचा अंतर्भाव केलेल्या या कुलाचा समावेश अर्टिकेलीझ गणात होतो. यामध्ये सु. ५५ प्रजाती आणि १,००० जाती आहेत. सर्व जाती विशेषकरून उष्ण कटिबंधात आढळतात. हे बहुतेक सर्व लहान मोठे चिकाळ वृक्ष आहेत. पाने साधी, सोपपर्ण (तळाशी लहान उपांगे असलेली), एकाआड एक व कमी जास्त विभागलेली असतात. फुलोरा कुंभासनी किंवा स्थालीकल्प, नतकणिश वगैरे प्रकारचा असतो [→पुष्पबंध]. फुले लहान व एकलिंगी, पुं-पुष्पामध्ये ४ परिदले व त्यांच्या समोरच ४–५ केसरदले, स्त्री-पुष्पामध्ये ४ परिदले व किंजमंडलात २ किंगदले पण त्यांतील एक ऱ्हास पावते [→ फूल].फळे लहान , कृत्स्न (शुष्क व एक बीजी) अगर अश्मगर्भी (आठळीयुक्त) असतात [→ फळ]. काही वनस्पतींत अनेक लहान, फळांचे संयुक्त फळ (उंबरासारखे फलपुंज-तुती आणि फणसासारखे) असते. परागसिंचन वारा अथवा कीटकांच्या साहाय्याने होते. बीज बहुधा सपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश असलेले) असते. या कुलाचे ⇨ अर्टिकेसी कुलाशी नाते असल्याने पूर्वी दोहोंचे एकच कुल मानले होते. मोरेसीमध्ये तुती, फणस, वड, पिंपळ, उंबर, अंजीर, रबर इ. अनेक उपयुक्त वनस्पतींचा समावेश होतो. बागेत, रस्त्याच्या दुतर्फा ही झाडे लावली जातात. दगडी इमारतीवर इंडियन ⇨ आयव्ही ही अनेक सूक्ष्म हवाई मुळ्यांनी चढणारी वेल शोभेसाठी लावतात.रबराच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.
पहा : अर्टिकेसी.
संदर्भ : 1.Mitra, J.N. Systematic Botany and Ecology,Calcutta,1964.
2.Rendle, A.B. The Classification of Flowering Plants, Vol. II, Cambridge,1963.
मुजुमदार, शां. ब.