मोरलँड, विल्यम हॅरिसन : ( ? १८६८–? १९३८). ब्रिटिश इतिहासकार व ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील एक कार्यक्षम सनदी अधिकारी. त्याचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात उत्तर आयर्लंडमध्ये झाला. त्याचे शिक्षण क्लिफ्टन आणि ट्रिनिटी कॉलेज (केंब्रिज) येथे झाले पुढे त्याने कायद्याची परीक्षा दिली (१८८९). त्याची भारतात वायव्य सरहद्द प्रांतात उप-साराबंदी अधिकारी म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर त्याने सहायक आयुक्त (१८९४), सह-न्यायदंडाधिकारी (१८९७), जिल्हाधिकारी आणि अखेरीस भूमीअभिलेख व कृषी विभागाचा संचालक (१८९९) अशा विविध पदांवर काम केले.१९१४ मध्ये तो सेवानिवृत्त झाला. त्याने कार्यक्षम प्रशासक म्हणून नाव मिळवले. या अवधीत त्याने फार्सी, डच, फ्रेंच इ. विविध भाषा आत्मसात केल्या. जमिनीचा मालकी हक्क प्रस्थापित करणाऱ्या प्रक्रिया कायद्याविषयीची कार्यवाही सुटसुटीत करण्यासाठी त्याने प्रयत्न केले आणि कानूंगोंना (कुलकर्ण्यासारखा ग्रामीण वतनदार मुलकी अधिकारी) प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली. पहिले कृषी महाविद्यालय (कानपूर) स्थापन करण्यात त्याचा मोठा वाटा होता. त्याला अनेक शासकीय मानसन्मान व सी, आय्. ई. हा किताब मिळाला (१९०५) . प्रशासकीय सेवेत असताना १९०७–०८ च्या दुष्काळात त्याने महत्त्वाची कामगिरी केली, तांबेरा प्रतिबंधक गव्हाच्या जाती निर्माण करण्याचा प्रक्रियेतील एक तज्ञ म्हणून त्याने १९१२ मध्ये ऑस्ट्रेलियास भेट दिली. मुलकी सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही (१९१४), मध्य भारतातील एका संस्थानात शेती सल्लागार म्हणून दोन वर्षे त्याने काम केले आणि १९१६ मध्ये तो इंग्लंडला परतला. उर्वरित आयुष्य त्याने लेखन-वाचनात व्यतीत केले, लंडनमध्ये तो मरण पावला.
इतर मुलकी अधिकाऱ्यांप्रमाणे मोरलँडनेही येथील मूळ कागदपत्रांत रस घेतला आणि भारतातील मध्ययुगीन शेतसाऱ्याच्या पद्धतीपासून विसाव्या शतकापर्यंतच्या शेतसाऱ्यांच्या पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास केला. या संशोधनाची सुरुवात त्याने कनिष्ठ महसूल अधिकाऱ्यांसाठी लिहिलेल्या मार्गदर्शनपर पुस्तिकेत आढळते. त्यानंतर त्याने इंट्रोडक्शन टू इकॉनॉमिक्स फॉर इंडियन स्टूडंट नावाचे एक पाठ्यपुस्तक लिहिले (१९१३).
मोरलँडने अबुल फज्ल व बदाऊनी यांच्या मूळ ग्रंथांचा अभ्यास केला आणि इंडिया ॲट द डेथ ऑफ अकबर (१९२०) हा मौलिक ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्याने भारतातील तत्कालीन परिस्थितीची साधार मीमांसा केली आहे. या पुस्तकात शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीला मोगल जहागीरदार आणि त्यांची स्वार्थी वृत्ती कारणीभूत होती, असा निष्कर्ष त्याने मांडला आहे आणि शेवटी ब्रिटिश महसूल पद्धती अधिक न्याय्य असल्याचा दावा त्याने केला आहे.
नंतर त्याने औरंगजेबाच्या फर्मानांचा, डच साधनांचा आणि अब्दुल हमीदच्या बादशाहनाम्याचा अभ्यास करून औरंगजेबाच्या काळात शेतीउत्पन्नाचा एक–द्वितीयांश भाग महसूल म्हणून मोगल अधिकारी आणि मक्तेदार कसा गोळा करीत, हे फ्रॉम अकबर टू औरंगजेब (१९२३) या ग्रंथात दाखविले आहे. द ॲग्रेरियन सिस्टिम ऑफ मुस्लिम इंडिया (१९२९) या त्याच्या ग्रंथात तेरा ते सोळा शतकांतील महसूल व्यवस्थेचा ऊहापोह केला आहे.
मोरलँड हा ब्रिटिश सनदी सेवेतील एक नमुनेदार इतिहासकार-अधिकारी होय. आपल्या सेवानुभवाच्या दृष्टीने त्याने महसूल प्रशासन व कृषी यांना आपल्या लेखनात महत्त्व दिले. शेतकऱ्यांचे कल्यान हा महसूल प्रशासनाचा पाया असला पाहिजे आणि भारतीय जीवनव्यवस्थेत शेतकऱ्याचे स्थान सर्वाधिक महत्त्वाचे आहे, हे त्याचे विचार आजही महत्त्वाचे ठरतात. मध्ययुगीन इतिहासाची साधनभूत सामग्री म्हणून त्याच्या लेखनाचे महत्त्व आहे.
संदर्भ :1. Philips, C. H. Ed. Historions of India, Pakistan and Ceylon, London, 1961.
2. Sen, S. P. Ed. Historians and Historiograghy in Modern India, Calcutta, 1973.
कदम, व, शं.