मोनेल धातु : मुख्यत्वे निकेल व तांबे यांची बनलेली आणि संरक्षणरोधक (गंजरोधक) व उच्च बल असलेली मिश्रधातू. हे इंटरनॅशनल निकेल कंपनीच्या मिश्रधातूचे व्यापारी नाव आहे. मोठ्या प्रमाणावर बनविण्यात आलेली ही निकेलची सर्वांत जुनी व प्रमुख अशी मिश्रधातू असून १९०५ साली सडबरी (कॅनडा) येथील सल्फाइडी धातुकाचे (कच्चा रूपातील धातूचे) सरळ प्रगलन करून (वितळवून) ही सर्वप्रथम तयार करण्यात आली. सुरुवातीच्या काळात हिच्यात निकेल ७०% व तांबे ३०% असे. आता सामान्यतः हिच्यात निकेल ६३–६७, तांबे २९–३०% लोखंड १–१·५%, मँगॅनीझ सु. १% व कार्बन ०·१–०·२% हे घटक असतात. कधीकधी हिच्यात सिलिकॉन, ॲल्युमिनियम इत्यादीही असतात.
निकेल व तांबे घन स्थितीमध्ये एकमेकांमध्ये पूर्णपणे विरघळत असल्याने ही एक प्रावस्था असणारी मिश्रधातू आहे. ओतीव अवस्थेतील हिच्या सूक्ष्मस्फटिकांची रचना वृक्षाभ दिसते पण अनुशीतन (उष्णता संस्करणानंतर धातू सावकाश थंड करण्याची क्रिया) केल्यावर एकाच संघटनाचे स्फटिक दिसतात. यंत्रण, थंड व उष्ण अवस्थेतील कामे, ओतकाम, घडण, वितळजोडकाम इ. धातुरूपण क्रियांच्या दृष्टीने ही मिश्रधातू सुलभ व सोयीची आहे. अशा प्रकारे हिच्या तारा, पत्रे, नळ्या. गज इ. बनविता येतात.
मोनेल चकमकीत रुपेरी व शुद्धनिकेलापेक्षा बळकट असून हिचे ताणबल ५७ ते ७० किग्रॅ./ मिमी२ आहे आणि ४००° से. तापमानापर्यंत बहुतकरून कमी होत नाही. हिची कठिनता १४० ते २०० ब्रिनेल [→ कठिनता] म्हणजे जवळजवळ पोलादाएवढी आहे तरी हिचे दीर्घीकरण (ताणाखाली धातुच्या लांबीत होणाऱ्या वाढीचे शेकडा प्रमाण) ३०–४५% आहे. ही चांगली विद्युत् संवाहक आणि उष्णता संवाहक आहे. ही उत्तम संरक्षाणरोधक असल्याने गरम हवा वा वायू, खारे पाणी, सल्फ्यूरिक अम्ल, क्षार (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणारे पदार्थ, अल्कली), अमोनिया इत्यादींचा हिच्यावर संक्षारक परिणाम होत नाही. हवेत गंधक असल्यास ३७०° से. पेक्षा अधिक तापमानाला हिचेजलदपणे संक्षारण होत असल्याने अशापरिस्थितीत ही वापरता येत नाही मात्र गंधक नसल्यास ही ५४०° से. पर्यंतच्या तापमानाला वापरता येते. साध्या ओल्या फडक्याने पुसले असता ही स्वच्छ व चकमकीत होते.
के-मोनेल ५०० या प्रकारात सु. २·७५% ॲल्युमिनियम असून −१००° से. तापमानापर्यंत हा अचुंबकीय रहातो (म्हणून विमानातील होकायंत्रालगतच्या भागात वापरतात). एस-मोनेल प्रकारात सु ४% सिलिकॉन असून हा ओतीव कामासाठी चांगला असतो. (यंत्रातील सरकते व हलते भाग बनविण्यास हा प्रकार वापरतात.) यांशिवाय हिचे विशिष्ट प्रमाणात कार्बन घालून बनविलेला केआर-मोनेल व नियंत्रित प्रमाणात गंधक बनविलेला आर-मोनेल हेही प्रकार आहेत.
रासायनिक प्रक्रिया, खनिज तेल परिष्करण, औषधे, कापड, कागद इ. उद्योगधंदे तसेच रुग्णालये, धुलाई केंद्रे येथील साहित्य, भांडी वगैंरेसाठी मोनेलचा वापर करतात. समुद्रात वापरावयाची उपकरणे व यंत्रसामुग्री (उदा. जहाजाचे प्रचालक, दंड, झडपा, पंपाचे भाग, स्प्रिंगा इ.) यांसाठी मोनेल विशेष उपयोगी आहे. तसेच बाष्पित्रातील (बॉयलरमधील) नळ्या, वैज्ञानिक उपकरणे, भाते, शोभिवंत वस्तू. खेळणी वगैरेसाठीही मोनेल धातू वापरतात. यांशिवाय झीज व संक्षारण यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलादावर मोनेलचे आवरण घट्टपणे बसवितात हे आवरण विद्युत् विलेपनाने देण्यात येणाऱ्या मुलाम्यापेक्षा टिकाऊ असते.
खानगांवकर, प. रा.