मोडक, ताराबाई : (१९ एप्रिल १८९२–३१ ऑगस्ट १९७३). शिक्षणतज्ञ व पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक. ताराबाई या चाकणच्या (जि. पुणे) केळकर घराण्यातील. जन्म मुंबई येथे. वडिलांचे नाव सदाशिवराव व आईचे उमाबाई. १९१४ साली त्या बी. ए. झाल्या. महाविद्यालयीन शिक्षणकाळात मुंबई येथे ताराबाईंची कृष्णा वामनराव मोडक यांच्याशी ओळख होऊन पुढे त्यांचा नोंदणी पद्धतीने प्रेमविवाह झाला (१९९५). त्यास दोन्ही घरच्या लोकांचा विरोध होता. कृष्णा मोडक अमरावती येथे वकिली व्यवसाय करीत. त्यांना एक मुलगी होती. पुढे ताराबाईचे भावनगर, राजकोट, अमरावती, विकासवाडी इ. ठिकाणी स्थलांतर झालेले आढळते.
सु. १९२१ मध्ये ⇨ गिजुभाई बधेका यांच्या साहाय्याने भावनगर येथे माँटेसरीच्या तत्त्वांवर आधारलेली ‘ गीता शिक्षण पद्धती ’ त्यांनी निश्चित केली. हाच ताराबाईंच्या बालशिक्षण कार्याचा प्रारंभ होय. शिक्षणाचा खरा पाया मुलांच्या बालवयातच घातला जाण्याची शक्यता व आवश्यकता असते, या दृष्टीने त्यांनी पूर्वप्राथमिक शिक्षणाचे नवीन पाऊल टाकले. त्यांची बार्टन फीमेल ट्रेनिंग कॉलेजच्या प्राचार्या म्हणून नियुक्ती झाली (१९२१). पुढे नऊ वर्षे भावनगरच्याच दक्षिणामूर्ती शिक्षणसंस्थेत प्राध्यापिका म्हणून काम केले (१९२३–३२). १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली. पुढे बालशिक्षणाचे हे लोण महाराष्ट्रात पसरले. मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत त्यांनी शिशूविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले (१९३६–४८). या संस्थेने पुढे पूर्वप्राथमिक अध्यापन मंदिर सुरू केले, यातून मराठी आणि गुजराती दोन्ही भाषांच्या हजारांहून अधिक शिक्षक-शिक्षिकांचे प्रशिक्षण झाले.
गिजुभाईंच्या मृत्यूनंतर (१९३९) पुढील १२ वर्षे नूतन बालशिक्षणसंघाची धुरा ताराबाईंनी वाहिली. ग्रामीण भागात बालशिक्षणाचा प्रसार करणे हे या संघाचे काम होय. १९४५ मध्ये ताराबाईंनी बोर्डी (जि. ठाणे) येथे ग्राम बालशिक्षा केंद्र स्थापिले. या संस्थेतूनच ग्रामीण बालवाडी व ग्राम बाल अध्यापन मंदिर या संस्था निघाल्या. या संस्थांचा लाभ आदिवासी मुलांना मिळावा, म्हणून त्यांच्या आदिवासी परिसरात आणि अंगणात बालवाडी चालविण्याचा उपक्रम केला. या अंगणवाडीमुळे आदिवासींच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळाली. आदिवासी मुलांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी १९५३ मध्ये नवीन उपक्रम केला. १९५७ मध्ये बोर्डी येथील ग्राम बालशिक्षा केंद्र कोसबाड येथे हलविण्यात आले. येथे आदिवासी मुलांसाठी कुरणशाळा, रात्रीची शाळा, व्यवसाय शिक्षण हे पूरक प्रकार प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आले. येथिल प्रशिक्षण महाविद्यालयात ताराबाईंनी पुरस्कारिलेली शिक्षणयोजना चालू असून तिला राज्य सरकारची मान्यता लाभली आहे. हा एक नवीन प्रयोग असल्याने आदिवासी विभागातील एकशिक्षकी शाळांतील मुलांच्या बुद्धिमापनासंबंधी अधिक संशोधन करून नव्या अभ्यासक्रमाची रचना, बालसाहित्यनिर्मिती व विज्ञान शिक्षण देण्याचे प्रयोग सुरू आहेत. परंपरागत शिक्षणपद्धतीमधील जबरदस्त शिक्षेच्या, वेळापत्रकाच्या, सर्व कल्पनांच्या मुळावर घाव घालणाऱ्या माँटेसरीच्या मूळ तत्त्वांना त्यांनी धक्का लागू दिला नाही. मात्र त्यांचे शिक्षणविषयक धोरण एका बाजूला राष्ट्रीय, तर दुसऱ्या बाजूने स्थलकालातीत होते.
ताराबाई ग्राम बालशिक्षण संघाच्या चिटणीस होत्या (१९४०–५४). यादरम्यान त्यांनी शिक्षण पत्रिका मासिक (मराठी, गुजराती, हिंदी) संपादन केले. महाराष्ट्र विधानसभेच्या त्या सभासदही होत्या (१९४६–५१). आदिवासी मुलांचे जीवन विकसित करण्यासाठी ताराबाईंनी आपले आयुष्य वेचले. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सु. १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगिते इ. साहित्याचा अंतर्भाव होतो. १९५२ मध्ये त्यांना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ : फाटक, पद्मजा, शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक, मुंबई, १९८१.
मिसार, म. व्यं.
“