ग्लोव्हर चषकासाठी झालेल्या गुडवुड आंतरराष्ट्रीय मोटार शर्यतीचे एक दृश्य

मोटार शर्यती : हमरस्त्यावरील किंवा आखीव मार्गावरील मोटारींच्या वेगवान शर्यती. मोटारीची गती व चालकाचे वाहनकौशल्य यांची कसोटी पाहणारा रोमहर्षक, साहसी व प्रसंगी जोखमीचा असा हा क्रीडाप्रकार आता जगभर मान्यता पावला आहे. मोटार शर्यतींचा प्रारंभ फ्रान्समध्ये १८९४ मध्ये झाला. नंतर १८९५ मध्ये अमेरिकेत त्या सुरt झाल्या. अमेरिकेतील सुप्रसिद्ध ‘इंडियाना-पोलिस’ ही ५०० मैलांची (८०४·६७ किमी.) शर्यत १९११ मध्ये सुरू झाली. ही शर्यत आणि ‘मोनाको ग्रां प्री’ या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त मोटार शर्यती होत. पाश्चिमात्य मोटार शर्यती या हौशी व व्यावसायिक अशा दोन्ही स्तरांवर भरवल्या जातात. शर्यतीसाठी विशिष्ट रचनेच्या, खास स्पर्धांसाठी तयार केलेल्या गाड्या (स्पोर्ट्‌सकार) वापरल्या जातात. तद्वतच ‘स्टॉक’, ‘मिजेट’, ‘कार्ट’, ‘ग्रँड प्रिक्स’ (ग्रां प्री), ‘हॉट-रॉड’, ‘ड्रॅग’ इ. नावांनी, विशिष्ट प्रकारच्या मोटारी वापरून, खेळल्या जाणाऱ्या शर्यती आता लोकप्रिय झाल्या आहेत. या शर्यतींमध्ये एकच व्यक्ती चालक म्हणून बसू शकेल अशा छप्परविरहित उघड्या मोटारींचा एक प्रकार आहे, तसेच बंद मोटारींमध्ये दोघे वा चौघे बसू शकतील, असेही शर्यत-प्रकार आहेत. शर्यतींचे गट अंतरानुसार, तसेच मोटारीच्या यंत्राच्या क्षमतेनुसार-म्हणजे किती अश्वशक्तीचे यंत्र आहे त्यानुसार-केले जातात. ५०० सी. सी. पेक्षा कमी ते ५,००० सी. सी. पेक्षा जास्त क्षमतेचे मोटार स्पर्धेचे अनेक गट असतात. जागतिक मोटार शर्यतींसाठी साधारणपणे ३,००० सी.सी. च्या मोटारी असतात. स्पर्धेच्या नियमानुसार मोटारीच्या यंत्राची क्षमता तपासून घेतली जाते. तसेच वाहनचालकाचीही वैद्यकीय तपासणी करून, त्याने सुरक्षाविषयक योग्य प्रकारचे साहित्य वापरले आहे की नाही, ते पाहिले जाते. सर्व गाड्यांना दोन्ही बाजूंनी (स्ट्रीम लाइनमध्ये) विशिष्ट आकाराचे व रंगाचे क्रमांक असावे लागतात. तसेच तो क्रमांक मोटारीच्या पुढील बाजूस आच्छादनावर (बॉनेट) असावा लागतो. ‘स्टॉक कार रेसिंग’ हा प्रकार सर्वसामान्य लोक वाहन म्हणून जी मोटार वापरतात, त्यांच्या शर्यतीचा आहे. तथापि शर्यतीसाठी त्यात विशेष रचना केलेली असते. मोटार शर्यतींसाठी बव्हंशी लंबवर्तुळाकार आखीव मार्ग (ओव्हल ट्रॅक) वापरला जातो. मात्र बऱ्याच वेळा या स्पर्धा सर्वसामान्य रस्त्यांवरूनही घेतल्या जातात. या शर्यती ‘ग्रँड नॅशनल चॅम्पियनशिप डिव्हिजन’ या नावाने अमेरिकेत विशेष प्रसिद्ध आहेत. इंजिनक्षमता ४३० सी. सी. आणि चाकांचा पाया ९ फुट ७ इंच ते ९ फुट ११ इंच (२·९२ मी. ते ३·०२ मी.) असावा लागतो व वजन निदान ३,८०० पौंड (१,७२२·६४ किग्रॅ.) असावे लागते. क्रीडागारावरील मोटार शर्यती (स्टेडियम रेस), टेकड्यांवरील शर्यती (हिल रेस), अडथळा शर्यती असे मोटार शर्यतींचे अनेकविध प्रकार आहेत. ‘रॅली रेस’ ही प्रदीर्घ अंतराची व अतिलांब पल्ल्याची मोठी स्पर्धा असून, हा प्रवास टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जातो. त्यात विशिष्ट अंतर विशिष्ट वेळात पार करावे लागते. प्रत्येक टप्प्यावर गुण मिळवून व विश्रांती घेऊन स्पर्धकाला पुढील मार्गक्रमण करून अंतिम टप्पा गाठून, स्पर्धेत विजय संपादन करण्याची संधी मिळते.

यूरोपीय देशांत व अमेरिकेत मोटार शर्यतींचे नियोजन करणाऱ्या अधिकृत राष्ट्रीय संस्था आहेत. तथापि जागतिक स्तरावर मोटार शर्यतींचे नियमन आणि नियंत्रण करणारी ‘Federation Internationale de l’ Automobile’ (एफ्‌. आय्‌. ए.) ही संस्था पॅरिसमध्ये असून, १९०४ मध्ये ती स्थापन झाली. प्रारंभावस्थेतील, १८९५ सालातील पॅरिस ते बॉर्दो या शर्यतीला ४८ तासांपेक्षा जास्त वेळ लागला. ती शर्यत जिंकणाऱ्या फ्रेंच ‘पॅनहार्ड’ मोटारीचा सरासरी वेग ताशी फक्त १५ मैल (२४·१४ किमी.) होता. दुसऱ्या महायुद्धानंतर १९४७ साली तासाला ३९४·२ मैल (सु. ६३४·०८ किमी.) उच्चांक प्रस्थापित झाला. ब्रीडल यांनी १९६५ मध्ये ताशी मैल (सु. ९६५·६१ किमी.) वेगाचा उच्चांक गाठला. मोटारींची ‘आफ्रिकन सफारी’ ही भव्य स्पर्धा गेली अनेक वर्षे भरत आहे. केन्यातले काही भारतीय या स्पर्धेत भाग घेतात.


पहिल्या ‘हिमालयन कार रॅली’ तील (१९८०) दोन स्पर्धक मोटारी

भारतात मोटार शर्यतींची सुरुवात ब्रिटिशांच्या कारकीर्दीत झाली. सुरुवातीच्या मोटार शर्यतींच्या संघटनांमध्ये ‘ऑटोमोटिव्ह असोसिएशन ऑफ ईस्टर्न इंडfया’, कलकत्ता (पुढे ‘कलकत्ता मोटार स्पोर्ट्‌स क्लब’ असे नामकरण व आजतागायत त्याच नावाने प्रचलित) आणि ‘ऑटोमोटिव्ह असोसिएशन ऑफ साउथ इंडीया’, मद्रास (पुढे ‘मद्रास मोटार स्पोर्ट्‌स क्लब’ असे नामकरण) या दोन संस्थांचा उल्लेख करता येईल. ह्याच सुमारास महाराष्ट्रातही ‘डेक्कन मोटार स्पोर्ट्‌स क्लब’ (१९४०–६६) ही संस्था पुण्यात स्थापन झाली. सध्याचे मोटार शर्यतींचे एकमेव केंद्र म्हणून शोलावरम्‌चा उल्लेख करता येईल. तिथे ‘मद्रास मोटार स्पोर्ट्‍स क्लब’ या जुन्या प्रतिष्ठित संस्थेमार्फत (स्थापना १९४७) वार्षिक ‘ग्रां प्री’ मोटार शर्यती भरवल्या जातात. ‘वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशन’ (डब्ल्यू. आय्. ए. ए.) या संघटनेने १९६० या दशकाच्या प्रारंभी मोटारींच्या विश्वसनीयता चाचण्यांची (रिलायबिलिटी टेस्ट) स्पर्धा सुरु केली. या दीर्घ पल्ल्याच्या प्राथमिक अवस्थेतील ‘रॅली’ होत. पण त्यांच्या नियमांत आणि नियोजनात फारशी सुसूत्रता नव्हती. १९६८ मध्ये ‘लंडन-सिडनी रॅली’ ही मोटार शर्यत मुंबई मार्गे गेली आणि त्यातून स्फूर्ती घेऊन ‘डब्ल्यू. आय्. ए. ए.’ ने १९७० मध्ये पहिली ‘ऑल इंडीया मोटार रॅली’ आयोजित केली. त्याच वर्षी तेहरान-डाक्का या आशियाई महामार्ग मोटार शर्यतीत भारताच्या नासिर हुसेन, मोहिंदर लालवाणी व सुरेश नाईक यांच्या संघाने अभूतपूर्व विजय संपादन केला. पुढे दरवर्षी ‘ऑल इंडिया रॅलीज’ मोठ्या प्रमाणावर भरवल्या जाऊ लागल्या. मद्रासमधील ‘फेडरेशन ऑफ मोटार स्पोर्ट्‍स क्लब्ज ऑफ इंडीया’ (एफ्. एम्. एस्. सी. आय्., स्थापना–१९७३) ही भारतातील मोटार शर्यतींचे नियमन व नियंत्रण करणारी मध्यवर्ती राष्ट्रीय संघटना असून ती पॅरिसच्या एफ्. आय्. ए. शी. संलग्न आहे. १९७६ मध्ये एफ्. एम्. एस्. सी. आय्. ने भारतातील मोटार शर्यतींसाठी एक सर्वसमावेशक नियमावली तयार केली असून ती ‘जनरल कॉँपिटिशन रूल्स’ (जी. सी. आर्.) व ‘नॅशनल कॉपिंटिशन रूल्स’ (एन्. सी. आर्.) अशा दोन भागांत आहे.

भारतातील मोटार शर्यतींच्या इतिहासातील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘हिमालयन कार रॅली’ होय. ही भारतातील मोठ्या प्रमाणावरील पहिलीच आंतरराष्ट्रीय मोटार शर्यत. मुंबईचे नासिर हुसेन व त्यांचे सहकारी यांनी १९८० मध्ये या स्पर्धेचे प्रथम आयोजन केले. जोखीमा व संकटे यांनी भरलेली साहसपूर्ण आणि रोमहर्षक अशी ही मोटार शर्यत जगातील सर्वांत खडतर व अवजड मानली जाते. कारण या शर्यतीच्या मार्गामध्ये पक्क्या रस्त्यांप्रमाणेच ओबडधोबड कच्या सडका, वेडीवाकडी वळणे, कडक ऊन व कडक थंडी यांनी युक्त प्रदेश, हिमाचल प्रदेशातील उंच व धोक्याची वळणे असलेले घाट अशा आव्हानांचा अंतर्भाव असतो. त्यामुळे त्यात मोटारींचा यांत्रिक-तांत्रिक दर्जा व स्पर्धकांचे मनोबल व शारीरिक क्षमता यांचा कस लागतो. १९८० साली भरलेल्या पहिल्या स्पर्धेत स्पर्धकांना एकूण ५,३०० किमी. खडतर मार्ग कापावा लागला. त्यात ८४ स्पर्धकांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा केन्याच्या शेखर मेहताने जिंकली. हिमालयन कार रॅलीची सहावी स्पर्धा १९८५ मध्ये झाली. केन्याच्याच जयंत शाहने लागोपाठ चार वेळा ही स्पर्धा जिंकून विक्रम प्रस्थापित केला आहे.

पहा : मोटारगाडी. 

संदर्भ : 1. Boddy, William, The History of Motor Racing, New York, 1977.

             2. Cutter, Robert Fendell, Bob, Encyclopaedia of Auto Racing, 1973.

             3. ‘Know the Game’ Series Davis, V. L. P. Motor Sport, London, 1957.

नातू, मो. ना. आलेगावकर, प. म.