मोकाशी, दि. बा. : (२७ नोव्हेंबर १९१५–२९ जून १९८१). ख्यातनाम मराठी कथा-कादंबरीकार. संपूर्ण नाव दिगंबर बाळकृष्ण मोकाशी. जन्म रायगड जिल्ह्यातील उरणचा. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर अभियांत्रिकीची पदविका घेतली. पुण्यात रेडिओ दुरुस्तीचा व्यवसाय केला. पुणे येथेच त्यांचे निधन झाले.

लामणदिवा (१९४७) हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यानंतर कथामोहिनी (१९५९), आमोद सुनासि आले (१९६०), वणवा (१९६५), चापलूस (१९७४), एक हजार गायी (१९७५), आदिकथा (१९७६), माऊली (१९७६) व तू आणि मी (१९७७) हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले.

विविध अनुभूतींतून माणूस शोधण्याचा, व्यक्तीच्या अंतर्मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न हे त्यांच्या कथालेखनाचे लक्षणीय वैशिष्ट्य होय. रहस्यकथा, पिशाच्चकथा असे कथाप्रकारही त्यांनी हाताळले आहेत. लामणदिवा या त्यांच्या पहिल्या कथासंग्रहात त्यांची प्रयोगशीलता दिसून येते. पण कथामोहिनीपासून त्यांच्या कथेने खूपच पुढचा  टप्पा गाठला आहे. व्यक्तीच्या अंतर्मनाचा वेध घेण्याचे त्यांचे सामर्थ्य ‘गोष्टीची मोहिनी’, रहस्यकथेचा एक दिवस ’ यांसारख्या कथांतून दिसून येते. पण आता ‘आमोद सुनासि आले’ यासारख्या कथेत मात्र ते कथालेखनाचा एकदम वरचा पल्ला गाठतात. भावचित्रणातील हळुवारपणा व नाजुकपणा आणि घटनेतील नाट्य यांचा संगम या आणि त्यांच्या अनेक कथांतून आढळून येतो. अनेक जीवनानुभवाच्या वेगवेगळ्या पातळींवरून अनुभव घेऊन, त्यामध्ये संगती शोधण्याचा प्रयोग त्यांनी आपल्या अनेक कथांतून केला आहे. गूढकथा, पिशाच्चकथा, रहस्यकथा यांसारख्या त्यांच्या वेगळ्या वळणाच्या कथाही निश्चित उल्लेखनीय आहेत.

स्थलयात्रा (१९५८), पुरूषास शंभर गुन्हे माफ (१९७१), देव चालले (१९६१), आनंद ओवरी (१९७४) व वात्स्यायन (१९७८) ह्या कादंबऱ्या. त्यांपैकी आनंद ओवरी आणि वात्स्यायन ह्या कादंबऱ्या चरित्रात्मक असून त्यांत अनुक्रमे संत तुकाराम आणि वात्स्यायन ह्यांचे भावजीवन रंगविले आहे.

पालखी (१९६४) व अठरा लक्ष पाऊले (१९७१) ही त्यांची प्रवासवर्णनपर पुस्तके. तथापि त्यांत प्रवासवर्णनापेक्षा समाजजीवनाचा शोध घेण्यावर अधिक भर दिसतो.

विख्यात अमेरिकन कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वे ह्याच्या फॉर व्हूम द बेल टोल्स ह्या प्रसिद्ध कादंबरीचा घणघणतो घंटानाद (१९६५) ह्या नावाने त्यांनी केलेला अनुवाद उल्लेखनीय आहे. लहान मुलांसाठीही त्यांनी पुस्तके लिहिली आहेत.

संध्याकाळचे पुणे (१९८०) हे त्यांचे अखेरचे पुस्तक. मोकाशी ह्यांना संध्याकाळच्या पुण्याची जी विविध रूपे दिसली, त्यांचे लालित्यपूर्ण दर्शन त्यांनी ह्या पुस्तकात घडविले आहे.

अदवंत, म. ना.