मैदालकडी : कळ्या व फुले यांसह फांदीमैदालकडी : (चिकना हिं. मैदालक्री, गर्बिजौर सं. भव्य, जीवनिका, मेदा इं. कॉमन टॅलो लॉरेल लॅ. लिट्‌सिया सेबिफेरा, लि. चायनेन्सिस कुल-लॉरेसी). मैदालकडी नावाने बाजारात मिळणारी वस्तू त्याच नावाच्या वृक्षाची साल असते. हा सदापर्णी वृक्ष ⇨ दालचिनी, ⇨ तमाल व ⇨ पिसी यांच्या कुलातील असल्याने त्यांची अनेक लक्षणे सारखी आहेत. मैदालकडीचा प्रसार भारताच्या सर्व उष्ण भागांत, कोकण व उ. कारवारच्या जंगलात, बाह्य हिमालयात (सु. १,३५० मी. उंचीपर्यंत), शिवाय श्रीलंका, मलाया व ऑस्ट्रेलिया येथेही आहे. अनुकूल परिस्थितीत ह्याची उंची २५ मी. पर्यंत जाते व घेर १·५ मी. होती परंतु साधारणपणे याची उंची १२–१५ मी. आढळते. खोडावरची साल जाड, बुचासारखी, तांबूस किंवा पिंगट करडी व आत विष्यंदी (चिकण) व वल्करंध्रयुक्त (सच्छिद्र) असते. लहान फांद्यांवर दाट लव असून पाने पातळ, साधी, एकाआड एक, मध्यम आकारमानाची (१०–२५ X ५–१० सेंमी.), विविध आकारांची (लंबगोल, भाल्यासारखी), वर गुळगुळीत, गर्द हिरवी आणि खाली भुरकट लवदार असून फांद्यांच्या टोकांस गर्दीने येतात. फुले फार लहान, एकलिंगी, पिवळट, प्रत्येक स्तबकासारख्या लहान फुलोऱ्यावर थोडी (८–१२) असून अनेक स्तबकांचा संयुक्त चवरीसारखा मोठा मिश्र फुलोरा बनतो. पुं-पुष्पे व स्त्री-पुष्पे स्वतंत्र झाडावर असतात. ती मे जुलैमध्ये येतात. फुलातील परिदल नलिका (वेगळेपण नसलेली संदले व प्रदले) लांबट असून तिचे खंड अस्पष्ट असतात. नर-पुष्पात केसरदले २० किंवा अधिक आणि केसाळ स्त्री-पुष्पात ९–१२ वंध्य केसरदले व किंजपुट परिदलाच्या नळीने वेढलेला असतो [→ फूल]. फळे गोल, जांभळी किंवा काळी, लहान (०·६ सेंमी. व्यासाची), वाटाण्याएवढी व परिदलमंडलावर टेकलेली असून ती ऑक्टोबरात पक्व होतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे तमाल कुलात [ → लॉरेसी] वर्णन केल्याप्रमाणे असतात. फळे मिऱ्यासारखी दिसत असल्याने या वनस्पतीला मिरी किंवा मिऱ्याचा वृक्ष असेही म्हणतात.

अभिवृद्धीकरिता (लागवडीकरिता) बिया वापरतात कापून राहिलेल्या खोडाच्या खुंटावर आलेल्या नवीन कोंबापासून ही लागवड करता येते. सावलीतही वाढ चालू राहते. एकंदरीत वाढ जलद असते. दरवर्षी सु. २·२–२·५ सेंमी. घेर वाढतो.

याचे लाकूड पिवळट करडे ते तपकिरी रंगाचे असून त्यात गर्द रेषा असतात ते चमकदार, मध्यम कठीण व साधारण जड असते ते घासून व रंधून गुळगुळीत करता येते घरबांधणी, सजावटी सामान, खोकी, शेतीची अवजारे, वल्ही, छत इत्यादींकरिता ते वापरतात.

मैदालकडी तुकड्यांच्या स्वरूपात मिळते. पाण्यात बुडविल्यास बुळबुळीत होते. ती पौष्टिक, वीर्यवर्धक व जड असते. दुधसाखरेबरोबर तिचे चूर्ण महिनाभर घेतल्यास पुष्टता येते. साल परमा व अतिसार यांवर गुणकारी आहे. सज्जीखार, आंबेहळद व मैदालकडी यांचा लेप ठेचाळलेल्या भागावर लावून नंतर शेकतात धुपणी व परमा यांवर पानांच्या पाणी घालून काढलेल्या रसात खडीसाखर घालून देतात. खरचटलेल्या व लचकलेल्या भागांवर आणि संधिवातावर सालीच्या चूर्णाचा लेप घालतात जखमेवर चूर्ण (पूड) लावल्यास रक्त स्तंभन होऊन (गोठून) जखम लवकर बरी होते. पानांचे पोटीस जखमांवर लावतात. पाने गुरांना खाऊ घालतात. फळे खाद्य आहेत. बियांत ३५% मेद असून त्याला तीव्र सुवास व वाईट चव असते. मेद रुचिहीन व शुद्ध केल्यास खाद्य बनतो. मुळे कडसर-गोड, स्तंभक (आकुंचन करणारी) व पौष्टिक असतात. मुळांचा काढा आर्तवजनक (विटाळ सुरू करणारा) असतो.

रान आंबा (लि. मोनोपेटॅला) या भारतीय वृक्षाचे गुणधर्म व उपयोग काही अंशी वर वर्णन केल्याप्रमाणे आहेत. चरकसंहितासुश्रुतसंहिता यांमध्ये भव्य नावाचा जो उल्लेख आढळतो ते वृक्ष हाच असणे शक्य दिसते.

पहा : पिसी.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, NewDelhi, 1962.

             2. Kirtikar, K. R. Basu, B.D. Indian Medicinal Plants, Vol.III, New Delhi, 1975.

             ३. पदे, शं.दा. वनौषधी गुणादर्श, मुंबई, १९७३.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.