मेर, सायमन व्हॅन डर : (२४ नोव्हेंबर १९२५– ). डच अभियंते. जिनीव्हा येथील सर्न (CERN) च्या प्रयोगशाळेने कार्यन्वित केलेल्या आणि ज्यातून अणुकेंद्रीय दुर्बल परस्परक्रियेच्या W व Z या क्षेत्रवाहक कणांचा [→ मूलकण] शोध लागला. त्या प्रकल्पात महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल व्हॅन डर मेर यांना ⇨ कार्लो रुबिया यांच्याबरोबर १९८४ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकांचा बहुमान मिळाला. व्हॅन डर मेर यांनी भौतिकीमध्ये प्रशिक्षण घेतलेले नसले, तरी त्यांनी या प्रकल्पाला दिलेले तांत्रिक सहकार्य इतके महत्त्वाचे होते की, त्याबद्दल त्यांना भौतिकीतील हा सर्वोच्च बहुमान देण्यात आला, ही एक उल्लेखनीय गोष्ट आहे.
मेर यांचा जन्म नेदर्लंड्समधील हेग येथे झाला. डेल्फ्ट येथील उच्च तांत्रिक शाळेतून भौतिकीय अभियांत्रिकीची पदविका मिळविल्यानंतर त्यांनी विद्युत् सामग्रीचे उत्पादन करणाऱ्या फिलिप्स कंपनीत अभियंते म्हणून काम केले. पुढे त्यांनी डेल्फ्ट तांत्रिक विद्यापी ठाची भौतिकीय अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. फ्रा न्स, जर्मनी, ब्रिटन इ. राष्ट्रांनी अणुकेद्रीय संशोधनाकरिता सहकारी तत्त्ववावर स्थापन केलेल्या ‘सर्न’ या संघटनेच्या जिनिव्हा येथील प्रयोगशाळेत १९५६ मध्ये व्हॅन डर मेर यांची नेमणूक झाली.
आधुनिक मूलकण मीमांसेप्रमाणे किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) मूलद्रव्याच्या ऱ्हास क्रियेच्या व इतर प्रक्रियांच्या स्पष्टीकरिणांकरिता W ± व Z° अशा तीन प्रकारच्या क्षेत्र वाहक मूलकणांचे अस्तित्व गृहीत धरावे लागते. अति उच्च उर्जाधारी कणाच्या आघाताद्वारे प्रेरीत होणाऱ्या अणुकेंद्रीय विक्रियेमध्ये हे कण निर्माण होऊन त्यांचे प्रयोगशाळेत निरीक्षण करण्याची शक्यता असते पण ही विक्रिया घडवून आणण्याकरिता आघात करणाऱ्या कणाजवळ पुरेशी गतिज उर्जा असणे आवश्यक असते. उपलब्ध उपकरणांच्या साहाय्याने वरील अट पूर्ण करण्याकरिता एकाच प्रचंड वेगाने परस्पर विरुद्ध दिशांत धावणाऱ्या प्रोटॉनप्रतिप्रोटॉन शलाकांचा एकमेकांवर आघात करून सर्न प्रयोगशाळेने १९८१ मध्ये या कणांच्या अस्तित्वाबद्दल पुरावा मिळविण्यात यश संपादन केले. परस्परांविरुद्ध दिशांत जाणाऱ्या वेगवान कणांमध्ये आघात घडवून आणून त्याद्वारे अणुकेंद्रकीय विक्रिया संपन्न करण्याची कल्पना रूबिया यांची होती. व्हॅन डर मेर यांच्या कल्पकतेमुळे हा प्रयोग साकार होऊ शकला. कणांच्या परस्पर आघातामुळे एकाच प्रकारची अणुकेंद्रीय विक्रिया संपन्न होत नाही. प्रत्यक्षात घडणाऱ्या विभिन्न विक्रियांपैकी अगदी अल्पसंख्य विक्रियांमध्ये (दशकोटींपैकी फक्त एक या प्रमाणात) W± किंवा Z0कण निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रतिप्रोटॉनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ केल्याशिवाय हा प्रयोग सिद्ध होऊ शकत नाही कारण निर्माण झालेले कण अल्पजीवी असतात व त्यांचे निश्चितपणे निरीक्षण करण्यात अडचणी येतात. प्रतीप्रोटॉन निर्माण झाल्यावर त्यांची मोठ्या संख्येत संचायक नलिकेत साठवण करण्याकरिता व्हॅन डर मेर यांनी प्रसंभाव्य शलाका शीतन प्रद्धत शोधून काढली.
वेगवान प्रोटॉन योग्य लक्ष्यावर आदळले, तर त्यांपासून प्रतिप्रोटॉन बाहेर फेकले जातात. बाहेर आलेल्या प्रतिप्रोटॉनचा वेग (दिशा किंवा/ व मूल्य) एकसारखा नसतो. त्याची संख्या पण अत्यल्प असते. निरनिराळ्या वेळी निर्माण झालेल्या प्रतिप्रोटॉनांच्या स्पंदांना एकत्रित करून त्यांची साठवण संचायक नलिकेमध्ये करता येते (आघाती प्रोटॉन स्पंदाच्या स्वरूपात लक्षावर पडत असल्यामुळे प्रतिप्रोटॉन पण स्पंदाच्या स्वरूपात बाहेर येतात.) संचायक नलिकेमध्ये योग्य मध्यवर्ती चुंबकीय क्षेत्राचा वापर करून त्यामध्ये येणाऱ्या अती वेगवान कणाचा गतीमार्ग वर्तुळाकार बंदि स्त राहील, अशी योजना असते.
संचायक नलिकेत वेगवान कणाचा स्वीकार केला जाऊन तीमध्ये त्याची धारणा होण्यासाठी विविध कणांच्या गतिवेगातील फरक एका ठराविक मूल्यापेक्षा जास्त असून चालत नाही. कणांच्या गतिवेगात फरक असल्यास त्यामुळे कण जसे प्रगत होतात त्या प्रमाणात कणसमूहाचा आकार किंवा विस्तार वाढेल, हे उघड आहे. प्रतिप्रोटानांच्या गतिवेगातील विस्तार कमी करण्याचे काम प्रसंभाव्य शीतन पद्धत करते. या पद्धतीमध्ये एका उद्ग्रहण विद्युत् अग्राद्वारे परिभ्रमण करणाऱ्या शलाकेच्या काठच्छेदावरील त्याच्या घनतेच्या ⇨ गुरुत्वमध्याचा शोध घेतला जातो. संगणकाच्या (गणक यंत्राच्या) सहाय्याने निश्चित केलेले विद्युत् क्षेत्र शलाकेवर लावून त्या योगे समूहातील कणांच्या गतीवेगातील फरक व त्याचा विस्तार यांचे प्रमाण क्रमशः कमी केले जाते. त्यामधील कणांना इष्ट गतिधर्म प्राप्त झाला की, त्यास संचालक नलिकेत ढकलले जाते. अशा प्रकारे एकामागून एक अशा अनेक कणसमूहांचा प्रथम स्वीकार करून त्यांवर इष्ट संस्करण करून ते शेवटी संचायक नलिकेमध्ये साठविण्याकरिता पाठवले जातात. साठवण विभागात आलेल्या कणांचे परत एकत्रीकरण करून त्यांच्या घनफळ घनतेत कित्येक दशलक्ष पटींनी वाढ करता येते. प्रतिप्रोटॉन संख्येत अशा प्रकारे झालेल्या वाढीमुळे प्रतिप्रोटॉन व प्रोटॉन यांच्या शलकांचा एकमेकींवर आघात करुन W± व Z0 या कणांची निर्मिती व त्यांचे अभिज्ञान करणे (अस्तित्व ओळखणे) शक्य झाले.
व्हॅन डर मेर यांच्या प्रचलित पद्धतीनुसार पुरेसे प्रतिप्रोटॉन जमा करण्याकरिता अंदाजे २४ तासांचा अवधी लागतो. या पद्धतीच्या तांत्रिक प्रणालीमध्ये सुधारणा करून हा कालखंड ८–१० पटींनी कमी करावयाच्या योजनेवर व्हॅर डर मरे आपले लक्ष सध्या केंद्रित करीत आहेत.
व्हॅन डर मेर यांच्या कार्याबद्दल १९८४ मध्ये ॲम्स्टरडॅम व जिनीव्हा येथील विद्यापीठा नी भौतिकी मधील सन्माननीय डॉक्टरेट पदव्या त्यांना प्रदान केल्या.
पहा : मूलकण.
चिपळोणकर, व. त्रिं.